पंतप्रधान कार्यालय
इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्टच्या राष्ट्रीय परिषदेला पंतप्रधानांनी केलं संबोधित
"तुम्ही आशा, लवचिकता आणि शारिरीक स्थिती पूर्वपदावर आणणाऱ्या प्रक्रियेचं प्रतीक आहात"
"तुमची व्यावसायिकता मला प्रेरणा देते"
"गरजूंना आधार देण्याची भावना आणि सातत्य, अविरत काम करण्याची प्रवृत्ती, तसंच दृढनिश्चय ही राज्यकारभाराचीही महत्वाची अंगं आहेत"
"सरकारनं नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थकेअर प्रोफेशनल्स अर्थात सहयोगी आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी राष्ट्रीय आयोग विधेयक आणल्यामुळे फिजिओथेरपिस्टना एक व्यवसाय म्हणून बहुप्रतिक्षित मान्यता मिळाली"
"शारीरिक हालचाल योग्य पद्धतीने करणे, योग्य सवयी, योग्य व्यायाम याबद्दल लोकांना शिक्षित करा"
"योगकौशल्य आणि फिजिओथेरपिस्टचं कौशल्य यांच्या एकत्रित वापरानं अधिकाधिक चांगले परिणाम मिळतात"
"तुर्किये भूकंपा सारख्या आपत्तीत फिजिओथेरपिस्टनी दूरदृश्य माध्यमातून दिलेला सल्ला उपयुक्त ठरू शकतो"
“तंदुरुस्त राष्ट्र म्हणून भारताचा जगभर डंका वाजेल याचा मला पूर्ण विश्वास आहे”
Posted On:
11 FEB 2023 10:26AM by PIB Mumbai
गुजरातेत अहमदाबाद इथं 60 व्या भारतीय फिजिओथेरपीस्ट संघटनेच्या राष्ट्रीय परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केलं.
वेदनांपासून मुक्ती मिळवून देणारे, तसंच आशा निर्माण करणारे, शरीराला लवचिकता प्रदान करणारे आणि बिघडलेली शारिरीक स्थिती पूर्वपदावर आणणारे म्हणून फिजिओथेरपीस्टचं महत्त्व पंतप्रधानांनी यावेळी बोलताना अधोरेखित केलं. फिजिओथेरपीस्ट केवळ शारीरिक दुखापतीच बऱ्या करतो असं नाही तर रुग्णाला या शारीरिक दुखापतींमुळे निर्माण झालेल्या मानसिक समस्यांवर मात करण्याचं सुद्धा बळ मिळवून देतो असं ते म्हणाले.
पंतप्रधानांनी फिजिओथेरपीस्ट च्या व्यावसायिकतेचं कौतुक केलं आणि शारिरीक इजेचं निवारण करताना फिजिओथेरपिस्ट आपल्या कामात जी ध्येयासक्ती बाळगतात तीच वृत्ती राज्यकारभाराचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग कशी असते हे विशद केलं. बँक खातं, शौचालय, नळाद्वारे पाणी, विनामूल्य वैद्यकीय उपचार आणि सामाजिक सुरक्षेचं जाळं यासारख्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी सरकारनं बळ पुरवल्यामुळे देशातील गरीब आणि मध्यम वर्गीय, सुखप्राप्तीचं स्वप्न बाळगण्याचं धाडस करु शकतात असं ते म्हणाले. आपल्या अंतर्भूत कुवतीमुळे हा वर्ग यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करू शकतो हे आम्ही जगाला दाखवून दिलं आहे अशी पुस्तीही पंतप्रधानांनी पुढे जोडली.
रुग्णाला आत्मनिर्भर म्हणजेच स्वावलंबी बनवण्याच्या या व्यवसायाच्या हातोटीचा उल्लेख करत ते म्हणाले की भारत सुद्धा अशाच प्रकारे आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत आहे. फिजिओथेरपी मध्ये रुग्ण आणि वैद्य दोघांनाही समस्येच्या निराकरणासाठी एकत्रित काम करण्याची गरज असते. यातून सबका प्रयास म्हणजे सर्वांचे एकत्रित प्रयत्न हे तत्वच दिसून येतं आणि अशाच प्रकारचा सबका प्रयासचं प्रतिबिंब सरकारच्या विविध योजना आणि स्वच्छ भारत-बेटी बचाव यांसारख्या लोक चळवळींमध्ये देखील दिसून येतं असं पंतप्रधान म्हणाले.
