परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या G20 अध्यक्षतेदरम्यान 100 वी जी20 बैठक

Posted On: 17 APR 2023 10:19AM by PIB Mumbai

नवी दिल्ली: 17 एप्रिल, 2023

 

भारत आपल्या जी 20 अध्यक्षतेखाली 100 वी जी 20 बैठक आयोजित करून आज ऐतिहासिक टप्पा साजरा करत आहे. वाराणसी येथे होणारी ही बैठक कृषी मुख्य शास्त्रज्ञांची आहे. गोवा येथे आरोग्य कार्यकारी गटाची दुसरी बैठक, हैदराबादमध्ये डिजिटल अर्थव्यवस्था कार्यकारी गटाची दुसरी बैठक आणि शिलाँगमध्ये अंतराळ अर्थव्यवस्था अग्रणींची पूर्ववर्ती बैठक आज होत आहे.

जी 20 च्या बाली शिखर परिषदेत 16 नोव्हेंबर 2022 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जी 20 अध्यक्षपद सोपवल्यानंतर, भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचा कालावधी 1 डिसेंबर 2022 रोजी सुरू झाला असून तो 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत राहील. तत्पूर्वी 8 नोव्हेंबर 2022 रोजी पंतप्रधानांनी – “वसुधैव कुटुंबकम”- “एक पृथ्वी. एक कुटुंब. एक भविष्य” या जी 20 लोगोचे आणि भारताच्या जी 20 अध्यक्षीय संकल्पनेचे अनावरण केले . भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगात डिझाइन केलेला, जी 20 लोगो हा आपला पृथ्वी प्रणित दृष्टिकोन आणि आव्हाने असूनही विकासाचे प्रतीक आहे.

जी-20 देशांमध्ये 19 देशांचा (अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनाइटेड किंग्डम, अमेरिका) आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे. जी 20 सदस्य जागतिक जीडीपीच्या सुमारे 85%, जागतिक व्यापाराच्या 75% पेक्षा जास्त आणि जगातल्या सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात.

भारताच्या जी 20 अध्यक्षतेदरम्यान व्यक्तिशः सहभाग हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग आहे. जी-20 संबंधित बैठकांना आत्तापर्यंत12,300 हून अधिक प्रतिनिधी, 110 हून अधिक देशांमधील व्यक्ती उपस्थित राहिल्या आहेत. यामध्ये जी 20 सदस्य, 9 आमंत्रित देश आणि 14 आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग आहे. आतापर्यंत 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 41 शहरांमध्ये 100 जी 20 बैठका झाल्या आहेत. राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पूर्ण पाठिंब्याने आणि सहभागाने संपूर्ण भारतभर बैठका आयोजित केल्या जात आहेत. भारत आपल्या अध्यक्षपदाच्या काळात, संपूर्ण देशभरातल्या सुमारे 60 शहरांमध्ये 200 हून अधिक जी 20-संबंधित बैठकांसाठी परदेशी प्रतिनिधींचे आतिथ्य करणार आहे. कोणत्याही जी 20 अध्यक्षतेपेक्षा ही भौगोलिक व्याप्ती सर्वाधिक आहे. सर्व 13 शेर्पा ट्रॅक कार्य गट, 8 वित्तीय ट्रॅक कार्यप्रवाह , 11 प्रतिबद्धता गट आणि 4 उपक्रम यांनी ठोस संवाद आरंभ केला आहे. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी एक नवीन कार्य गट, एक नवीन प्रतिबद्धता गट "स्टार्टअप 20" आणि मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज परिषद हा नवा उपक्रम, आपल्या जी 20 अध्यक्षतेखाली कार्यान्वित करण्यात आले आहेत. 11 प्रतिबद्धता गट खाजगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था, नागरी समाज, तरुण आणि महिला तसेच संसद, लेखापरीक्षण प्राधिकरण आणि शहरी प्रशासनासह संस्थांमध्ये संवादासाठी एक व्यासपीठ प्रदान करतात.

