माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाच्या (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो-पीआयबी) प्रधान महासंचालक पदाचा राजेश मल्होत्रा यांनी स्वीकारला पदभार

Posted On: 01 MAR 2023 3:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मार्च 2023

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) अर्थात पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक म्हणून राजेश मल्होत्रा यांनी आज पदभार स्वीकारला. सत्येंद्र प्रकाश काल निवृत्त झाल्यानंतर मल्होत्रा यांनी प्रधान महासंचालक पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

राजेश मल्होत्रा हे भारतीय माहिती सेवा (आयआयएस) च्या  1989 तुकडीतील अधिकारी असून जानेवारी 2018 पासून वित्त मंत्रालयात कार्यरत होते. कोविड-19 महामारीच्या काळात, जनतेला  दिलासा देण्यासाठी आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने वेळोवेळी  जाहीर केलेल्या विविध आत्मनिर्भर भारत योजना लोकांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी त्यांनी अर्थ मंत्रालयातील माध्यम आणि दळणवळण, संपर्क धोरण प्रभावीपणे राबविले.

मल्होत्रा यांच्याकडेवित्त, कंपनीव्यवहार, कृषी, ऊर्जा, कोळसा, खाण, दळणवळण आणि आयटी, वस्त्रोद्योग, कामगार, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा यासह केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांसाठी माध्यमे आणि संपर्क धोरणांचे नियोजन आणि अंमलबजावणीचा 32 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.  ते भारतीय निवडणूक आयोगामध्‍ये 21 वर्षे (1996-2017) प्रसारमाध्यम आणि संपर्क प्रभारी म्हणून कार्यरत होते. निवडणूक आयोगाने घेतलेल्या अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकांसह लोकसभेच्या (संसदेचे कनिष्ठ सभागृह) सहा सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान माध्यम आणि संवाद धोरणांचे नियोजन आणि अंमलबजावणी त्यांनी केली. या कालावधीत मल्होत्रा यांनी 12 मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत काम केले आहे.

मल्होत्रा यांनी गाझियाबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ  मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी (आयएमटी) येथून उद्योग व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका घेतली आहे आणि हैदराबादच्या नॅशनल अकॅडमी ऑफ लिगल स्टडीज (NALSAR) येथून माध्यमविषयक कायद्यांमध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील सार्वजनिक धोरण विश्लेषण, इंग्लंडमधील थॉमसन फाउंडेशन येथे माध्यम व्यवस्थापन आणि धोरणे हा अभ्यासक्रम तसेच आणि लखनऊ आयआयएम तर्फे नवी दिल्लीत आयोजित 'मार्केटिंग: द विनिंग कन्सेप्ट्स अँड प्रॅक्टिसेस' या विषयावरील अल्प-मुदतीचा  अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला आहे. ते इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सहकारी सदस्य आहेत आणि त्यांनी कायद्याची पदवी देखील घेतली आहे.

सरकार आणि प्रसारमाध्यमे यांच्यातील दुहेरी मार्गी दुवा बनत यशस्वी संपर्क आणि संवाद साधण्यासाठी एक प्रवक्ता म्हणून मल्होत्रा यांना प्रदीर्घ अनुभव आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कारकिर्दीत विविध मंत्रालयांमध्ये वेगवेगळ्या कामांदरम्यान त्यांनी आणीबाणीच्या परिस्थितीचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले आहे आणि प्रसारमाध्यमांमध्ये केवळ योग्य दृष्टीकोन/माहितीच प्रसारित केली जाईलयाची ग्वाही दिली आहे. त्यांच्या कारकिर्दीत ते भारतातील विविध मंत्रालयीन शिष्टमंडळांचा अविभाज्य भाग असल्याने आंतरराष्ट्रीय परिषदा/ कार्यक्रमांच्या माध्यम समन्वयाचा त्यांना विस्तृत अनुभव आहे.

 

S.Bedekar/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1903359) Visitor Counter : 349