पंतप्रधान कार्यालय
भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’ मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफच्या जवानांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
"भूकंपाच्या वेळी भारताने दिलेल्या तत्पर प्रतिसादाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. हे आपल्या बचाव आणि मदत पथकांच्या सज्जतेचे प्रतिबिंब आहे”
"भारताने आपल्या आत्मनिर्भरतेबरोबरच नि:स्वार्थीपणाही जपला आहे"
"जगात कुठेही आपत्ती आली की, भारत प्रथम प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असतो"
“तिरंगा घेऊन आपण जिथे पोहोचतो, तेव्हा भारतीय पथके आल्यामुळे परिस्थिती सुधारायला सुरुवात होईल अशी खात्री पटते''
“एनडीआरएफने देशातील लोकांमध्ये चांगली प्रतिष्ठा निर्माण केली आहे.देशातील जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे.''
“आपल्याला जगातील सर्वोत्तम मदत आणि बचाव पथक म्हणून आपली ओळख बळकट करायची आहे. आपली सज्जता जितकी चांगली असेल तितकी आपल्याला जगाची सेवा करता येईल''
Posted On:
20 FEB 2023 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2023
भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.
पंतप्रधानांनी जवानांना संबोधित करताना भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामध्ये ‘ऑपरेशन दोस्त’ मध्ये केलेल्या महान कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी यावेळी वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना विशद केली. आपल्यासाठी संपूर्ण जग एक कुटुंब असल्याची भावना तुर्किए आणि सीरियामध्ये भारतीय पथकांनी प्रतिबिंबित केली , असे पंतप्रधान म्हणाले.
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद देण्याच्या वेळेचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी ‘गोल्डन अवर’ चा उल्लेख केला आणि तुर्किएतील एनडीआरएफ पथकाच्या त्वरित प्रतिसादाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले, असे त्यांनी सांगितले. शीघ्र प्रतिसाद हा बचाव आणि मदत पथकाची सज्जता आणि प्रशिक्षण कौशल्ये अधोरेखित करतो, असे ते म्हणाले.
या पथकातील जवानांना त्यांच्या प्रयत्नांसाठी भूकंपग्रस्त माता आशीर्वाद देतानाची छायाचित्र पाहिल्याची आठवण करून देत, प्रभावित भागात करण्यात आलेल्या बचाव आणि मदत कार्याचे प्रत्येक छायाचित्र पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाला वाटणारा अभिमान पंतप्रधानांनी नमूद केला. पंतप्रधानांनी बचाव पथकांनी दाखवलेली अतुलनीय व्यावसायिकता आणि मानवी संवेदना अधोरेखित केली आणि जेव्हा एखादी व्यक्ती आघात सहन करत असते आणि सर्व काही गमावते तेव्हा या गोष्टी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असे त्यांनी सांगितले. या बचाव पथकांनी ज्याप्रकारे करुणेने कार्य केले त्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
गुजरातमधील 2001 च्या भूकंपाची आठवण करून देत आणि त्यावेळी तेथे स्वयंसेवक म्हणून काम करत असतानाचा काळ आठवत ,ढिगारा हटवणे आणि त्याखालील माणसे शोधण्याच्या कामातील अडचणी आणि भुजमध्ये रुग्णालयच कोसळल्याने संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेला कशाप्रकारे फटका बसला हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.पंतप्रधानांनी 1979 मधील मच्छू धरण दुर्घटनेची आठवणही सांगितली. “या आपत्तींमधील माझ्या अनुभवांना स्मरून मी तुमच्या मेहनतीची, भावनांची आणि तळमळीची प्रशंसा करतो आज मी तुम्हा सर्वांना सलाम करतो.” असे पंतप्रधान म्हणाले.
