पंतप्रधान कार्यालय

कर्नाटकमध्ये हुबळी-धारवाड इथल्या विकास कामांचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 12 MAR 2023 8:07PM by PIB Mumbai

भारत माता की जय।

भारत माता की जय।

जगद्गुरु बसवेश्वर अवरिगे नन्ना नमस्कारगळु।

कले, साहित्य मत्तू संस्कृतिया इ नाडिगे,

कर्नाटक दा एल्ला सहोदरा सहोदरीयारिगे नन्ना नमस्कारगळु।

मित्रहो,

मला या वर्षाच्या सुरुवातीलाही हुबळीला भेट देण्याचं भाग्य लाभलं. हुबळीच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून मला जे आशीर्वाद दिले, इतकं प्रेम, खूप आशीर्वाद दिले, ते मी कधीही विसरणार नाही. गेल्या काही काळात मला कर्नाटकच्या अनेक भागांना भेट देण्याची संधी मिळाली. बंगळूरू पासून ते बेळगावी पर्यंत, कलबुर्गी पासून ते शिमोगा पर्यंत, म्हैसूर पासून ते तुमकुरु पर्यंत, कन्नडिगा जनतेने मला जे अधिकाधिक प्रेम दिलं, आपलेपणा दिला, आपलं हे प्रेम, आपले आशीर्वाद भारावून टाकणारे आहेत. आपलं हे प्रेम माझ्यावर मोठं ऋण आहे, कर्ज आहे, आणि कर्नाटकच्या जनतेची सातत्त्याने सेवा करून मी या कर्जाची परतफेड करणार आहे. कर्नाटकच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद असावा, इथल्या युवा वर्गाला सतत पुढे जाण्यासाठी, रोजगाराच्या नवनवीन संधी मिळाव्यात, इथल्या माता-भगिनी अधिक सक्षम व्हाव्यात, याच दिशेने आम्ही एकत्र येऊन काम करत आहोत. भाजपाचं डबल इंजिन सरकार, कर्नाटकचा प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गाव, प्रत्येक वस्तीच्या संपूर्ण विकासाकरता प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आज धारवाडच्या या भूमीवर विकासाचा एक नवा प्रवाह सुरु होत आहे. विकासाचा हा प्रवाह हुबळी, धारवाड बरोबरच, संपूर्ण कर्नाटकच्या भविष्याचं सिंचन करण्याचं, त्याला फुलवण्याचं, भरभराटीला आणण्याचं काम करेल.

मित्रांनो,

शतकानुशतकं, आपलं धारवाड हे मलेनाडु आणि बयालू सीमेवरील गेटवे टाऊन, म्हणजेच प्रवेशद्वाराचं शहर म्हणून ओळखलं जातं. हे शहर वेगवेगळ्या प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या मुक्कामाचं शहर होतं. त्याने सर्वांचं मोठ्या मनानं स्वागत केलं, आणि प्रत्येकाकडून काहीतरी शिकून स्वतःलाही समृद्ध बनवलं. म्हणूनच धारवाड के केवळ एक प्रवेशद्वार राहिलं नाही, तर ते कर्नाटक आणि भारताच्या चेतनेचं एक प्रतिबिंब बनलं. याला कर्नाटकच्या सांस्कृतिक राजधानीच्या रूपातही ओळखलं जातं. धारवाडला इथल्या साहित्याने ओळख मिळवून दिली, ज्याने डॉ. डी. आर. बेंद्रे यांच्यासारखे साहित्यिक दिले. धारवाडची ओळख इथलं समृद्ध संगीत आहे, त्याने पंडित भीमसेन जोशी, गंगुबाई हनगल आणि बसवराज राजगुरू यांच्यासारखे संगीत क्षेत्रातले दिग्गज दिले. धारवाडच्या या भूमीने पंडित कुमार गंधर्व, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यासारखी रत्न दिली आहेत, आणि धारवाडची ओळख इथली चव देखील आहे. असं कोण असेल, ज्याने एकदा धारवाडच्या पेढ्याचा आस्वाद घेतला, आणि आणि त्याला तो परत खाण्याचा मोह नाही झाला. पण आमचे सहकारी प्रल्हाद जोशी माझ्या प्रकृतीची खूप काळजी घेतात, म्हणून आज त्यांनी मला पेढा दिला, पण तो बंद खोक्यामधून दिला.

मित्रहो,

आज धारवाडमध्ये आयआयटीचं हे नवीन कॅम्पस सरू होण्याचा दुहेरी आनंद आहे. इथे या बाजूला हिंदी समजतं. हे कॅम्पस धारवाडची ओळख आणखी दृढ करण्याचं काम करेल.

मित्रांनो,

इथे येण्यापूर्वी मी मंड्या इथे होतो. मंड्यामध्ये मला 'बंगळूरू-म्हैसूर द्रुतगती मार्गाचं’ कर्नाटकच्या आणि देशाच्या जनतेसाठी लोकार्पण करण्याचं भाग्य लाभलं. हा द्रुतगती महामार्ग कर्नाटकला जगाचं सॉफ्टवेयर आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून पुढे घेऊन जाण्याचा मार्ग मोकळा करेल. अत्ता, काही दिवसांपूर्वीच बेळगावी मध्ये अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी झाली होती. शिमोगा इथे कुवेम्पु विमानतळाचं उद्घाटनही झालं होतं. आणि आता धारवाड मध्ये आयआयटीचं हे नवीन कॅम्पस, कर्नाटकच्या विकास यात्रेमधला नवा अध्याय लिहित आहे. एक संस्था म्हणून इथल्या हाय-टेक सुविधा, आयआयटी धारवाडला, जगातल्या सर्वोत्तम संस्थांच्या बरोबरीला जाऊन पोहोचण्याची प्रेरणा देईल.

मित्रहो,

ही संस्था भाजपाच्या ‘संकल्पा पासून ते सिद्धी पर्यंत’चं उदाहरणही आहे. चार वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2019 मध्ये मी या आधुनिक संस्थेची पायाभरणी केली होती. मध्यंतरी कोरोना काळ होता, कामामध्ये अनेक अडथळे होते. पण, तरीही मला आनंद वाटत आहे, की चार वर्षांच्या आत आयआयटी धारवाड, आज एक भविष्याचा वेध घेणारी संस्था म्हणून सज्ज झाली आहे. पायाभरणी पासून, ते लोकार्पणा पर्यंत डबल इंजिन सरकार याच गतीने काम करतं आणि माझा तर हा संकल्प असतो, की ज्याची पायाभरणी आम्ही करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करू. चालेल, होत राहील, पायाभरणी करू, कोनशीला ठेवू, आणि विसरून जाऊ, तो काळ आता मागे पडला.

मित्रहो,

शैक्षणिक संस्थांचा विस्तार झाला, तर त्यांच्या ब्रँडवर परिणाम होईल, असा विचार स्वातंत्र्यानंतरची अनेक दशकं आपल्याकडे होता. या विचारामुळे देशाच्या युवा पिढीचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, आता नवा भारत, तरुण भारत, हा जुना विचार मागे सोडून पुढे वाटचाल करत आहे. चांगलं शिक्षण सर्वदूर पोहोचलं पाहिजे, प्रत्येकाला मिळायला हवं. उत्तम संस्था जेवढ्या असतील, तेवढंच जास्तीतीजास्त लोकांपर्यंत चांगलं शिक्षण पोहोचेल. याच कारणामुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतात शैक्षणिक संस्थांची संख्या सातत्त्याने वाढत आहे. आम्ही एम्स (AIIMS) ची संख्या तिप्पट केली. स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांमध्ये देशात केवळ 380 वैद्यकीय महाविद्यालयं होती, तर गेल्या केवळ नऊ वर्षांत देशात 250 वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करण्यात आली आहेत. या नऊ वर्षांमध्ये देशात अनेक नवीन आयआयएम आणि आयआयटी सुरु झाल्या आहेत. आजचा हा कार्यक्रमही भाजपाच्या याच वचनबद्धतेचं प्रतीक आहे.

मित्रांनो,

एकवीसाव्या शतकातला भारत, आपल्या शहरांना आधुनिक बनवत पुढे निघाला आहे. भाजपा सरकारने हुबळी-धारवाडचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला होता. आज या योजने अंतर्गत, इथे अनेक स्मार्ट प्रकल्पांचं लोकार्पण झालं आहे. या व्यतिरिक्त एका क्रीडा संकुलाची पायाभरणी करण्यात आली आहे. तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि स्मार्ट प्रशासन, यामुळे येणाऱ्या काळात हुबळी धारवाडचा हा परिसर विकासाची नवी उंची गाठेल.

 

मित्रहो,

कर्नाटकात श्री जयदेव हॉस्पिटल ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्सेस अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, या संस्थेची मोठी विश्वासार्हता आहे. बंगळूरू, म्हैसूर आणि कलबुर्गीमधे संस्थेच्या शाखा सेवा पुरवत आहे. आज हुबळी इथे या संस्थेच्या नवीन शाखेची पायाभरणी करण्यात आली आहे. ती सुरु झाल्यावर या भागातल्या जनतेची मोठी सोय होईल. हा परिसर आधीपासूनच आरोग्य सेवेचं केंद्र आहे. आता नवीन रुग्णालयाचा फायदा इथल्या जास्तीतजास्त जनतेला मिळेल.