आजपर्यंत तीन मंत्रीस्तरीय बैठका झाल्या आहेत. 24-25 फेब्रुवारी 2023 रोजी बेंगळुरू येथे पहिली अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरची बैठक (FMCBG) आयोजित करण्यात आली होती, जी ट्वेंटी (G20) परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक (FMM) 1-2 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती आणि दुसरी, अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरची बैठक (FMCBG) बैठक वॉशिंग्टन डीसी मध्ये 12-13 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. उदयपूर (4-7 डिसेंबर 2022) आणि कुमारकोम (30 मार्च - 2 एप्रिल 2023) येथे शेर्पांच्या दोन बैठका झाल्या आहेत. या एफएमसीबीजी (FMCBG) , एफएमएम (FMM) आणि शेर्पा बैठकांमध्ये, मंत्री-स्तरीय मान्यवरांसह सर्व शिष्टमंडळांचा विक्रमी, उच्च-स्तरीय वैयक्तिक सहभाग दिसून आला. 28 परराष्ट्र मंत्री (18 जी 20 (G20) सदस्य देशांमधून, 9 अतिथी देशांमधून आणि, एयु (AU) चेअर कोमोरोस देशामधून) आणि 2 उपाध्यक्ष/उपपरराष्ट्र मंत्री (जपान आणि कोरिया प्रजासत्ताक मधील) हे परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या(FMM) बैठकीला उपस्थित होते. या मंत्रिस्तरीय बैठकांचा समारोप ठोस परिणामकारक दस्तऐवजांसह झाला ज्याने G20 च्या सामायिक प्राधान्यांवर एकमत निर्माण केले. अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरच्या पहिल्या बैठकीत (FMCBG) मल्टीलेटरल डेव्हलपमेंट बँक (MDB) सुधारणांवर आणि कर्जासंबंधी प्रश्नांवर तोडगा शोधण्यासाठी तज्ञ गट स्थापन करण्यावर एकमत झाले तर परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीमध्ये (FMM) बहुपक्षीय सुधारणा, विकास सहकार्य, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, दहशतवादविरोधी धोरण, नवीन आणि उदयोन्मुख धोके, जागतिक कौशल्य, मॅपिंग आणि आपत्ती जोखीम कमी करण्यावर एकमत झालेले आहे.

आपल्या अध्यक्षपदाच्या काळात, भारत, जगापुढे दक्षिणेकडील आणि विकसनशील देशांचा आवाज आणि चिंता देखील मांडत आहे. जानेवारी 2023 मध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिटमध्ये 125 देशांनी भाग घेतला होता, ज्यात 18 राज्यांचे प्रमुख/ सरकारे आणि मंत्री स्तरावरील इतरांचा समावेश होता. शिवाय, भारताच्या सध्याच्या अध्यक्षपदाच्या काळात, आफ्रिकेतील देशांचा सहभाग हा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका (G20 सदस्य), मॉरिशस, इजिप्त, नायजेरिया, एयु (AU) चेअर - कोमोरोस आणि एयुडीए-एनइपीएडी (AUDA-NEPAD) यांचा समावेश आहे.

भारतातील वैविध्य, सर्वसमावेशक परंपरा आणि सांस्कृतिक समृद्धी दर्शवणारे अनोखे अनुभवही भेट देणाऱ्या प्रतिनिधींच्या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या जेवणात भरड धान्य आधारित पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. यात 150 हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून 7,000 हून अधिक कलाकारांच्या सहभागासह, स्थानिक आणि राष्ट्रीय कला प्रकारांचे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे. भारताच्या अध्यक्षतेखालील जी 20 (G20) परिषदेला "लोकांची G20 परिषद" अशी ओळख निर्माण करण्यासाठी, संपूर्ण राष्ट्र आणि संपूर्ण-समाजाच्या दृष्टिकोनातून सक्रिय लोकसहभागासह अनेक जन भागिदारी उपक्रम एकाच वेळी आयोजित केले जात आहेत. यामध्ये विद्यापीठांमधून जी 20 संबंधित व्याख्यानमाला घेणे, मॉडेल G20 बैठका घेणे, शाळा/विद्यापीठांमधून विशेष G20 सत्रे आयोजित करणे, देशातल्या प्रमुख सणांमध्ये G20 पॅव्हेलियन्स, प्रश्नमंजुषा स्पर्धा, सेल्फी स्पर्धा, #G20India कथा आणि जनतेच्या आणि खाजगी क्षेत्राच्या मदतीने इतर शेकडो G20- संकल्पना कार्यक्रमांचा यात समावेश आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली सध्या सुरू असलेल्या G20 परिषदे दरम्यान होणाऱ्या चर्चांमध्ये, समावेशक आणि स्थितिस्थापक (रेझलियंट) वाढ, शाश्वत विकास ध्येय (SDGs), हरित विकास आणि पर्यावरणाला अनुकूल जीवनशैली (LiFE); तांत्रिक परिवर्तन आणि सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा; बहुपक्षीय संस्थांमध्ये सुधारणा; महिलांचा विकास आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुसंवाद यासारख्या व्यापक प्राधान्य क्षेत्रांचा समावेश आहे.

भारताच्या अध्यक्षतेखालील G20 परिषदेच्या 9-10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या लीडर्स समिटच्या तयारीसाठी, G20 सदस्य आणि अतिथी देशांकडून या परिषदेच्या सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक अजेंडासाठी प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. भारताच्या अध्यक्षतेखालील G20 परिषदेच्या बैठकांना मिळणारा व्यापक, मोठ्या प्रमाणावर आणि उत्साही सहभाग हा भारताच्या G20 अध्यक्षपदा अंतर्गत एकत्रित येणारे G20 सदस्य देश आणि निमंत्रित देश समकालीन जागतिक आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाणार असल्याची साक्ष देत आहे.

***

Jaidevi PS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1917212) Visitor Counter : 2831