जे स्वत:ची मदत करण्यास सक्षम आहेत त्यांना स्वावलंबी म्हणतात परंतु ज्यांच्यामध्ये गरजेच्या वेळी इतरांना मदत करण्याची क्षमता आहे त्यांना निःस्वार्थी म्हणतात , असे त्यांनी अधोरेखित केले. हे केवळ व्यक्तींनाच नाही तर राष्ट्रांनाही लागू होते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या आत्मनिर्भरतेसोबतच नि:स्वार्थीपणाही जपला आहे, असे ते म्हणाले. “तिरंगा घेऊन आपण जिथे पोहोचतो, तेव्हा आता भारतीय पथके आल्यामुळे परिस्थिती सुधारायला सुरुवात होईल अशी खात्री पटते'', असे पंतप्रधानांनी युक्रेनमधील तिरंग्याने बजावलेली भूमिका अधोरेखित करत सांगितले. स्थानिक लोकांमध्ये तिरंग्याला मिळालेल्या आदराबद्दलही पंतप्रधान यावेळी बोलले.ऑपरेशन गंगा दरम्यान युक्रेनमधील प्रत्येकासाठी तिरंग्याने ढाल म्हणून कशाप्रकारे काम केले.
त्याचप्रमाणे, ऑपरेशन देवी शक्तीच्या माध्यमातून अफगाणिस्तानमधून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या माणसांना कशाप्रकारे सुखरूप स्वदेशी आणण्यात आले याचे देखील पंतप्रधानांनी स्मरण केले.हीच वचनबद्धता कोरोना महामारीच्या काळात दिसून आली जेव्हा भारताने प्रत्येक नागरिकाला घरी परत आणले तसेच औषधे आणि लसींचा पुरवठा करून जागतिक स्तरावर सद्भावना मिळवली, असे पंतप्रधान म्हणाले.
“तुर्किए आणि सीरियाला भूकंप झाला तेव्हा भारत प्रथम प्रतिसाद देणारा देश होता”, असे सांगत पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन दोस्त’ द्वारे मानवतेच्याप्रति असेलली भारताची बांधिलकी अधोरेखित केली. त्यांनी नेपाळमधील भूकंप, मालदीव आणि श्रीलंकेतील संकटाची उदाहरणे देत मदतीसाठी भारताने सर्वप्रथम पुढाकार घेतल्याचे सांगितले. इतर देशांचाही भारतीय लष्करासह एनडीआरएफवर विश्वास वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.एनडीआरएफने गेल्या काही वर्षांत देशातील लोकांमध्ये चांगली प्रतिष्ठा निर्माण केली आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला."देशातील लोकांचा एनडीआरएफवर विश्वास आहे", असे ते म्हणाले. एनडीआरएफ जेव्हा घटनास्थळी पोहोचते तेव्हा लोकांचा विश्वास आणि आशा पक्की होते हे त्यांनी अधोरेखित केले आणि हे एक मोठे यश असल्याचे त्यांनी नमूद केले. जेव्हा कौशल्याच्या माध्यमातून एखाद्या सामर्थ्यामध्ये संवेदनशीलता जोडली जाते तेव्हा त्या सामर्थ्याची ताकद अनेक पटींनी वाढते, असे पंतप्रधान म्हणाले.
“आपल्याला जगातील सर्वोत्तम मदत आणि बचाव पथक म्हणून आपली ओळख बळकट करायची आहे, असे पंतप्रधानांनी आपत्तीच्या वेळी मदत आणि बचावासाठी भारताची क्षमता बळकट करण्याच्या गरजेवर भर देताना सांगितले. आपली स्वतःची सज्जता जितकी उत्तम असेल तितकी आपल्याला जगाची सेवा करता येईल''. भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी एनडीआरएफ पथकाच्या प्रयत्नांचे आणि अनुभवांचे कौतुक केले आणि म्हणाले की, एनडीआरएफचे जवान भूकंपग्रस्त भागात बचाव कार्य करत असले तरी गेल्या 10 दिवसांपासून ते त्यांच्याशी मनाने आणि हृदयाने नेहमीच जोडलेले होते.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1900876)
Visitor Counter : 269
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam