पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गोरखपूर 'सांसद (खासदार) खेल महाकुंभला' दूरदृश्य प्रणालीद्वारे केले मार्गदर्शन
“खिलाडू वृत्तीच भविष्यात सर्व खेळाडूंसाठी यशाची दारे उघडेल”
“प्रादेशिक स्तरावरील स्पर्धा केवळ स्थानिक प्रतिभा समोर आणत नाही, तर संपूर्ण प्रदेशातील खेळाडूंचे मनोबल त्यामुळे वाढते”
“सांसद खेल महाकुंभ हा एक नवीन मार्ग आहे, एक नवीन प्रणाली आहे”
“क्रीडा जगतात देशाची क्षमता अधोरेखित करण्यात 'सांसद खेल महाकुंभची' मोठी भूमिका आहे”
“सांसद खेल महाकुंभ खेळाच्या भविष्यातील भव्य पायाभूत सुविधांचा मजबूत पाया घालतो”
‘2014’च्या तुलनेत क्रीडा मंत्रालयासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीमध्ये जवळपास तिप्पट वाढ
Posted On:
16 FEB 2023 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोरखपूर सांसद (खासदार) खेल महाकुंभला दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, सर्व खेळाडूंनी या स्तरापर्यंत येण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. जय-पराजय हा क्रीडा क्षेत्राचा तसेच जीवनाचा भाग असल्याचे त्यांनी अधोरेखित करून सर्व खेळाडूंनी विजयाचा धडा शिकल्याचे सांगितले. खिलाडू वृत्तीच भविष्यात सर्व खेळाडूंसाठी यशाची दारे मुक्त करेल, असे पंतप्रधान म्हणाले.
'खेल महाकुंभ'च्या स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रमावर भाष्य करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, चित्रकला, लोकगीते, लोकनृत्य आणि तबला-बासरी वादन इत्यादी क्षेत्रातील कलाकारांनी कुस्ती, कबड्डी आणि हॉकी या खेळांसोबतच या स्पर्धेतही भाग घेतला आहे. “खेळातील प्रतिभा असो की कला-संगीत, त्याचा आत्मा आणि उूर्जा सर्वत्र सारखीच असते”, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या भारतीय परंपरा आणि लोककला प्रकार पुढे नेण्याच्या नैतिक जबाबदारीवरही त्यांनी भर दिला. त्यांनी गोरखपूरचे खासदार रविकिशन शुक्ला यांचे कलाकार म्हणून त्यांनी दिलेले योगदान आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
गेल्या काही आठवड्यामध्ये सांसद खेल महाकुंभ या क्रीडा स्पर्धांविषयक उपक्रमात सहभागी झाल्याचा पंतप्रधानांचा हा तिसरा कार्यक्रम आहे. भारताला जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रामध्ये शक्ती बनवायचे असेल तर नवीन मार्ग आणि प्रणाली तयार करण्याच्या कल्पनेचा पुनरुच्चार त्यांनी केला. पंतप्रधानांनी प्रतिभा शोधून काढता याव्यात यासाठी, स्थानिक पातळीवरील क्रीडा स्पर्धांचे महत्व आहे, असे सांगून ते म्हणाले की, प्रादेशिक स्तरावरील स्पर्धा केवळ स्थानिक प्रतिभा शोधत नाहीत तर त्या संपूर्ण क्षेत्रातील खेळाडूंचे मनोबल वाढवतात. "सांसद खेल महाकुंभ हा एक नवा मार्ग, एक नवीन प्रणाली आहे", असे पंतप्रधान म्हणाले.
गोरखपूर खेल महाकुंभच्या पहिल्या टप्प्यात 20,000 खेळाडूंनी भाग घेतला होता आणि ही संख्या 24,000 वर गेली आहे. यामध्ये 9,000 महिला खेळाडू आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. खेल महाकुंभमध्ये लहान शहरे तसेच खेड्यांमधून हजारो तरुण, सहभागी होत असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, सांसद खेल महाकुंभ हे युवा खेळाडूंना संधी देणारे एक नवीन व्यासपीठ बनले आहे.
“वय कितीही असो, प्रत्येकाला निरोगी राहण्याची आंतरिक इच्छा असते”,पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी त्या काळाचे स्मरण केले, जेव्हा खेळ आणि क्रीडा स्पर्धा हा गावच्या जत्रेचा एक भाग होते, आणि आखाड्यामध्ये विविध खेळांचे आयोजन केले जायचे. अलीकडच्या काळात यात बदल झाला असून, या जुन्या पद्धती आता नामशेष झाल्या आहेत, याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. त्यांनी शाळांमधील शारीरिक शिक्षणाच्या (पीटी) तासांचाही उल्लेख केला, ज्याला आता ‘टाईम-पासचे’ (वेळेचा अपव्यय करणारे) तास समजले जाते, आणि ते म्हणाले की, यामुळे देशाने क्रीडा क्षेत्रात योगदान देऊ शकतील अशा तीन-चार पिढ्या गमावल्या आहेत.
पंतप्रधानांनी दूरचित्रवाणीवरील टॅलेंट हंट कार्यक्रमांचे उदाहरण दिले, ज्यामध्ये लहान शहरांमधील अनेक मुले सहभागी होतात, आणि ते म्हणाले की, भारतामध्ये खूप मोठी सूप्त प्रतिभा असून, क्रीडा जगतात देशाची क्षमता अधोरेखित करण्यामध्ये सांसद खेल महाकुंभची मोठी भूमिका आहे.
पंतप्रधानांनी सांगितले की शेकडो संसद सदस्य देशात अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत आहेत जिथे मोठ्या संख्येने तरुण खेळाडूंना प्रगती करण्याची संधी मिळते. अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळतील आणि ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी पदकेही जिंकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “सांसद खेल महाकुंभ, भविष्यातील क्रीडा विश्वाच्या भविष्यासाठी, भव्य पायाभूत सुविधांचा भक्कम पाया रचतो”, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
गोरखपूरमधील प्रादेशिक क्रीडा संकुलाचे उदाहरण देत, छोट्या शहरांमध्ये स्थानिक पातळीवर क्रीडा सुविधा विकसित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी भर दिला. गोरखपूरच्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी 100 पेक्षा जास्त क्रीडांगणेही तयार करण्यात आली असून चौरीचौरा येथे एक छोटे स्टेडिअम बांधले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. खेलो इंडिया अभियाना अंतर्गत अन्य क्रीडा सुविधांव्यतिरिक्त, खेळाडूंच्या प्रशिक्षणावरही भर दिला जात असल्याचे नमूद करत पंतप्रधान म्हणाले, “देश आता सर्वांगीण दृष्टीकोन घेऊन पुढे जात आहे”.
या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की, क्रीडा मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात 2014 च्या तुलनेत यंदा जवळजवळ 3 पट जास्त तरतूद करण्यात आली आहे. त्यांनी नमूद केले की देशात अनेक आधुनिक क्रीडासंकुले बांधली जात आहेत, आणि TOPS (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम) चा विशेष उल्लेख केला, ज्यामध्ये खेळाडूंना प्रशिक्षणासाठी लाखो रुपयांचे सहाय्य केले जाते. त्यांनी खेलो इंडिया, फिट इंडिया आणि योग यांसारख्या मोहिमांचाही उल्लेख केला. देशाने भरड धान्यांना श्री अन्न अशी ओळख मिळवून दिली आहे, हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, ज्वारी आणि बाजरीसारख्या भरड धान्याचा, आता ‘सुपरफूड’ श्रेणीमध्ये समावेश झाला आहे. युवा वर्गाने या मोहिमांमध्ये सहभागी होऊन देशाच्या या अभियानाचे नेतृत्व करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले, "आज ऑलिम्पिकपासून ते इतर मोठ्या स्पर्धांपर्यंत, तुमच्यासारखे तरुण खेळाडूच देशासाठी पदक जिंकण्याचा वारसा पुढे नेतील." युवक असेच झळाळत्या यशाच्या तेजाने तळपत राहतील, आणि आपल्या दिमाखदार कामगिरीने देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोरखपूरचे खासदार रवि किशन शुक्ला आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
S.Kulkarni/Suvarna/Rajashree/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1899853)
Visitor Counter : 217
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam