पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तामिळ नववर्ष समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 13 APR 2023 10:55PM by PIB Mumbai

 

वणक्कम!

आपल्या सर्वांना तामिळ पुथांडू निमित्त खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांचं प्रेम, माझ्या तमिळ बंधू-भगिनींच्या स्नेहामुळेच आज मला आपल्या बरोबर तामिळ पुथांडू साजरा करण्याची संधी मिळाली आहे. पुथांडू म्हणजे पुरातन काळातील नवोन्मेषाचा सण! तामिळ संस्कृती एवढी प्राचीन आहे, आणि दर वर्षी पुथांडू मधून नवीन ऊर्जा घेऊन पुढे वाटचाल करण्याची ही परंपरा खरोखरच अद्भुत आहे! हीच गोष्ट तामिळनाडू आणि तामिळ लोकांचं वेगळेपण आहे. म्हणून मला नेहमीच या परंपरेचं आकर्षण वाटत आलं आहे आणि तिच्याशी मी भावनिक रित्या जोडला गेलो आहे. मी गुजरातमध्ये असताना, ज्या मणीनगर विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार होतो, तिथे मोठ्या संख्येने मूळचे तामिळनाडू इथले नागरिक राहत होते, ते माझे मतदार होते, ते मला आमदारही बनवायचे आणि मुख्यमंत्रीही बनवायचे. त्यांच्या बरोबर व्यतीत केलेले क्षण मला नेहमी आठवतात. माझं हे भाग्य आहे, की मी तामीळनाडूला जेवढं प्रेम दिलं, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम मला तामिळ जनतेने नेहमीच परत दिलं.

 

मित्रहो,

स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत असताना, यंदा लाल किल्ल्यावरून मी आपल्या वारशाबद्दल  अभिमान व्यक्त केला होता. तो जेवढा प्राचीन असतो, तेवढाच तो काळाच्या कसोटीवरही उतरलेला असतो. म्हणूनच, तामिळ संस्कृती आणि तामिळ लोक दोन्ही मुळातच शाश्वतही आहेत आणि जागतिकही आहेत. चेन्नई पासून ते कॅलिफोर्निया पर्यंत, मदुराई पासून ते मेलबर्न पर्यंत, कोइम्बतुर पासून ते केप टाऊन पर्यंत, सालेम पासून ते सिंगापूर पर्यंत, तुम्हाला असे तामिळ लोक भेटतील, ज्यांनी त्यांची संस्कृती आणि परंपरा आपल्या बरोबर नेली आहे. पोंगल असो की पुथांडू, हे सण जगभर साजरे केले जातात. तामिळ ही जगातली सर्वात जुनी भाषा आहे. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. तामिळ साहित्याचाही मोठा आदर केला जातो. तामिळ चित्रपट सृष्टीने आपल्याला काही सर्वोत्कृष्ट कलाकृती दिल्या आहेत.

 

मित्रहो,

स्वातंत्र्यलढ्यातही तामिळ लोकांचं मोठं योगदान राहिलं आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या पुनर्बांधणीमधेही तामिळनाडूमधल्या लोकांच्या प्रतिभेने देशाला नव्या उंचीवर पोहोचवलं आहे. सी. राजगोपालचारी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाशिवाय आधुनिक भारताची चर्चा पूर्ण होऊ शकते का? के. कामराज आणि त्यांच्या समाजहिताशी निगडीत कामाची आपण आजही आठवण ठेवतो. असा कोण तरुण असेल, ज्याने डॉ. कलाम यांच्यापासून प्रेरणा घेतली नाही? वैद्यक शास्त्र, कायदा आणि शिक्षण क्षेत्रात तामिळ लोकांनी अतुलनीय योगदान दिलं आजे. ‘मन की बात’ मधेही मी अनेकदा तामिळनाडूच्या लोकांनी दिलेल्या योगदानावर बोललो आहे.

 

मित्रहो,

भारत ही जगातली सर्वात जुनी लोकशाही आहे - मदर ऑफ डेमोक्रसी. यामागे अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत, अनेक अविवादास्पद पुरावे आहेत. यामधला एक महत्वाचा संदर्भ तामिळनाडू इथलाही आहे. तामिळनाडूमध्ये उत्तरमेरूर नावाची जागा खूप खास आहे. इथे 1100 ते 1200 वर्षांपूर्वीच्या एका शिलालेखात भारताच्या लोकशाही मूल्यांबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत, आणि त्या आजही वाचता येतात. इथे सापडलेला शिलालेख हा त्यावेळच्या ग्रामसभेसाठी स्थानिक संविधाना प्रमाणे आहे. यामध्ये विधानसभा कशी चालवावी, सदस्यांची पात्रता काय असावी, सदस्य निवडण्याची प्रक्रिया काय असावी, हे सांगितलं आहे. एवढंच नाही, तर त्या काळात त्यांनी हेही ठरवलं आहे, की अपात्रता कशी ठरवावी. शेकडो वर्षांपूर्वीच्या त्या व्यवस्थेत लोकशाहीचं  अतिशय तपशीलवार वर्णन केल्याचं दिसून येतं.

 

मित्रहो,

तामिळ संस्कृतीत असं बरंच काही आहे, ज्याने भारताला एक देश म्हणून आकार दिला आहे. चेन्नईपासून सत्तर किलोमीटर अंतरावर कांचीपुरमजवळ तिरू-मुक्कुडल इथं वेंकटेश पेरुमल मंदिर आहे. चोल साम्राज्याच्या काळात बांधलेलं हे मंदिर देखील सुमारे 1100 वर्ष जुनं आहे. त्यावेळी या ठिकाणी 15 खाटांचं रुग्णालय अस्तित्वात असल्याचं या मंदिरातल्या ग्रॅनाईटच्या दगडांवर कोरलं आहे. 1100 वर्ष जुन्या दगडांवरच्या शिलालेखांमध्ये वैद्यकीय प्रक्रियेबद्दल लिहिलं आहे, डॉक्टरांच्या पगाराबद्दल लिहिलं आहे, वनौषधींबद्दल लिहिलं आहे, अकरा शे वर्षांपूर्वी! आरोग्य सेवेशी संबंधित हे शिलालेख, तामिळनाडूचा आणि भारताचा खूप मोठा वारसा आहेत.

 

मित्रहो,

मला आठवतं, काही दिवसांपूर्वी मी बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या उद्घाटनासाठी तामिळनाडूला गेलो होतो, तेव्हा तिथे मी तिरुवरूर जिल्ह्यातल्या प्राचीन शिवमंदिराचा उल्लेख केला होता. हे अतिशय प्राचीन चतुरंग वल्लभनाथर मंदिर बुद्धिबळाच्या खेळाशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे चोल साम्राज्याच्या काळात तामिळनाडूमधून इतर देशांबरोबर व्यापार होत असल्याचे असंख्य संदर्भ आहेत.

 

बंधुंनो आणि भगिनींनो,

एक देश म्हणून, हा वारसा अभिमानाने जगासमोर मांडणं ही आपली जबाबदारी होती. पण या पूर्वी काय झालं, हे आपल्याला माहीत आहे. आता ही सेवा करण्याचं भाग्य आपण सर्वांनी मला दिलं आहे. मला आठवतं, मी संयुक्त राष्ट्रांमध्ये तामिळ भाषिकांशी तामिळ मध्ये संवाद केला होता. त्यानंतर देशातल्या आणि जगातल्या अनेकांनी मला संदेश पाठवून आनंद व्यक्त केला होता. मला श्रीलंकेत जाफना इथे जाण्याची संधी मिळाली होती.

जाफनाला भेट देणारा मी भारताचा पहिला पंतप्रधान होतो. श्रीलंकेतील तामिळ समाजाच्या कल्याणासाठी तिथले लोक दीर्घकाळ मदतीची वाट पाहत होते. आमच्या सरकारने त्यांच्यासाठी देखील अनेक कामे केली, तामिळ जनतेसाठी घरे बांधली. तिथे गृहप्रवेश सोहळा होत असताना एक अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तामिळ परंपरेप्रमाणे गृहप्रवेशाच्या आधी घराबाहेर लाकडावर दूध उकळण्याचा कार्यक्रम असतो. मीही त्यात सहभागी झालो होतो आणि मला आठवतं जेव्हा तो व्हिडीओ तामिळमध्ये, तामिळनाडूमध्ये पाहिला होता तेव्हा माझ्याप्रती असलेला स्नेह जाणवला. माझे मन तामिळनाडूशी, तामिळ लोकांशी किती निगडित आहे हे तुम्हाला प्रत्येक पावलागणिक अनुभवता येईल. तामिळ जनतेची निरंतर सेवा करण्याची भावना मला नवी ऊर्जा देते.

 

मित्रांनो,

नुकताच संपन्न झालेला 'काशी तामिळ संगम' किती यशस्वी ठरला हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. या कार्यक्रमात आम्ही पुरातनता, नावीन्य आणि विविधता एकत्र साजरी केली. तामिळ साहित्याची ताकदही या आयोजनातून दिसून आली. काशीतील तामिळ संगमदरम्यान अल्पावधीतच हजारो रुपयांची तामिळ भाषेतील पुस्तके विकली गेली. तामिळ शिकवणाऱ्या पुस्तकांचीही तिथे प्रचंड क्रेझ होती. मित्रांनो, हिंदी भाषिक क्षेत्रात आणि तेही आजच्या डिजिटल युगाच्या ऑनलाइन जगात, काशीतील हिंदी भाषिक लोकांना, तामिळ पुस्तकांची अशी आवड, हजारो रुपयांची तामिळ पुस्तके खरेदी करणे ही आपल्या देशाच्या सांस्कृतिक जोडणीची सर्वात मोठी ताकद आहे.

माझा विश्वास आहे, काशिवासींचे जीवन तामिळ लोकांशिवाय अपूर्ण आहे आणि मी काशिवासी झालो आहे. आणि काशीशिवाय तमिळ लोकांचे जीवनही अपूर्ण आहे. तामिळनाडूतून कोणी काशीला आल्यावर हा आपलेपणा सहज दिसून येतो. काशीचा खासदार असणं ही माझ्यासाठी आणखीनच अभिमानाची गोष्ट आहे. मी पाहिलं आहे की काशीमध्ये नौका चालवणाऱ्यांपैकी क्वचितच असा कोणी नाविक असेल ज्याला तामिळमध्ये 50-100 वाक्ये कशी बोलायची हे माहित नसेल. इतका तिथे सुसंवाद आहे. बनारस हिंदू विद्यापीठात सुब्रह्मण्यम भारतीजींच्या नावाने एक आसनव्यवस्था करण्यात आली हेही आपल्या सर्वांचे भाग्य आहे. सुब्रमण्यम भारतीजींनी काशीमध्ये बराच काळ व्यतीत केला होता, तिथून खूप काही त्यांना शिकायला मिळाले होते. काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्ट खूप जुना असल्याचीही ही पहिलीच वेळ आहे. प्रथमच तामिळनाडूतील एका गृहस्थाला काशी विश्वनाथ ट्रस्टचे विश्वस्त बनवले आहे, हा देखील स्नेहच आहे. हे सर्व प्रयत्न एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेला बळ देणार आहेत.

 

मित्रांनो,

तामिळ साहित्यातून आपल्याला भूतकाळातील माहिती मिळण्याबरोबरच भविष्यासाठी प्रेरणा देखील मिळते. तामिळनाडूमध्ये असे साहित्य आहे, त्यातील बरेचसे 2000 वर्षांहून अधिक जुने आहे. उदाहरणार्थ, संगम साहित्यातून असे दिसून आले की प्राचीन तामिळनाडूमध्ये अनेक प्रकारची भरडधान्यांचा श्री अन्न म्हणून वापर होत होता. भरडधान्यांच्या शेतीचा उल्लेख प्राचीन तमिळ साहित्य 'अगनानुरु' मध्ये आढळतो. महान तामिळ कवयित्री अव्वैयार यांनी त्याबद्दल एका सुंदर कवितेत लिहिले आहे, स्वादिष्ट 'वरगु अरिसी चोरू'. आजही जर कोणी भगवान मुरुगन यांना नैवेद्य म्हणून कोणता पदार्थ आवडतो असे विचारले तर त्याचे उत्तर आहे 'तेनुम तिनै मावुम'. आज भारताच्या पुढाकाराने संपूर्ण जग आपल्या हजारो वर्षांच्या भरडधान्यांच्या परंपरेशी जोडले जात आहे. मला आवडेल की आज आपला एका नवीन वर्षाचा संकल्प भरडधान्यांशी देखील निगडित असेल. आपण आपल्या आहारात भरडधान्यांना पुन्हा स्थान देऊ आणि इतरांनाही तसे करण्यास प्रेरित करू, हा आपला संकल्प असावा.

 

मित्रांनो,

आता थोड्याच वेळात तामिळ कलाकारांचे कार्यक्रमही येथे होणार आहेत. आपल्या कला आणि संस्कृतीच्या समृद्ध वारशाचेही ते प्रतीक आहे. ते संपूर्ण जगासमोर नेणे, त्याचे प्रदर्शन करणे हे आपले कर्तव्य आहे. तसंच या कलाप्रकारांचा काळाबरोबर कसा विस्तार होईल याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आजच्या तरुण पिढीमध्ये ते जितके लोकप्रिय होतील तितकेच ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतील. त्यामुळे तरुणांना या कलेबाबत माहिती देणे, त्यांना शिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आणि मला आनंद आहे की आजचा कार्यक्रम देखील याचे एक उत्तम उदाहरण ठरत आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

स्वातंत्र्याच्या अमृतकाळात, आपल्या तामिळ वारशाबद्दल जाणून घेणे आणि त्याबाबत देश आणि जगाला अभिमानाने सांगणे ही आपली जबाबदारी आहे. हा वारसा आपल्या एकतेचे आणि 'राष्ट्र प्रथम' च्या भावनेचे प्रतीक आहे. आपल्याला तामिळ संस्कृती, साहित्य, भाषा आणि तामिळ परंपरा सतत पुढे न्यायची आहे. या भावनेने मी आपली रजा घेतो. पुन्हा एकदा, पुत्तांडुबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि या महत्त्वाच्या प्रसंगी मला सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी मुरुगन जी यांचेही आभार मानतो. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

धन्यवाद.

***

S.Thakur/R.Agashe/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1916875) Visitor Counter : 198