पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

"वन अर्थ वन हेल्थ - अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया 2023" च्या 6 व्या आवृत्तीचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन


“जागतिक महामारी नसतानाही आरोग्यासाठी भारताची दृष्टी जागतिकच होती”

"शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण हे भारताचे ध्येय आहे"

"भारतात संस्कृती, हवामान आणि सामाजिक गतिशीलता यांमध्ये प्रचंड विविधता आहे"

“खरी प्रगती ही जनकेंद्रित असते. वैद्यकीय शास्त्रात कितीही प्रगती झाली तरी शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या टप्प्यावर त्याचे फायदे मिळायला हवे”

"योग आणि ध्यान ही प्राचीन भारताने आधुनिक जगाला दिलेली देणगी आहे ज्या आता जागतिक चळवळी बनल्या आहेत"

"भारताच्या पारंपारिक आरोग्य सेवा प्रणालींमध्ये तणाव आणि जीवनशैलीच्या आजारांवर बरीच उत्तरे आहेत"

"केवळ आपल्या नागरिकांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आरोग्यसेवा सोपी आणि परवडणारी बनवणे हे भारताचे ध्येय आहे"

Posted On: 26 APR 2023 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे  नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर "वन अर्थ वन हेल्थ - अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया - 2023" चे उद्घाटन केले आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

या मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी जगभरातील आरोग्य मंत्री आणि पश्चिम आशिया, सार्क, आसियान आणि आफ्रिकन देशातील प्रतिनिधींचे हार्दिक स्वागत केले. 'प्रत्येकजण सुखी होवो, प्रत्येकजण रोगमुक्त होवो, प्रत्येकासाठी चांगल्या गोष्टी घडू दे आणि कोणालाही दुःखाचा त्रास होऊ नये' अशा भारतीय शास्त्रांमधील उल्लेख करून पंतप्रधानांनी भारताच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनावर प्रकाश टाकला आणि  हजारो वर्षांपूर्वी जागतिक महामारी नसतानाही भारताकडे असणाऱ्या जागतिक दृष्टीकोनाचा उल्लेख केला. त्यांनी अधोरेखित केले की "एक पृथ्वी - एक आरोग्य" हे ध्यय समान विश्वासांचे पालन करते आणि कृतीत समान विचारांचे ते एक उदाहरण आहे. “आपली दृष्टी फक्त मानवी समाजापुरती मर्यादित नाही. ही दृष्टी आपल्या संपूर्ण परिसंस्थेपर्यंत विस्तारते. वनस्पतींपासून प्राण्यांपर्यंत, मातीपासून नद्यांपर्यंत, जेव्हा आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट निरोगी असते, तेंव्हाच आपण निरोगी राहू शकतो”, असं यावेळी पंतप्रधानांनी सांगितल.

"आजारपणाचा अभाव" हे चांगल्या आरोग्यासारखेच आहे, या लोकप्रिय उक्तीचा संदर्भ देत पंतप्रधानांनी यावर भर दिला की आरोग्याकडे पाहण्याचा भारताचा दृष्टीकोन केवळ आजारपणाच्या अभावावर थांबत नाही आणि प्रत्येकासाठी निरोगीपणा निरामय आरोग्य आणि कल्याण यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. "आमचे ध्येय शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण हे आहे", असं ते पुढे म्हणाले.

‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेसह G20 अध्यक्षपदाच्या भारताच्या प्रवासावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. ही संकल्पना पूर्ण करतांना लवचिक जागतिक आरोग्य सेवा प्रणालींचे महत्त्व लक्षात आले. ते म्हणाले की, वैद्यकीय मूल्य पर्यटन  आणि आरोग्य कर्मचार्‍यांची गतिशीलता हे निरोगी पृथ्वीसाठी महत्त्वाचे घटक आहेत आणि ‘वन अर्थ, वन हेल्थ - अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया २०२३’ हा या दिशेने एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की आजचा कार्यक्रम  भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या संकल्पनेशी जुळलेला आहे ज्यामध्ये असंख्य देशांचा सहभाग आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे या भारतीय तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील तसेच व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील भागधारकांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला.

सर्वांगीण आरोग्य सेवेबाबत भारताची ताकद अधोरेखित करताना पंतप्रधानांनी भारताची प्रतिभा, तंत्रज्ञान, यशापयश आणि परंपरा यांचे दाखले दिले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की भारतीय डॉक्टर, परिचारिका आणि काळजीवाहक सेवक यांचा प्रभाव जगाने पाहिला आहे आणि त्यांची क्षमता आणि वचनबद्धता आणि प्रतिभेसाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर आदर केला जातो. ते म्हणाले की जगभरातील अनेक आरोग्य सेवा प्रणालींना भारतीय व्यावसायिकांच्या प्रतिभेचा फायदा झाला आहे. पंतप्रधानांनी भारतातील आरोग्यसेवा व्यावसायिकांचे प्रशिक्षण आणि वैविध्यपूर्ण अनुभव लक्षात घेता "भारतात संस्कृती, हवामान आणि सामाजिक गतिशीलता यामध्ये प्रचंड विविधता आहे" अशी टिपणी केली. ते पुढे म्हणाले की भारतीय आरोग्य सेवा प्रतिभेने विविध परिस्थितींच्या गरजा पूर्ण करू शकणार्‍या त्यांच्या अपवादात्मक कौशल्यामुळे जगाचा विश्वास जिंकला आहे.

जगाला अनेक सत्यांची आठवण करून देणार्‍या शतकातील एकेकाळच्या साथीच्या आजारावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, खोलवर जोडलेल्या जगात सीमारेषा आरोग्यविषयक धोक्यांना रोखू शकत नाहीत. त्यांनी असेही निदर्शनास आणले की जगातील दक्षिणेतील देशांना संसाधने नाकारले जाण्यासह इतरही  विविध अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागला. “खरी प्रगती ही जनकेंद्रित असते.वैद्यकीय शास्त्रात कितीही प्रगती झाली तरी शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या टप्प्यावर त्याचे फायदे मिळायला हवे”  असे स्पष्ट करून  मोदींनी आरोग्य सेवा क्षेत्रात विश्वासू भागीदाराची अनेक राष्ट्रांची गरज असल्याचे अधोरेखित केले. लस आणि औषधांद्वारे जीव वाचवण्याच्या उदात्त कार्यात भारताला अनेक राष्ट्रांचा भागीदार असल्याचा अभिमान वाटतो, असे पंतप्रधान म्हणाले. मेड-इन-इंडिया लसीची जगातील सर्वात मोठी आणि जलद कोविड-19 लसीकरण मोहीम आणि त्याच्या पुरवठा व्यवस्थेची उदाहरणे दिली. 100 पेक्षा जास्त देशांमध्ये COVID-19 लसींचे 300 दशलक्ष डोस, यातून भारताच्या क्षमतेची आणि वचनबद्धतेची झलक दिसून आली आणि आपल्या नागरिकांसाठी चांगले आरोग्य शोधणाऱ्या प्रत्येक राष्ट्राचा आपला देश विश्वासू मित्र म्हणून कायम राहील, असा पुनरुच्चार मोदींनी केला.

“भारताचा आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हजारो वर्षांपासून सर्वांगीण आहे”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी  केली. ते म्हणाले की, भारतामध्ये योग आणि ध्यान यांसारख्या प्रणालींसह प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्याची मोठी परंपरा आहे, ही आधुनिक जगाला भारताची प्राचीन भेट आहे जी आता जागतिक चळवळ बनली आहे. त्यांनी आयुर्वेदाचाही उल्लेख केला जो निरोगीपणाची संपूर्ण शिस्त आहे आणि ते म्हणाले की ते आरोग्याच्या शारीरिक आणि मानसिक पैलूंची काळजी घेते. “जग तणाव आणि जीवनशैलीतील आजारांवर उपाय शोधत आहे. भारताच्या पारंपारिक आरोग्य सेवा प्रणालींमध्ये यासाठी बरीच उत्तरे आहेत”, यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी भारताच्या पारंपारिक आहारासाठी बनवलेल्या भरड धान्याचाही  उल्लेख केला आणि यात जगभरातील अन्न सुरक्षा आणि पोषण समस्यांना तोंड देण्याची क्षमता आहे, असं ही ते यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांनी आयुष्मान भारत योजनेवर प्रकाश टाकला आणि सांगितले की ही जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा संरक्षण योजना आहे. पंतप्रधानांनी सांगितले की यात 50 कोटीहून अधिक भारतीय नागरिकांच्या वैद्यकीय उपचारांचा समावेश आहे जिथे 40 कोटीहून  अधिक लोकांनी आधीच कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने सेवांचा लाभ घेतला आहे. परिणामस्वरूप भारतीय नागरिकांची सुमारे 7 अब्ज डॉलर्सची बचत झाली आहे.

आपल्या संबोधनाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी यावर भर दिला की जागतिक पातळीवरील आरोग्यसेवाविषयक आव्हानांना वेगळे करता येणार नाही आणि आता एकात्मिक, सर्वसमावेशक आणि संस्थात्मक प्रतिसादाची वेळ आली आहे. “आमच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात हे आमच्या लक्ष्यीत  क्षेत्रांपैकी एक आहे. केवळ आपल्या नागरिकांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आरोग्यसेवा सोपी आणि परवडणारी बनवणे हे आमचे ध्येय आहे”, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी अधोरेखित केले की भारताचे प्राधान्य असमानता कमी करणे आहे आणि सेवा न मिळालेल्या लोकांची सेवा करणे हे देशासाठी महत्त्वाचे आहे. हा मेळावा या दिशेने जागतिक भागीदारी मजबूत करेल आणि ‘एक पृथ्वी-एक आरोग्य’ या समान प्राधान्याने इतर राष्ट्रांची भागीदारी शोधू असा आशावाद पंतप्रधानांनी यावेळी  व्यक्त केला 

 

पार्श्वभूमी

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या सहकार्याने "वन अर्थ वन हेल्थ, अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया 2023" च्या 6व्या आवृत्तीचे भारताच्या G20 अध्यक्षांसह को-ब्रँडिंग केले आहे आणि हा कार्यक्रम येत्या 26 आणि 27 एप्रिल 2023 प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित केला गेला आहे.

दोन दिवसीय या कार्यक्रमात जागतिक स्तरावरील सहकार्य आणि भागीदारीच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. मूल्य-आधारित आरोग्य सेवा प्रदान करणारे  हेल्थकेअर वर्कफोर्सचा निर्यातदार म्हणून वैद्यकीय मूल्य प्रवासाच्या क्षेत्रात भारताची ताकद प्रदर्शित करणे आणि जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा आणि निरोगी सेवांसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या  ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’  या संकल्पनेशी सुसंगत आहे आणि त्याला ‘वन अर्थ, वन हेल्थ- अॅडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया 2023’ असे नाव देण्यात आले आहे. भारतातून सेवांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी, ही आंतरराष्ट्रीय शिखर परिषद ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, कोण कोण आहे इथपासून ते  जागतिक  वैद्यकीय मूल्य पर्यटन उद्योगातील सहभाग आणि आघाडीचे अधिकारी, निर्णय घेणारे, उद्योग भागधारक, तज्ञ यांच्यातील सहभागाची साक्ष देणारे एक आदर्श मंच प्रदान करेल.  जगभरातील उद्योगातील व्यावसायिक. हे सहभागींना जगभरातील समवयस्कांशी संवाद करण्यास, कल्पनांची देवाणघेवाण करण्यास, संपर्क तयार करण्यास आणि मजबूत व्यावसायिक भागीदारी तयार करण्यास सक्षम करेल.

या शिखर परिषदेत 70 देशांतील 125 प्रदर्शक आणि 500 सहभाग नोंदवलेले विदेशी प्रतिनिधी सहभागी होतील. आफ्रिका, मध्य पूर्व, कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडेंट स्टेट्स, सार्क आणि आसियान या प्रदेशातील  70   हून अधिक नियुक्त देशांमधील सहभागी झालेल्या प्रतिनिधींसोबत  रिव्हर्स बायर सेलर मीटिंग आणि नियोजन केलेल्या B2B बैठका भारतीय आरोग्य सेवा प्रदाते आणि परदेशी सहभागींना एकत्र आणतील आणि एकमेकांशी जोडतील. या परिषदेमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, आयुष मंत्रालय, उद्योग मंच, स्टार्टअप्स इत्यादी विभागातील प्रख्यात वक्ते आणि तज्ञांशी पॅनेल चर्चा देखील केली जाईल,तसेच  भागधारकांशी संवाद घडवून आणणाऱ्या सत्रांचे देखील आयोजन केले जाईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

G.Chippalkatti/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920062) Visitor Counter : 216