मित्रांनो,

धारवाड आणि आसपासच्या भागात पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकार एकत्र मिळून काम करत आहेत. जल जीवन मिशनच्या अंतर्गत इथे एक हजार कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या योजनेचा शिलान्यास झाला आहे. या योजनेद्वारे रेणुका सागर जलाशय आणि मालाप्रभा नदीचं पाणी नळातून सव्वा लाखांहून जास्त घरांपर्यंत पोहोचवलं जाईल. धारवाड मध्ये नवा जलप्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाला की त्याचा फायदा संपूर्ण जिल्ह्यातील लोकांना होईल. आज तुपरीहल्ला पूर नुकसान नियामक प्रकल्पाची कोनशिला सुद्धा बसवण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पुरामुळे होणारं नुकसान कमी करता येईल.

मित्रहो,

आज मला आणखी एका गोष्टीचा आनंद होऊन खूप बरं वाटत आहे. कर्नाटकनं दळणवळणाच्या बाबतीत आज एक आणखी मोठा टप्पा गाठला आहे. आणि कर्नाटकला हा गौरव मिळवून देण्याचं भाग्य हुबळीला लाभलं आहे. आता सिद्धरुधा स्वामीजी रेल्वे स्थानकात जगातला सगळ्यात मोठा फलाट तयार झाला आहे. परंतु हा फक्त एक विक्रम नाहीय, हा फक्त फलाटाचा विस्तार नाहीय. हा विस्तार, पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमच्या विचाराचा आहे. होस्पेट–हुबळी–तिनईघाट क्षेत्राचं विद्युतीकरण आणि होस्पेट रेल्वे स्थानकाचं आधुनिकीकरण, आमच्या याच दूरदृष्टीला बळ पुरवतं. या मार्गावरून उद्योगांसाठी कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या मार्गाचं विद्युतीकरण झाल्यानंतर डिझेलवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी होऊन पर्यावरणाचं रक्षण होणार आहे. या सर्व प्रयत्नांमुळे या भागाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल आणि पर्यटनाला चालना मिळेल.

बंधू आणि भगिनींनो,

चांगल्या पायाभूत सुविधा, आधुनिक पायाभूत सुविधा केवळ नेत्रसुख देण्यासाठी नसतात, तर त्या जीवन सुकर करण्यासाठी, जगणं सोपं करण्यासाठी असतात. त्यातून आपण पाहिलेली स्वप्नं साकार होण्याचा मार्ग मोकळा होतो. जेव्हा आपल्याकडे चांगले रस्ते नव्हते, चांगली रुग्णालयं नव्हती तेव्हा प्रत्येक वर्गातील, प्रत्येक वयोगटातील लोकांना किती त्रास सहन करावा लागत होता! मात्र, आज नवभारतात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होत असताना प्रत्येकाला त्याचे फायदे मिळत आहेत. चांगल्या रस्त्यांमुळे शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या युवावर्गाचा प्रवास सुखद होतो. आधुनिक महामार्गांचा फायदा शेतकरी, श्रमिक, व्यापारी, कार्यालयात जाणारे, मध्यमवर्गीय, सर्वांना होतो. म्हणूनच प्रत्येकाला चांगल्या-आधुनिक पायाभूत सुविधा हव्या आहेत. आणि मला आनंद आहे की गेल्या 9 वर्षांपासून देश आपल्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी निरंतर काम करत आहे. गेल्या 9 वर्षात प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून देशातील खेड्यापाड्यात रस्त्यांचं जाळं दुपटीहून जास्त वाढलं आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यात 55 टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. केवळ रस्तेच नाही तर आज देशात विमानतळं आणि रेल्वेमार्गांचाही अभूतपूर्व विस्तार होत आहे. गेल्या 9 वर्षांत देशातील विमानतळांची संख्या दुपटीनं वाढली आहे.

मित्रांनो,

देशात 2014 च्या आधी इंटरनेट आणि भारताच्या डिजिटल सामर्थ्याबद्दल फारच कमी बोललं जात होतं. मात्र आज भारत जगातील सर्वात समर्थ डिजिटल अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. हे घडलं कारण आम्ही इंटरनेट परवडणाऱ्या दरात उपलब्ध करुन दिलं, प्रत्येक गावात इंटरनेट पोहोचवलं. गेल्या 9 वर्षात, दररोज, सरासरी अडीच लाख ब्रॉडबँड जोडण्या दिल्या गेल्या आहेत, प्रत्येक दिवशी अडीच लाख जोडण्या!

