पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, महामहीम जोसेफ आर.बायडेन यांच्याशी दूरध्वनीवरून केली चर्चा


भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिकाधिक मजबूत झाल्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये सशक्त विकास घडून येत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले

एअर इंडिया आणि बोईंग यांच्यातील महत्त्वाच्या कराराचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले; हा करार म्हणजे दोन्ही देशांमध्ये नव्या रोजगार संधींच्या निर्मितीसाठी सहाय्यभूत परस्पर लाभदायक सहकार्याचे झळाळते उदाहरण असल्याचे प्रतिपादन

भारतातील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राच्या विस्तारामुळे निर्माण होत असलेल्या संधींचा उपयोग करुन घेण्यासाठी बोईंग आणि इतर अमेरिकी कंपन्यांना भारतात येण्याचे पंतप्रधानांनी दिले आमंत्रण

महत्त्वाच्या आणि उभरत्या तंत्रज्ञानांशी (आयसीईटी)संबंधित उपक्रमांच्या वॉशिंग्टन येथे झालेल्या पहिल्या बैठकीचे स्वागत करुन दोन्ही नेत्यांनी अवकाश, सेमीकंडक्टर्स, संरक्षण तसेच इतर अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली

दोन्ही देशांतील नागरिकांदरम्यान चैतन्यपूर्ण आणि परस्पर लाभदायक संबंधांना बळ देण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली

विद्यमान काळात भारताकडे असलेले जी-20 समूहाचे अध्यक्षपद यशस्वी होईल याची सुनिश्चिती करण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात राहण्याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत झाले

Posted On: 14 FEB 2023 9:50PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, महामहीम जोसेफ आर.बायडेन यांच्याशी स्नेहपूर्ण आणि उपयुक्त बातचीत केली.
 
भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिकाधिक मजबूत झाल्यामुळे  सर्वच क्षेत्रांमध्ये सशक्त विकास घडून येत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष आर.बायडेन यांनी समाधान व्यक्त केले. एअर इंडिया आणि बोईंग यांच्यातील महत्त्वाच्या करारासंदर्भातील घोषणेचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. हा करार म्हणजे दोन्ही देशांमध्ये नव्या रोजगार संधींच्या निर्मितीसाठी मदत करणाऱ्या परस्पर लाभदायक सहकार्याचे झळाळते उदाहरण आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतातील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राच्या विस्तारामुळे निर्माण होत असलेल्या संधींचा उपयोग करुन घेण्यासाठी बोईंग आणि इतर अमेरिकी कंपन्यांना भारतात येण्याचे आमंत्रण पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी दिले.
 
महत्त्वाच्या आणि उभरत्या तंत्रज्ञानांशी (आयसीईटी)संबंधित उपक्रमांच्या वॉशिंग्टन येथे झालेल्या पहिल्या बैठकीचे स्वागत करुन दोन्ही नेत्यांनी अवकाश, सेमीकंडक्टर्स, पुरवठा साखळ्या, संरक्षण क्षेत्रातील सह-उत्पादन आणि सह-विकास तसेच ज्ञान आणि अभिनव संशोधन परिसंस्थांमध्ये द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. दोन्ही देशांतील नागरिकांदरम्यान असलेल्या आणि आतापर्यंत परस्परांना लाभदायक ठरलेल्या चैतन्यपूर्ण संबंधांना अधिक बळ देण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.
 
विद्यमान काळात भारताकडे असलेले जी-20 समूहाचे अध्यक्षपद यशस्वी होईल याची सुनिश्चिती करण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात राहण्याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
 

***

Gopal C/Sanjana/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1899315) Visitor Counter : 297