पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या हस्ते एरो इंडिया 2023 कार्यक्रमाच्या 14 व्या भागाचे उद्घाटन
एरो इंडियाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे केले प्रकाशन
“बेंगलुरूचे आकाश नव्या भारताच्या क्षमतांची साक्ष देत असून; ही नवी उंची म्हणजे नव्या भारताची सत्यता आहे”
“देशाला बळकट करण्यासाठी कर्नाटकच्या युवकांनी त्यांच्याकडील तांत्रिक कौशल्याचा वापर संरक्षण क्षेत्रात करायला हवा”
“नवी विचारधारणा आणि नव्या दृष्टीकोनासह जेव्हा देश प्रगती करतो तेव्हा देशातील यंत्रणा देखील त्या विचारधारणेनुसार बदलू लागतात”
“आज एरो इंडिया हे केवळ प्रदर्शन राहिलेले नाही, त्यात केवळ संरक्षण क्षेत्रातील उद्योगांच्या व्याप्तीचे दर्शन घडत नाही तर भारताच्या आत्म-विश्वासाचे देखील दर्शन घडते”
“21व्या शतकातील नवीन भारत कोणतीही संधी वाया घालवणार नाही आणि प्रयत्नांमध्ये कोणतीही कसूर देखील करणार नाही”
“संरक्षण विषयक सामग्रीचे सर्वात जास्त प्रमाणात उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट होण्यासाठी भारत वेगवान प्रयत्न करेल आणि आपले खासगी क्षेत्र तसेच गुंतवणूकदार यात फार मोठी भूमिका निभावतील”
“आजचा भारत जलदगतीने विचार करतो, दूरवरचा विचार करतो आणि त्वरेने निर्णय घेतो”
एरो इंडियाच्या कानठळ्या बसविणाऱ्या गर्जनेतून भारताच्या सुधारणा, कार्यप्रदर्शन आणि परिवर्तनाचा संदेश दुमदुमत आहे’’
Posted On:
13 FEB 2023 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरूमधील येलाहांका येथील हवाई दलाच्या तळावर एरो इंडिया 2023 या कार्यक्रमाच्या 14 च्या भागाचे उद्घाटन केले. “अब्जावधी संधींकडे नेणारी धावपट्टी” ही या वर्षीच्या एरो इंडिया 2023 कार्यक्रमाची संकल्पना असून या कार्यक्रमात 100 परदेशी आणि 700 भारतीय कंपन्यांसह जगभरातील 80 हून अधिक देशांचा सहभाग असणार आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमात स्वदेशी बनावटीची सामग्री आणि स्वदेशी तंत्रज्ञान यांचे सादरीकरण तसेच परदेशी कंपन्यांशी भागीदारीचा प्रयत्न यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, पंतप्रधान म्हणाले की बेंगळूरूचे आकाश नव्या भारताच्या क्षमतांची साक्ष देत आहे. “ही नवी उंची म्हणजे नव्या भारताची सत्यता आहे, आज भारत नवनवी उंची गाठत आहे आणि त्याही पलीकडचा विचार करत आहे,” पंतप्रधान म्हणाले.
एरो इंडिया 2023 हे भारताच्या वाढत्या क्षमतांचे झळाळते उदाहरण आहे आणि 100 हून अधिक देशांचा या कार्यक्रमातील सहभाग संपूर्ण विश्वाचा भारतावर असलेल्या विश्वासाचे दर्शन घडवतो असे पंतप्रधानांनी सांगितले. जगातील अनेक नावाजलेल्या कंपन्यांसह, भारताच्या एमएसएमई उद्योगांच्या सोबत 700 हून अधिक कंपन्यांचा या कार्यक्रमात सहभाग आहे, याकडे त्यांनी निर्देश केला. “अब्जावधी संधींकडे नेणारी धावपट्टी” या एरो इंडिया 2023 कार्यक्रमाच्या संकल्पनेवर प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले की, आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत जात आहे.
या प्रदर्शनासोबत आयोजित करण्यात आलेली संरक्षण मंत्र्याची बैठक तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद यांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, संरक्षण क्षेत्रातील सक्रीय सहभाग एरो इंडियाचे सामर्थ्य वाढवेल.
भारताचे तंत्रज्ञानविषयक प्रगतीचे केंद्र म्हणून प्रसिध्द असलेल्या कर्नाटकात होत असलेल्या एरो इंडिया कार्यक्रमाचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले.ते म्हणाले की या कार्यक्रमामुळे कर्नाटकातील युवकांसाठी हवाई दल क्षेत्रात नवे मार्ग खुले होतील. देशाला बळकट करण्यासाठी कर्नाटकच्या युवकांनी त्यांच्याकडील तांत्रिक कौशल्याचा वापर संरक्षण क्षेत्रात करायला हवा, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
“नवी विचारधारणा आणि नव्या दृष्टीकोनासह जेव्हा देश प्रगती करतो तेव्हा देशातील यंत्रणा देखील त्या विचारधारणेनुसार बदलू लागतात,” पंतप्रधान म्हणाले. एरो इंडिया 2023 मधून नव्या भारताच्या बदलत्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसते, असे मत त्यांनी ठळकपणे नमूद केले.
पंतप्रधानांनी नमूद केले की, जेव्हा एरो इंडिया 'फक्त एक शो(खेळ)' आणि, 'भारताला विकण्याची' एक खिडकी असायची. पण आता ही धारणा बदलली आहे. "आज, एरो इंडिया ही भारताची ताकद बनली आहे आणि आता हा केवळ एक शो(खेळ) राहिलेला नाही", पंतप्रधान म्हणाले की एरो इंडिया हे प्रदर्शन केवळ संरक्षण उद्योगाची व्याप्ती दर्शवत नाही तर भारताच्या आत्मविश्वासाचे देखील दर्शन घडवते "
पंतप्रधान म्हणाले की, भारताचे यश त्याच्या क्षमतेची साक्ष देत आहे. तेजस, आयएनएस विक्रांत, सुरत आणि तुमकूर निर्माणामधील प्रगत सुविधा, या आत्मनिर्भर भारताच्या क्षमता आहेत ज्याच्याशी जगातील नवीन पर्याय आणि संधी जोडल्या गेल्या आहेत, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
“21व्या शतकातील नवीन भारत कोणतीही संधी गमावणार नाही किंवा यासाठी कोणतेही प्रयत्न कमी पडू दिले जाणार नाहीत”, असे सांगत पंतप्रधानांनी सुधारणांच्या मदतीने प्रत्येक क्षेत्रात आणलेल्या क्रांतीची नोंद घेतली. अनेक दशके सर्वात मोठा संरक्षण आयातदार देश, आता जगातील 75 देशांमध्ये संरक्षण उपकरणे निर्यात करू लागला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
गेल्या 8-9 वर्षांतील संरक्षण क्षेत्रातील परिवर्तनाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, वर्ष 2024-25 पर्यंत संरक्षण निर्यात 1.5 अब्जांवरून 5 अब्जांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. "येथून पुढे भारत आता सर्वात मोठ्या संरक्षण उत्पादक देशांमध्ये सामील होण्यासाठी वेगाने पावले उचलणार आहे आणि याकामी आपले खाजगी क्षेत्र आणि गुंतवणूकदार मोठी भूमिका बजावतील," पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी खाजगी क्षेत्राला संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले ज्यामुळे त्यांच्यासाठी भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये नवीन संधी निर्माण होतील.
“आजचा भारत जलद विचार करतो, दूरचा विचार करतो आणि ताबडतोब निर्णय घेतो”, असे नमूद करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते स्वातंत्र्याच्या अमृत काळाची तुलना भारताच्या लढावू जेटच्या पायलटशी करत आहेत. पंतप्रधान म्हणाले की, भारत एक असे राष्ट्र आहे जे कधीही घाबरत नाही मात्र नवीन उंची गाठण्यासाठी सतत उत्साही असते. भारताचे पाय नेहमीच जमिनीवर असतात, भले तो कितीही उंच भरारी घेत असेल, किंवा त्याचा वेग कितीही अफाट असू द्या, असेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.
एरो इंडियाची गर्भित करणारी गर्जना भारताच्या सुधारणा, कार्यप्रदर्शन आणि परिवर्तनाच्या संदेशाची प्रतिध्वनी देते”, आशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. त्यांनी नमूद केले की संपूर्ण जग भारतात ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’(उद्योग स्नेही वातावरण) साठी केलेल्या सुधारणांची दखल घेत आहे आणि जागतिक गुंतवणुकीला तसेच भारतीय नवनिर्मितीला अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी उचललेल्या विविध पावलांवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. संरक्षण आणि इतर क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये केलेल्या सुधारणा आणि उद्योगांना परवाने जारी करण्याच्या प्रक्रियेचे सुलभीकरण आणि त्यांची वैधता वाढविण्यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान म्हणाले की, यावर्षीच्या अर्थसंकल्पात उत्पादन क्षेत्रासाठी कर सवलती वाढवण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, जिथे मागणी, कौशल्य आणि अनुभव आहे, तिथे उद्योग वाढ नैसर्गिक आहे. या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी प्रयत्न सुरू असून ते अधिक दृढ होतील , असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून, हा कार्यक्रम स्वदेशी उपकरणे/तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यावर आणि परदेशी कंपन्यांसोबत भागीदारी करण्यावर भर देईल. भारतीय संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवर पंतप्रधानांचा भर याचे देखील यावेळी प्रदर्शन केले जाईल, कारण या कार्यक्रमात देशाची डिझाईन क्षेत्रातली नेतृत्वगुण आणि प्रगती, यूएव्हीज (UAVs) क्षेत्रातील वाढ, संरक्षण, अंतराळ आणि भविष्यातील तंत्रज्ञान याचे प्रदर्शन केले जाईल. याच्यापुढे जाऊन, ही प्रदर्शनी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA)-तेजस,एचटीटी (HTT)-40, डॉर्नियर लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH), लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) आणि प्रगत लाइट हेलिकॉप्टर (ALH) सारख्या स्वदेशी हवाई उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देईल. या कार्यक्रमामुळे देशांतर्गत एमएसएमई आणि स्टार्ट-अप्सना जागतिक पुरवठा साखळीशी जोडले जाईल, आणि सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी भागीदारीसह विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात मदत होईल.
एरो इंडिया 2023 मध्ये 80 हून अधिक देशांचा सहभाग असेल. एरो इंडिया 2023 मध्ये सुमारे 30 देशांचे मंत्री आणि जागतिक आणि भारतीय ओइएम (OEM) कंपन्यांचे 65 सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) सहभागी होण्याची शक्यता आहे.
एरो इंडिया 2023 प्रदर्शनात सुमारे 100 परदेशी आणि 700 भारतीय कंपन्यांसह 800 हून अधिक संरक्षण कंपन्या सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या भारतीय कंपन्यांमध्ये एमएसएमई (MSME) आणि स्टार्ट-अप यांचा समावेश आहे, ज्याच्या माध्यमातून विशिष्ट तंत्रज्ञानामधली प्रगती, हवाई -अंतराळ क्षेत्रामधील (एरोस्पेस) वाढ आणि देशातील संरक्षण क्षमता याचे दर्शन घडवतील. एरो इंडिया 2023, मधील प्रमुख प्रदर्शक कंपन्यांमध्ये एअरबस, बोईंग, डॅसौल्ट एविएशन,लॉकहीद मार्टीन Lockheed Martin, इस्राएल एरोस्पेस इंडस्ट्री,ब्रम्होस एरोस्पेस, आर्मी एविएशन, एचसी रोबोटिक्स , साब, साफ्रन,रोल्स राईस, लार्सन अण्ड टूब्रो, भारत फोर्ज लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि बीइएमएल यांचा समावेश आहे.
SB/Sanjana/Vikas/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1898766)
Read this release in:
Tamil
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam