युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

आयआयएम रायपूर येथे युथ 20 सल्लामसलत कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी तरुणांचा उत्साही सहभाग


‘युवा संवाद’ मध्ये अनुराग सिंग ठाकूर यांचा सहभागींसोबत संवाद

भारत आता 107 युनिकॉर्नसह जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे: अनुराग सिंह ठाकूर

Posted On: 26 FEB 2023 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2023

 

आयआयएम  रायपूरने दोन दिवसांच्या  Y20 सल्लामसलत कार्यक्रमाचे  मोठ्या उत्साहात  यशस्वी आयोजन केले. काल 25 फेब्रुवारी 2023 रोजी पहिल्या दिवसाच्या चर्चासत्रात भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्यासोबत महत्त्वाचा  'युवा संवाद’ संस्मरणीय ठरला.  या कार्यक्रमासाठी  विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला . तत्पूर्वी, काल सकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री डॉ. रेणुका सिंग,  आयआयएम रायपूरचे संचालक डॉ. राम कुमार काकानी आणि इतर मान्यवर  पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले.

आपल्या भाषणात अनुराग ठाकूर यांनी जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी, प्रतिभा दर्शवण्याकरिता संधी पुरवण्यासाठी आणि अंतर भरून काढण्यासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.  भारत आता 107 युनिकॉर्नसह जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी  स्टार्टअप परिसंस्था असल्याबद्दल ठाकूर यांनी अभिमान व्यक्त केला.   त्यांनी छत्तीसगडच्या तरुणांचे  क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा लाभ घेतल्याबद्दल आणि अतुलनीय जोम, ऊर्जा  आणि उत्साह याबद्दल कौतुक केले.  "तुमचे संपर्क  ही तुमची निव्वळ संपत्ती आहे." असे त्यांनी सांगितले.  अनुराग ठाकूर यांनी तरुण व्यक्तींना त्यांचे संपर्कजाळे  वाढवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची आणि कार्याची क्षितिजे विस्तृत करण्यासाठी लोकांशी अधिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रेरित केले.  तरुणांनी जास्तीत जास्त वाव मिळवण्यासाठी  आणि अनुभव घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रवास करावा,असेही त्यांनी सुचवले.  "तूच वर्तमान आहेस, तूच जगाची आशा आहेस" अशा शब्दात त्यांनी समारोप केला.

ठाकूर यांच्याशी  झालेल्या संवादादरम्यान तरुणांनी राजकारणात तरुणांचा सहभाग, विकासदर  वाढवणे, स्व-सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे त्यांच्या मूळ देशात योगदान इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले. या सत्रातून मिळालेली मोठी शिकवण म्हणजे सतत शिकणे आणि नवीन कौशल्ये आत्मसात करणे, यामुळे  तरुण त्यांच्या राष्ट्राच्या प्रगतीत सहभागी होण्यासाठी आणि शांतता संवर्धित करण्यासाठी सक्षम होऊ शकतात.  आयआयएम  रायपूरच्या लोगोमध्ये पारंपारिक कलेचा वापर पाहून अनुराग सिंह ठाकूर प्रभावित झाले.

रेणुका सिंग सरुता यांनी Y20 सल्लामसलत कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले.  भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात  आणि देशाच्या प्रगतीत योगदान दिलेल्या  सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली  वाहण्याचा हा एक योग्य क्षण आहे,असे त्या म्हणाल्या.   भारताला कितीही संकटांचा सामना करावा लागला असला तरी,  जागतिक शांतता वृद्धिंगत करण्यात स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये संघर्ष कसा रोखला गेला,ते त्यांनी सांगितले तिथे तरुणांची आता भरभराट होत असल्याचे त्या म्हणाल्या.  या Y20 सल्लामसलतीमधील चर्चांमुळे  शांतता वृद्धिंगत करण्यात आणि आम्हाला "वसुधैव  कुटुंबकम" चे ध्येय साध्य करण्यात मदत होईल, असा आशावाद सरुता यांनी व्यक्त केला. 

रायपूरच्या आयआयएमचे  संचालक डॉ. राम कुमार काकानी यांनी स्वागतपर भाषण केले. वाय ट्वेंटी (Y20) सल्लामसलत कार्यक्रम हा जागतिक परिवर्तनाचा एक शक्तिशाली दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  दहशतवाद, समाजवादी गट आणि सामाजिक सरंजामशाहीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र येण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शांतता आणि सौहार्द टिकून राहावे यासाठी आंतर-समुदाय संवाद महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी सहभागींना संपूर्ण कार्यक्रमात सक्रिय चर्चा आणि विचारमंथन सत्रांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील केले, जेणेकरून ते जगातील सर्वात महत्त्वाच्या समस्यांवर नाविन्यपूर्ण असे तोडगे शोधू शकतील.

हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, पाहुण्यांनी आयआयएम, रायपूर परिसराचा फेरफटका मारला. भारताकडून साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष  2023 च्या निमित्ताने यावेळी पाहुण्यांना भरड धान्यांपासून बनवलेला नाश्ता दिला गेला.

यावेळी झालेल्या चर्चांमधून, मुख्य भाषणांमधून, आणि युवा संवाद सत्रांमधून समाजाची  बांधणी, एकमत-निर्माण करणे  आणि सलोखा यावर विविध दृष्टीकोनांवर उहापोह झाला. जटिल सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार्यात्मक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाची आवश्यकता देखील अधोरेखित झाली. या कार्यक्रमाचे यश, हे आयआयएम (IIM) रायपूरची नेतृत्व आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि भविष्यात या कार्याला गती देण्याप्रति   वचनबद्धता सिद्ध करते.

 

* * *

S.Kane/S.Kakade/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1902577) Visitor Counter : 142