पायाभूत सुविधांच्या विकासात ही गती येत आहे कारण आज देशाच्या आणि देशवासीयांच्या गरजेनुसार पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. यापूर्वी राजकीय नफा-तोटा पाहून रेल्वे-रस्त्याचे असे प्रकल्प जाहीर केले जात होते. आम्ही संपूर्ण देशासाठी प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन हा विकासाचा आराखडा घेऊन आलो आहोत, जेणेकरून देशात जिथे जिथे गरज असेल तिथे जलद गतीनं पायाभूत सुविधा निर्माण करता येतील.

मित्रहो,

आज देशात सामाजिक पायाभूत सुविधांवर सुद्धा विलक्षण काम होत आहे. 2014 सालापर्यंत देशातल्या बऱ्याच लोकांकडे स्वतःचं पक्क घर नव्हतं. शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आमच्या भगिनींना किती त्रास सहन करावा लागत होता. सरपणाची व्यवस्था करणं, पिण्याचं पाणी दूर अंतरावरुन आणणं या सगळ्या गोष्टींमध्येच आमच्या भगिनींचा संपूर्ण वेळ जात असे. गरीबांसाठी रुग्णालयांची कमतरता होती. रुग्णालयात उपचार महागडे होते. आम्ही एकेक करून या समस्यांवर उपाय शोधले. गरिबांना स्वतःचं पक्क घर मिळालं, वीज-गॅस जोडण्या मिळाल्या, शौचालयं मिळाली. आता प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहेत. गावागावात घराजवळ चांगली रुग्णालयं निर्माण होत आहेत, दर्जेदार शिक्षण पुरवणारी महाविद्यालयं-विद्यापीठं उभारली जात आहेत. म्हणजेच आज आपण आपल्या युवा वर्गाला, येत्या 25 वर्षात आपल्या संकल्पपूर्तीसाठी मदत करेल अशी साधनसामुग्री, सोयीसुविधा पुरवत आहोत.

मित्रांनो,

आज या भगवान बसवेश्वरांच्या भूमीत येऊन मला अगदी धन्य धन्य वाटत आहे. भगवान बसवेश्वरांच्या अनेक योगदानांपैकी सगळ्यात प्रमुख योगदान आहे, अनुभव मंडपमची स्थापना! अनुभव मंडपम या लोकशाही व्यवस्थेचा जगभरात अभ्यास केला जातो. आणि अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांमुळे आपण दाव्यासहीत म्हणतो की भारत ही केवळ सर्वात मोठी लोकशाही नाही तर भारत लोकशाहीची जननी देखील आहे. काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये बसवेश्वरांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली हे माझं मोठं भाग्य आहे. लंडनमध्ये भगवान बसवेश्वर, लोकशाहीच्या भक्कम पायाचं प्रतीक अनुभव मंडपम! हे भगवान बसवेश्वर, त्यांची लंडनच्या भूमीवर मूर्ती आहे, मात्र भारताच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करण्याचं काम लंडनमध्येच झालं हे दुर्दैव आहे. भारताच्या लोकशाहीची मुळं आपल्या शतकानुशतकांच्या जुन्या इतिहासातून जोपासली गेली आहेत. जगातील कोणतीही शक्ती भारताच्या लोकशाही परंपरांना धक्का पोहोचवू शकत नाही. असं असूनही काही लोक सातत्यानं भारताच्या लोकशाहीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत. असे लोक खरं तर भगवान बसवेश्वरांचा अपमान करत आहेत. असे लोक कर्नाटकातील जनतेचा, भारताच्या महान परंपरेचा, भारताच्या 130 कोटी सुजाण नागरिकांचा अपमान करत आहेत. अशा लोकांपासून कर्नाटकातील जनतेलाही सावध रहायला हवं.

मित्रहो,

गेल्या काही वर्षांत कर्नाटकनं ज्याप्रकारे भारताला तंत्रज्ञानातील भवितव्य म्हणून ओळख मिळवून दिली आहे, तीच ओळख आणखी पुढे नेण्याची, पक्की करण्याची वेळ आली आहे. कर्नाटक हे हायटेक इंडियाचं, उच्चतंत्रज्ञान निपुण भारताचं इंजिन आहे. या इंजिनाला दुहेरी इंजिन सरकारचं बळ मिळणं अत्यंत गरजेचं आहे.

मित्रांनो,

हुबळी-धारवाडच्या जनतेचं पुन्हा एकदा या विकास प्रकल्पांसाठी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! माझ्या सोबत बोला – भारत मातेचा विजय असो! दोन्ही हात वर करुन सर्वशक्तीनिशी म्हणा – भारत मातेचा विजय असो, भारत मातेचा विजय असो, भारत मातेचा विजय असो!

खूप खूप आभार!

 

***

S.Thakur/R.Agashe/A.Save/CYadav

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906266) Visitor Counter : 141