पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (98 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

Posted On: 26 FEB 2023 11:40AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2023

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ च्या या 98 व्या भागात तुम्हा सर्वांसोबत चर्चा करताना मला खूप आनंद होत आहे. 100 व्या भागाकडे वाटचाल करणाऱ्या या प्रवासात, ‘मन की बात’ ला तुम्ही सर्वांनी लोकसहभागाच्या अभिव्यक्तीचे एक अप्रतिम व्यासपीठ बनविले आहे. प्रत्येक महिन्याला, लाखो संदेशांच्या माध्यमातून कित्येक लोकांची ‘मन की बात’ माझ्या पर्यंत पोहोचते. तुम्हाला तर तुमच्या मनाची ताकद माहीतच आहे, त्याचप्रमाणे समाजाच्या ताकदीने कशाप्रकारे देशाची ताकद वृद्धिंगत होते, हे आपण ‘मन की बात’ च्या वेगवेगळ्या भागांमधून पाहिले आहे, समजून घेतले आहे आणि मी याचा अनुभव घेतला आहे – स्वीकारले देखील आहे. मला तो दिवस आठवतो जेव्हा आम्ही ‘मन की बात’ मध्ये भारतातील पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देण्याबाबत बोललो होतो. त्यावेळी लगेचच देशात भारतीय खेळांमध्ये सहभागी होण्याची, त्यांचा आनंद घेण्याची, ते शिकण्याची एक लाट निर्माण झाली. ‘मन की बात’ मध्ये जेव्हा भारतीय खेळण्यांची चर्चा झाली, तेव्हा देशातील लोकांनी लगेचच याला देखील प्रोत्साहन दिले. आता तर भारतीय खेळण्यांची इतकी क्रेझ झाली आहे की परदेशात देखील याची मागणी खूपच वाढत आहे. जेव्हा आम्ही 'मन की बात' मध्ये कथा-कथनाच्या भारतीय शैलींबद्दल बोललो तेव्हा त्यांची कीर्तीही दूरवर पोहोचली. भारतीय कथा-कथन प्रकारांकडे लोक अधिकाधिक आकर्षित होत आहेत.

मित्रांनो, तुम्हाला लक्षात असेल, सरदार पटेल यांची जयंती अर्थात ‘एकता दिवस’ चे औचित्य साधत ‘मन की बात’ मध्ये आम्ही तीन स्पर्धांची घोषणा केली होती. या स्पर्धेत देशभक्तीपर 'गाणी’, 'अंगाई, आणि 'रांगोळी' यांचा समावेश होता. मला कळविण्यात आनंद होत आहे की, देशभरातील 700 हून अधिक जिल्ह्यांतील 5 लाखांहून अधिक लोकांनी यात उत्साहाने सहभाग घेतला आहे. यामध्ये लहान मुले, युवक, ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि 20 हून अधिक भाषांमध्ये आपल्या प्रवेशिका पाठवल्या. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मी अभिनंदन करतो. तुमच्यातील प्रत्येकजण विजेता आहे, कलेचा उपासक आहे. देशाच्या विविधतेबद्दल आणि संस्कृतीबद्दल तुमच्या मनात किती प्रेम आहे हे  तुम्ही सर्वांनी दाखवून दिले आहे.

मित्रांनो, आज या क्षणी मला लता मंगेशकर, लता दीदी यांची आठवण येणे हे अगदीच स्वाभाविक आहे. कारण ज्या दिवशी या स्पर्धेची घोषणा झाली होती, त्यादिवशी लता दिदींनी ट्वीट करून देशवासियांना या उपक्रमात सहभागी होण्याचा आग्रह केला होता. 

मित्रांनो, अंगाई लेखन स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील बी.एम. मंजुनाथजी यांनी पटकावले आहे. कन्नडमध्ये लिहिलेल्या‘ मलगू कन्दा’ (Malagu Kanda)या अंगाईसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ही अंगाई लिहिण्याची प्रेरणा त्यांना त्यांची आई आणि आजींनी गायलेल्या अंगाई मधून मिळाली आहे. ही अंगाई ऐकल्यावर तुम्हालाही तो आनंद मिळेल.

“निज रे माझ्या बाळा, 
माझ्या शहाण्या बाळा, निज तू,
सांज होऊन मिट्ट काळोख पसरला आहे, 
निद्र देवी येईल, 
चांदण्याच्या बागेतून, स्वप्ने घेऊन येईल, 
निज रे बाळा, निज रे बाळा,
जोजो...जो..जो..
जोजो...जो..जो..”

आसाममधील कामरूप जिल्ह्यातील दिनेश गोवाला यांनी या स्पर्धेत दुसरे पारितोषिक पटकावले आहे. त्यांनी लिहिलेल्या अंगाई मध्ये मातीची आणि धातूची भांडी बनवणाऱ्या स्थानिक कारागिरांच्या लोकप्रिय कलाकृतीचा ठसा आहे.

कुंभार दादा झोळी घेऊन आले आहेत,
झोळीमध्ये काय आहे?
कुंभाराची झोळी उघडून पाहिले तर,
झोळीत होती सुंदरशी वाटी!
आमच्या छकुलीने कुंभाराला विचारले,
कशी दिली ही छोटीशी वाटी!

गाणी आणि अंगाई प्रमाणेच रांगोळी स्पर्धाही खूप गाजली. सहभागींनी एकापेक्षा एक सुंदर रांगोळ्या काढून पाठवल्या. यामध्ये पंजाबच्या कमल कुमार विजेते ठरले. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अमर शहीद वीर भगतसिंग यांची अतिशय सुंदर रांगोळी काढली होती. महाराष्ट्रातील सांगली येथील सचिन नरेंद्र अवसारी यांनी आपल्या रांगोळीत जालियनवाला बाग, तेथील हत्याकांड आणि शहीद उधम सिंग यांचे शौर्य चित्रित केले होते. गोव्याचे रहिवासी गुरुदत्त वांटेकर यांनी गांधीजींची रांगोळी काढली, तर पुद्दुचेरीतील मालतीसेल्वम यांनीही अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांवर लक्ष केंद्रित केले.देशभक्तीपर गीत स्पर्धेच्या विजेत्या टी. विजय दुर्गाजी या आंध्र प्रदेशच्या आहेत. त्यांनी तेलुगुमध्ये प्रवेशिका पाठवली होती. त्यांच्या क्षेत्रातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक नरसिंह रेड्डी गारू जी यांच्याकडून त्यांना खूप प्रेरणा मिळाली आहे. तुम्हीही ऐका विजय दुर्गाजींच्या प्रवेशिकेचा हा भाग

रेनाडू प्रांताचा सूर्य,
हे शूर नरसिंहा !
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे तुम्ही अंकुर आहात, अंकुश आहात!
इंग्रजांच्या अन्यायकारक आणि निरंकुश दडपशाही पाहून
तुमचे रक्त खवळले आणि आगीचा डोंब उसळला!
रेनाडू प्रांताचा सूर्य,
हे शूर नरसिंहा !

तेलुगु नंतर आता मी तुम्हाला मैथिली मधील एक ध्वनिफीत ऐकवतो.  ही दीपक वत्स जी यांनी पाठवली आहे. या स्पर्धेत त्यांनी देखील बक्षीस पटकावले आहे.

भारत जगाचा अभिमान आहे,
आपला देश महान आहे,
तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला,
उत्तरेकडे विशाल कैलाश आहे,
गंगा, यमुना, कृष्णा, कावेरी,
कोशी, कमला बलान आहे,
आपला देश महान आहे.
तिरंग्यात आमचा प्राण आहे

मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हे नक्की आवडले असेल. स्पर्धेत आलेल्या अशा प्रवेशिकांची यादी खूप मोठी आहे. तुम्ही सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाऊन, तुमच्या कुटुंबासह या प्रवेशिका पहा आणि ऐका - तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, गोष्ट वाराणसीची असो, शहनाईबद्दल असो, उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्याबद्दल असो, माझे लक्ष त्याकडे जाणे स्वाभाविक आहे. काही दिवसांपूर्वी 'उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार' प्रदान केले. संगीत आणि प्रायोगिक कला (परफॉर्मिंग आर्ट्स) क्षेत्रातील उदयोन्मुख, प्रतिभावान कलाकारांना हे पुरस्कार दिले जातात.हे पुरस्कार कला आणि संगीत जगताची लोकप्रियता वाढवण्यासोबतच त्यांना समृद्ध करण्यात देखील आपला हातभार लावत आहेत. काळानुसार ज्या वाद्यांची लोकप्रियता कमी होत चालली होती अशा वाद्यांना नव संजीवनी प्रदान करणाऱ्या कलाकारांचा देखील यात समावेश आहे. आता तुम्ही सर्व ही धून नीट ऐका.....

हे कोणते वाद्य आहे तुम्हाला माहीत आहे का? शक्यता फारच कमी आहे! या वाद्याचे नाव 'सुरसिंगार' असून ही धून जयदीप मुखर्जी यांनी संगीतबद्ध केली आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्काराने सन्मानित तरुणांमध्ये जयदीप जी यांचा समावेश आहे.50 आणि 60  च्या दशकापासूनच हे वाद्य ऐकायला मिळणे दुर्मिळ झाले होते, पण सुरसिंगारला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी जयदीप प्रयत्नशील आहेत. 

त्याचप्रमाणे उप्पलपू नागमणी जी यांचा प्रयत्न देखील खूप प्रेरणादायी आहे, ज्यांना मँडोलिनमध्ये कर्नाटक शैलीतील वादनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर दुसरीकडे संग्रामसिंह सुहास भंडारे यांना वारकरी परंपरेतील कीर्तनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. या यादीत केवळ संगीताशी निगडीत कलाकार नाहीत - व्ही दुर्गा देवी जी यांना 'करकट्टम' या प्राचीन नृत्य प्रकारासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

या पुरस्काराचे आणखी एक विजेते, राज कुमार नायक जी यांनी तेलंगणातील 31 जिल्ह्यांमध्ये 101 दिवस चालणाऱ्या पेरीनी ओडिसीचे आयोजन केले होते. आज लोक त्यांना पेरिनी राजकुमार या नावाने ओळखतात. पेरिनी नाट्यम, शंकराला समर्पित एक नृत्य आहे जे काकतीय राजवटीत खूप लोकप्रिय होते. या घराण्याची मुळे आजच्या तेलंगणाशी संबंधित आहेत.साइखौमसुरचंद्रासिंहहे आणखी एक पुरस्कार विजेते आहेत. हे मैतेईपुंग वाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. हे वाद्य मणिपूरचे आहे. पूरण सिंग हा दिव्यांग कलाकार आहे, जो राजुला-मालुशाही, न्यौली, हुडका बोल, जागर अशा विविध संगीत प्रकारांना लोकप्रिय करत आहे. त्यांच्याशी संबंधित अनेक ध्वनिफीत देखील त्यांनी तयार केल्या आहेत. पूरण सिंह जी यांनी उत्तराखंडच्या लोकसंगीतात आपली प्रतिभा दाखवून अनेक पुरस्कारही जिंकले आहेत.वेळेच्या मर्यादेमुळे कदाचित सर्व पुरस्कार विजेत्यांबद्दल मला इथे बोलता येणार नाही, पण मला खात्री आहे की तुम्ही त्यांच्याबद्दल नक्कीच वाचाल. मला आशा आहे की हे सर्व कलाकार,प्रयोगिक कलेला अधिक लोकप्रिय करण्यासाठी तळागाळातील प्रत्येकाला प्रेरणा देत राहतील.

माझ्या प्रिय देशवासियांनो, वेगाने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशात डिजिटल इंडियाची ताकद प्रत्येक काना-कोपऱ्यात दिसत आहे. डिजिटल इंडियाची शक्ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात विविध अॅप्सचा मोठा वाटा आहे. असेच एक अॅप म्हणजे ई-संजीवनी. या अॅपवरून टेलि-कन्सल्टेशन, म्हणजे दूर बसून, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, तुम्ही तुमच्या आजाराबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.आतापर्यंत हे अॅप वापरणाऱ्या टेलि-कन्सल्टेशनची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे. तुम्ही कल्पना करू शकता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 10 कोटी टेलि-कन्सल्टेशन! रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील अप्रतिम नाते –हे एक मोठे यश आहे. या यशाबद्दल मी सर्व डॉक्टर्स आणि या सुविधेचा लाभ घेतलेल्या रुग्णांचे अभिनंदन करतो.भारतातील लोकांनी तंत्रज्ञानाला कशाप्रकारे आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे. आपण पाहिलं आहे की, कोरोनाकाळात ई-संजीवनी अॅपच्या माध्यमातून टेलि-कन्सल्टेशन लोकांसाठी एक उत्तम वरदान ठरलं. मलाही वाटले की, 'मन की बात'मध्ये आपण एक डॉक्टर आणि एका रुग्णाशी याविषयी बोलून, संवाद साधून ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावी. लोकांसाठी टेलि-कन्सल्टेशन किती प्रभावी ठरले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आमच्यासोबत सिक्कीमचे डॉ. मदन मणिआहेत. डॉ. मदन मणी सिक्कीममध्ये राहतात, परंतु त्यांनी धनबादमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे आणि बनारस हिंदू विद्यापीठातून एमडी केले. त्यांनी ग्रामीण भागातील शेकडो लोकांना त्यांनी टेलि-कन्सल्टेशनची सेवा दिली आहे.

पंतप्रधान : नमस्कार......नमस्कार मदन मणि जी. 

डॉ. मदन मणि: नमस्कार सर.

पंतप्रधान : मी नरेंद्र मोदी बोलत आहे. 

डॉ. मदन मणि : हो...हो सर. 

पंतप्रधान : तुमचे शिक्षण वाराणसी मध्ये झाले आहे.

डॉ. मदन मणि : हो, माझे शिक्षण वाराणसी मध्ये झाले आहे. 

पंतप्रधान : तुमचे वैद्यकीय शिक्षण तिथेच झाले आहे. 

डॉ. मदन मणि: हो....हो.

पंतप्रधान : तुम्ही जेव्हा वाराणसी मध्ये राहत होता तेव्हाचे वाराणसी आणि आजचे वाराणसी यातील बदल तुम्ही पाहायला की नाही.

डॉ. मदन मणि: पंतप्रधान जी, मी सिक्कीमला परत आल्यापासून मला तिथे जाणे शक्य झाले नाही, परंतु मी ऐकले आहे की खूपच बदल झाले आहेत. 

पंतप्रधान : वाराणसी सोडून तुम्हाला किती वर्ष झाली?

डॉ. मदन मणि : सर, मी 2006 ला वाराणसी सोडले.

पंतप्रधान : ओह...मग तर तुम्हाला नक्कीच जायला हवे.

डॉ. मदन मणि: हो.....हो.

पंतप्रधान: अच्छा, मी तुम्हाला फोन याकरिता केला आहे की, तुम्ही सिक्कीम मधील दुर्गम डोंगराळ भागात राहून तिथल्या लोकांना टेली कन्सल्टेशनची उत्तम सेवा प्रदान करत आहात.

डॉ. मदन मणि: हो. 

पंतप्रधान: मी ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना तुमचा अनुभव ऐकवू इच्छितो.

डॉ. मदन मणि: हो. 

पंतप्रधान: मला तुमचा अनुभव सांगा.

डॉ. मदन मणि: पंतप्रधान जी, अनुभव खूपच सुंदर आहे. सिक्कीम मध्ये लोकांना अगदी जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्यासाठी देखील कमीतकमी शंभर-दोनशे रुपयाचे गाडीभाडे लागते, आणि त्यानंतर देखील डॉक्टर मिळतील की नाही ही देखील एक समस्या असते. त्यामुळे टेलि कन्सल्टेशनच्या माध्यमातून दुर्गम भागातील लोकं थेट आमच्याशीसंपर्क साधतात. आरोग्य आणि कल्याण केंद्राचे सीएचओ त्यांना आमच्याशी जोडतात. आणि ते आम्हाला त्यांच्या जुन्या आजाराचे रिपोर्ट्स, त्यांची सध्याची स्थिती, सर्वकाही सांगतात.

पंतप्रधान : म्हणजे दस्तऐवज हस्तांतरित करता.

डॉ. मदन मणि: हो...हो. दस्तऐवज हस्तांतरित देखील करतात आणि जर हस्तांतरित नाही झाले तर ते आम्हांला वाचून दाखवतात. 

पंतप्रधान: तिथल्या कल्याण केंद्राचे डॉक्टर सांगतात.

डॉ. मदन मणि: कल्याण केंद्रात जे CHO असतात सामुदायिक आरोग्य अधिकारी ते वाचून दाखवतात. 

पंतप्रधान : आणि रुग्ण त्यांच्या समस्या थेट तुम्हाला सांगतात.

डॉ. मदन मणि:होय, रुग्ण आपल्या अडचणींबद्दल देखील सांगतो. मग जुन्या नोंदी पाहिल्यानंतर काही नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर. उदाहरणार्थ, एखाद्याचे पाय सुजले आहेत की नाही,  एखाद्याची छाती स्टेथोस्कोपने तपासायची की नाही? जर सीएचओने ते तपासले नसेल, तर आम्ही त्यांना पाहायला सांगतो,  सूज आहे की नाही हे पहा, डोळे तपासा, त्याला अशक्तपणा आहे की नाही, खोकला असेल तर छातीस्टेथोस्कोपने तपासा आणि तेथे आवाज आहे की नाही तपासा.

पंतप्रधान: तुम्ही Voice Call करता की व्हिडीओ कॉलचा देखील उपयोग करता?

डॉ. मदन मणि: होय, व्हिडीओ कॉलचा उपयोग करतो.

पंतप्रधान: म्हणजे तुम्ही देखील रुग्णाला बघता. 

डॉ. मदन मणि: होय, आम्ही रुग्णाला देखील बघू शकतो.

पंतप्रधान: रुग्णाला काय वाटते?

डॉ. मदन मणि:रुग्णाला बरे वाटते कारण तो डॉक्टरांना जवळून पाहू शकतो. औषधाचा डोस वाढवायचा आहे की कमी करायचा आहे या संभ्रमात तो असतो, कारण सिक्कीममधील बहुतेक रुग्ण हे मधुमेह, उच्च रक्तदाबाचे आहेत आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे औषध बदलण्यासाठी डॉक्टर शोधण्यासाठी त्याला किती दूर जावे लागते. परंतु टेली कन्सल्टेशनद्वारे ते तिथेच उपलब्ध होते आणि आरोग्य आणि कल्याण केंद्रामध्ये मोफत औषध उपक्रमाद्वारे त्याला औषध देखील उपलब्ध होतात. त्यामुळे तो तेथूनच औषध घेतो.

पंतप्रधान: बरं मदनमणि जी,तुम्हाला तर माहिती आहेच की जोपर्यंत डॉक्टर येत नाही रुग्णाला तपासात नाहीत तोपर्यंत त्याचे समाधान होत नाही हा रुग्णाचा स्वभाव आहे. आणि डॉक्टरांनाही वाटतं की त्यांना रुग्णाला भेटावं लागेल, आता तिथे संपूर्ण टेलिकॉमकन्सल्टेशनद्वारे होते, मग डॉक्टरांना काय वाटते, रुग्णाला काय वाटते?

डॉ. मदन मणि: जी, आम्हालाही वाटतं की जर रूग्णांना असं वाटत असेल की डॉक्टरांनी पहावं, तर आम्हा लोकांना ज्या ज्या गोष्टी पहायच्या असतात, त्या आम्ही लोक सीएचओंना सांगून, व्हिडिओमध्येही आम्ही पहायला सांगतो. आणि कधी कधी तर रूग्णांना व्हिडिओमध्येच आम्ही जवळ जाऊन रूग्णांना जे त्रास सोसावे लागतात, किंवा काही त्वचेच्या समस्या असतात, कातडीच्या समस्या असतील तर आम्ही लोकांना व्हिडिओमध्येच ते दाखवून देतो. त्यामुळे ते लोक संतुष्ट असतात. 

पंतप्रधान: आणि नंतर त्याच्यावर उपचार केल्यावर त्याला संतोष प्राप्त होतो, काय अनुभव येतो? रूग्ण बरे होत आहेत?

मदन मणि: जी, खूपच आनंद मिळतो. आम्हालाही आनंद होतो सर. कारण मी सध्या आरोग्य विभागात आहे आणि त्याबरोबरच मी टेलि कन्सलटेशनही करत असतो. त्यामुळे फाईलबरोबरच रूग्णाला पहाणे हाही माझ्यासाठी खूप छान, सुखद अनुभव असतो. 

पंतप्रधान: सरासरी आपल्याकडे किती टेलि कन्सल्टेशनची प्रकरणे येत असतात?

डॉ. मदन मणि: आतापर्यंत मी 536 रुग्ण पाहिले आहेत.                                       

पंतप्रधान: ओह... म्हणजे आपल्याला यात खूपच कौशल्य प्राप्त झालं आहे. 

डॉ. मदन मणि: जी. चांगलं वाटतं रूग्णांना पहाण्यात. 

पंतप्रधान: चला, मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या तंत्रज्ञानाचा उपयोग करत आपण सिक्कीमसारख्या दूरवरच्या दुर्गम जंगलांमध्ये, डोंगरी भागात रहाणार्या लोकांची इतकी मोठी सेवा करत आहात. आणि आनंदाची बाब आहे की, आमच्या देशातील दुर्गम आणि दूरवरच्या भागांतही तंत्रज्ञानाचा इतका चांगला उपयोग केला जात आहे. माझ्या कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा.

डॉ. मदन मणि: धन्यवाद !

मित्रांनो, डॉक्टर मदन मणिजींच्या बोलण्यातून स्पष्ट होतं की इ संजीवनी अप कशा प्रकारे त्यांना सहाय्य करत आहे. डॉक्टर मदन जी यांच्यानंतर आता आपण आणखी एका मदनजींशी जोडले जात आहोत. ते उत्तरप्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी मदनमोहन लालजी आहेत. आता हाही एक योगायोग आहे की चंदौली सुद्धा बनारसला लागूनच आहे. या, आपण मदनमोहनजींकडून जाणून घेऊ या की इ संजीवनीच्या सहाय्याने त्यांचा एक रूग्ण म्हणून काय अनुभव आला आहे. 

पंतप्रधान: मदन मोहन जी,  नमस्कार!

मदन मोहन जी: नमस्कार, नमस्कार साहेब  |

पंतप्रधान: नमस्कार! ठीक आहे, मला सांगण्यात आलं आहे की आपण मधुमेहाचे रूग्ण आहात. 

मदन मोहन जी: जी |

पंतप्रधान: आणि आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून टेलि कन्सल्टेशनद्वारे आपल्या आजारासंबंधी वैद्यकीय मदत मिळवत असता. 

मदन मोहन जी: हो|

पंतप्रधान: एक रूग्ण या नात्यानं, आपले अनुभव मी जाणून घेऊ इच्छितो. ज्यामुळे मी देशवासियांपर्यंत ही बाब पोहचवू शकेन की आजच्या तंत्रज्ञानामुळे आमचे गावात रहाणारे लोकही कशा प्रकारे त्याचा उपयोग करू शकतात. जरा सांगा तर कसं करतात ते.

मदन मोहन जी: असं आहे सर जी, रूग्णालये दूरवर असतात आणि जेव्हा मला मधुमेह झाला तेव्हा ५-६ किलोमीटर लांब जाऊन उपचार घ्यावे लागत होते, डॉक्टरांना दाखवावं लागत होतं. परंतु जेव्हापासून आपण ही व्यवस्था तयार केली आहे, आता आम्ही जेव्हा जातो, तेव्हा आमची तपासणी केली जाते, आमची बाहेरच्या डॉक्टरांशी बोलणंही करून दिलं जातं, आणि औषधंही दिली जातात. यामुळे आम्हाला खूप मोठा फायदा होतो आणि लोकांनाही याचा खूप लाभ होतो. 

पंतप्रधान:एकच डॉक्टर आपली तपासणी करतो की डॉक्टर सतत बदलत असतात?

मदन मोहन जी: त्यांना काही समजलं नाही तर डॉक्टरांना दाखवतात. त्याच बोलून  दुसर्या डॉक्टरांशी आमचं बोलणं करून देतात. 

पंतप्रधान: आणि जे डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात, त्यांच्यामुळे आपल्याला पूर्ण फायदा होतो. 

मदन मोहन जी: आम्हाला फायदा होतोच होतो. आम्हाला तर त्यापासून खूपच मोठा फायदा होतो. आणि गावातल्या लोकांनाही त्यापासून खूप फायदा होतो.  सर्व लोक तेथे विचारतात की भैया, आम्हाला रक्तदाब आहे, आम्हाला मधुमेह आहे, चाचणी करा, तपासणी करा आणि औषध योजना सांगा. आणि पहिल्यांदा तर ५-६ किलोमीटर दूरवर जात होतो. लांबलचक रांग लागत होती. पॅथॉलॉजी चाचणीसाठी रांग लागत असे. एक एक दिवस त्यातच जाऊन नुकसान व्हायचं.

पंतप्रधान: म्हणजे आता आपला वेळही खूप वाचतो. 

मदन मोहन जी: आणि पैसाही खर्च होत होता आणि येथे सारी सेवा विनामूल्य दिल्या जात आहेत. 

पंतप्रधान: जेव्हा आपण आपल्यासमोर डॉक्टरांना भेटतात तेव्हा एक विश्वास निर्माण होतो. चला, डॉक्टरांनी माझी नाडी तपासली आहे. डोळे तपासणी केली आहे, माझी जीभही तपासली आहे. तर एक वेगळीच भावना निर्माण होते. जसं टेलिकन्सल्टेशन करतत, तसाच आनंद मिळतो आपल्याला ?

मदन मोहन जी: हो, खूप आनंद होतो. के ते आमची नाडी धरून तपासत आहेत, स्टेथोस्कोप लावत आहेत, तर मला खूप बरं वाटतं आणि आम्हाला वेगळंच समाधान वाटतं. भई, इतकी चांगली व्यवस्था आपल्या द्वारे बनवली गेली आहे. ज्यामुळे आम्हाला खूप त्रास सोसून जावं लागत होतं, गाडी भाडं द्यावं लागत होतं, तेथे रांग लावावी लागत होती. आणि आता सार्या सुविधा घरबसल्याच मिळत आहेत. 

पंतप्रधान: मदनमोहनजी, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वयाच्या या टप्प्यातही आपण तंत्रज्ञान शिकला आहात, तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहात. आणि इतरांनाही सांगा ज्यामुळे लोकांचाही वेळ वाचेल आणि पैसाही वाचेल तसेच त्यांना जे मार्गदर्शन मिळतं, त्यातून औषधयोजनाही चांगल्या प्रकारे होऊ शकते. 

मदन मोहन जी: हो. आणखीन काय हवं.

पंतप्रधान: चला, माझ्या खूप खूप शुभेच्छा  आपल्याला मदनमोहन जी.

मदन मोहन जी: बनारसला साहेब आपण काशी विश्वनाथ स्थानक तयार केलं. विकास केला तिथं. यापबद्दल  आमच्याकडून आपलं अभिनंदन. 

पंतप्रधान: मी आपल्याला धन्यवाद देतो. आम्ही काय बनवलं, बनारसच्या लोकांनी बनारसला तयार केलं आहे. नाही तर आम्ही काय, गंगामातेनं सेवेसाठी पाचारण केलं आहे आम्हाला, माता गंगेनं आम्हाला बोलवलं आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा आपल्याला. प्रणाम जी. 

मदन मोहन जी: नमस्कार सर !

पंतप्रधान: नमस्कार जी !

मित्रांनो, देशातील सामान्य लोकांसाठी, मध्यमवर्गासाठी, पहाडी क्षेत्रामध्ये रहाणार्या लोकांसाठी ई संजीवनी हे जीवनाचं संरक्षण करणारं अप तयार होत आहे. ही  भारताची डिजिटल क्रांतीची शक्ती आहे. आणि हिचा प्रभाव आज सर्व क्षेत्रात आम्ही पहात आहोत. भारतातील यूपीआयची शक्ती आपण जाणताच. जगातील किती तरी देश त्याकडे आकर्षित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भारत आणि सिंगापूर यांच्यात यूपीआय पे नाऊ लिंक सुरू करण्यात आलं. आता सिंगापूर आणि भारतातील लोक आपापल्या मोबाईलवरून त्याच प्रकारे पैसे हस्तांतरित करत आहेत जसे ते आपल्या देशांतर्गत करत होते. मला याचा आनंद आहे की लोकांनी याचा लाभ घेण्यास सुरूवात केली आहे. भारताचं ई संजीवनी अप असो की हे यूपीआय, हे जीवन अधिक सुखमय करण्यासाठी अत्यंत सहाय्यकारी सिद्ध झालं आहे. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखाद्या देशात नष्ट होत चाललेल्या एखाद्या पक्षी प्रजातीला किंवा एखाद्या जीवजंतुला वाचवलं जातं, तेव्हा संपूर्ण जगात त्याची चर्चा होते. आमच्या देशात अशा अनेक महान परंपरा आहेत ज्या नष्ट झाल्या होत्या, पण लोकांच्या स्मरणातून त्या निघून गेल्या होत्या. परंतु आता लोकसहभागाच्या शक्तीतून त्यांना पुनरूज्जीवत करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांची चर्चा  करण्यासाठी मन की बात यापेक्षा अधिक चांगला मंच कोणता असू शकेल?

 आता मी आपल्याला जे सांगणार आहे, ते ऐकून आपल्याला खरोखरच खूप आनंद वाटेल आणि आपल्या परंपरेचा अभिमान वाटेल.

अमेरिकेत वास्तव्य करणार्या श्री. कंचन बॅनर्जी यांनी परंपरेच्या संरक्षणाशी जोडल्या गेलेल्या अशाच एका अभियानाच्या कडे माझं लक्ष वेधलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात बासबेरियामध्ये, या महिन्यात त्रिबेनी कुंभो मोहोत्शव यांचं आयोजन केलं होतं. त्यात आठ लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. परंतु हे आपल्यला माहीत आहे का, की यात इतकं विशेष असं काय आहे. विशेष हे आहे की तब्बल 700 वर्षांनी ही प्रथा पुनरूज्जीवित केली आहे. तसं तर ही परंपरा हजारो वर्ष जुनी आहे. परंतु दुर्दैवानं ही बंगालच्या त्रिबेनीमध्ये होणारी ही प्रथा 700 वर्षांपूर्वी बंद झाली होती. तिला स्वातंत्र्यानंतर सुरू करायला हवं होतं. परंतु ते ही करण्यात आलं नाही. दोन वर्षांपूर्वी, स्थानिक लोक आणि त्रिबेनी कुंभो पॉरिचालोना शॉमितीच्या माध्यमातून हा महोत्सव पुन्हा सुरू झाला आहे. मी त्याच्या आयोजनाशी संबंधित सर्व लोकांना शुभेच्छा देतो. आपण केवळ एक परंपरा पुनरूज्जीवित करत नाहीत तर आपण भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं संरक्षणही करत आहात. 

मित्रांनो, पश्चिम बंगालच्या त्रिबेनीला अनेक शतकांपासून एक पवित्रस्थळ म्हणून ओळखलं जातं. त्याचा उल्लेख, वेगवेगळ्या मंगलकाव्ये, वैष्णव साहित्य, शाक्त साहित्य आणि इतर बंगाली साहित्यिक कृतींमध्येही आढळतो. वेगवेगळ्या ऐतिहासिस दस्तऐवजांमधून याचा शोध लागतो की, एके काळी हे क्षेत्र संस्कृत, शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचं केंद्र होतं. अनेक संतांनी या क्षेत्राला माघ संक्रांतीमध्ये कुंभ स्नानासाठी पवित्र स्थान मानलं आहे. त्रिबेनीमध्ये आपल्याला गंगा घाट, शिवमंदिर आणि टेराकोटा वास्तुकलेनं सजलेली प्राचीन इमारती पहायला मिळतील. त्रिबेनीची परंपरा पुनर्स्थापित करण्यासाठी आणि कुंभ परंपरेचा गौरव पुनरूज्जीवित करण्यासाठी गेल्या वर्षी इथं कुंभ मेळ्याचं आयोजन केलं होतं. सात शतकांनंतर, तीन दिवस कुंभ महास्नान आणि मेळ्यानं, या क्षेत्रात एका नव्या उर्जेचा संचार केला  आहे. तीन दिवस रोज होणारी गंगा आरती, रूद्राभिषेक आणि यज्ञात मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले. यावेळी महोत्सवात वेगवेगळे आश्रम, मठ आणि आखाडेही सहभागी झाले होते. बंगाली परंपरांशी जोडल्या गेलेल्या अनेक विधी जसे की कीर्तन, बाऊल, गोडियो नृत्ये, स्री खोल, पोटेर गान, छोऊ नृत्य, सायंकाळच्या कार्यक्रमांचं आकर्षणांचं केंद्र बनले होते. आमच्या युवकांना देशाच्या इतिहासाशी जोडण्याचा हा एक स्पृहणीय प्रयत्न आहे. भारतात अशा कित्येक प्रथा आहेत, ज्यांना पुनरूज्जीवित करण्याची आवश्यकता आहे. मला आशा आहे की, याबाबत होणारी चर्चा लोकांना त्या दिशेनं वाटचाल करण्यास अवश्य प्रेरित करेल. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छ भारत अभियानात आमच्या देशातील लोकसहभागानं त्याचे संदर्भच बदलून टाकले आहेत. देशात कुठेही काही नं काही स्वच्छतेशी जोडलेलं असतं, तेव्हा लोक मला त्याची माहिती कळवतातच. असंच माझं लक्ष हरियाणातील युवकांच्या स्वच्छता अभियानाकडे गेलं आहे. हरियाणातील एक गाव आहे दुल्हेडी. इथल्या युवकांनी असं ठरवलं की भिवानी शहराला स्वच्छतेच्या बाबतीत एक  उदाहरण म्हणून स्थापित करायचं. त्यांनी युवा स्वच्छता आणि सेवा समिती नावाची एक संघटना स्थापन केली. त्या समितीशी संबंधित असलेले युवक पहाटे चार वाजता भिवानीला पोहचतात. शहरातील वेगवेगळ्या स्थळांवर जाऊन ते मिळून स्वच्छता अभियान राबवतात. या लोकांनी शहरातील वेगवेगळ्या भागांतून कित्येक टन कचरा हटवला आहे. 

मित्रांनो, स्वच्छ भारत अभियानाचा एक महत्वपूर्ण परिमाण कचर्यापासून संपत्ती(वेस्ट टु वेल्थ) हे ही आहे. ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील भगिनी कमला मोहराना एक स्वयंसहाय्यता समूह चालवते. या समूहाच्या महिला दुधाची पिशवी आणि दुसर्या हातात प्लॅस्टिक पॅकिंगचे टोपले, तसेच मोबाईल ठेवण्याचे स्टँड अशा अनेक वस्तु तयार करतात. त्यांच्यासाठी हे स्वच्छतेच्या बरोबरीने उत्पन्न मिळवण्याचं एक साधनही झालं आहे. आम्ही निश्चय केला तर स्वच्छ भारतात खूप मोठं योगदान देऊ शकतो. कमीत कमी प्लॅस्टिकच्या पिशवीच्या ऐवजी, कपड्याची पिशवी वापरण्याच संकल्प आम्हाला सर्वांना केला पाहिजे. आपण पहाल, आपला हा संकल्प किती आनंद देईल, आणि दुसर्या लोकांनाही प्रेरित करेल. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण एकत्र येऊन पुन्हा एकदा प्रेरणादायक विषयांवर चर्चा केली. कुटुंबाच्या बरोबर बसून आपण ऐकलंत आणि आता दिवसभर ती चर्चा गुणगुणत रहाल. आम्ही देशातील मेहनतीविषयक जितकी चर्चा करतो, तितकीच आम्हाला उर्जा मिळत असते. त्याच उर्जाप्रवाहाबरोबर वाटचाल करत, आज आम्ही मन की बातच्या 98 व्या आवृत्तीच्या मुक्कामापर्यंत पोहचलो आहोत. आजपासून काही दिवसांनी होळी सण आहे. आपल्याला सर्वांना होळीच्या शुभेच्छा. आम्हाला आपले सण  व्होकल फॉर लोकल या संकल्पासहित साजरे करायचे आहेत. आपले अनुभव माझ्याशी सामायिक करायला विसरू नका. तोपर्यंत मला आता निरोप द्या. पुढच्या वेळेस पुन्हा नव्या विषयासहित भेटू या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.     

 

 

* * *

S.Thakur/AIR/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1902496) Visitor Counter : 305