सातत्य, अविरत काम करण्याची प्रवृत्ती, तसंच दृढनिश्चय ही फिजिओथेरपीस्टच्या व्यवसायाची वैशिष्ट्यं, सरकारी कारभारात धोरणं राबवतानाही महत्वाची ठरतात असं सांगत पंतप्रधानांनी फिजिओथेरपीची ध्येयासक्ती अधोरेखित केली.
पंतप्रधान म्हणाले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कालखंडात फिजिओथेरपीस्टना बहुप्रतिक्षित अशी ओळख प्राप्त झाली. नॅशनल कमिशन फॉर अलाईड अँड हेल्थकेअर प्रोफेशनल्स बिल अर्थात सहयोगी आणि आरोग्यसेवापुरवठादार व्यावसायिकांसाठी राष्ट्रीय आयोग हे विधेयक सरकारनं आणल्यामुळे हे शक्य झालं. देशाच्या आरोग्य सेवा पुरवठा व्यवस्थेत फिजिओथेरपीस्टच्या योगदानाला या विधेयकामुळे ओळख मिळाली आहे. "त्यामुळे तुम्हा सर्वांना भारतात त्याचप्रमाणे परदेशात सुद्धा काम करणं सोपं झालं आहे. सरकारनं फिजिओथेरपीस्टचा समावेश आयुष्यमान भारत डिजिटल मोहीमेत सुद्धा केला आहे. त्यामुळे रुग्णांपर्यंत पोहोचणं तुम्हा सर्वांना सोपं होत आहे," असं मोदी म्हणाले. तंदुरुस्त भारत चळवळ आणि खेलो इंडिया सारख्या उपक्रमांमध्ये सुद्धा फिजिओथेरपीस्टना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत याचा सुद्धा पंतप्रधानांनी उल्लेख केला.
शारीरिक हालचाल योग्य पद्धतीने करणे, योग्य सवयी, योग्य व्यायाम याबद्दल लोकांना मार्गदर्शन करा, अशी विनंती पंतप्रधानांनी फिजिओथेरपीस्टना केली. "लोकांनी तंदुरुस्ती बाबत योग्य तो दृष्टिकोन बाळगणं महत्त्वाचं आहे. हा दृष्टिकोन, लेखन आणि व्याख्यानांच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यात निर्माण करू शकता. आणि माझी युवा पिढीतली फिजिओथेरपिस्ट मित्रमंडळी तर रीलच्या माध्यमातूनही हे करू शकतात," असं ते म्हणाले.
फिजिओथेरपी बाबत आपल्या स्वतःच्या अनुभवांचं कथन करताना पंतप्रधान म्हणाले," योगकौशल्य आणि फिजिओथेरपिस्टचं कौशल्य यांच्या एकत्रित वापरानं अधिकाधिक चांगले परिणाम मिळतात, हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. फिजिओथेरपीची आवश्यकता असलेल्या सर्वसाधारण शारीरिक समस्यांचं योग मुळे सुद्धा निराकरण होऊ शकतं. म्हणूनच तुम्हाला फिजिओथेरपी सोबतच योगविद्या अवगत असणं तितकंच आवश्यक आहे. यामुळे तुमची व्यावसायिक क्षमता आणि कौशल्य सुद्धा वाढेल."
वयस्कर नागरिक हे फिजिओथेरपी व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात लाभार्थी असल्यामुळे, फिजिओथेरपी हळुवारपणे हाताळावी आणि अनुभवाचा कस लावावा, असं त्यांनी आग्रहपूर्वक सांगितलं. शोधनिबंधांच्याद्वारे आणि विविध सादरीकरणांच्या माध्यमातून फिजिओथेरपी व्यावसायिकांनी आपापली कौशल्यं, आपापली संशोधनं जगासमोर मांडावीत अशी सूचनाही पंतप्रधानानी केली.
आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सल्ला तसंच वैद्यकीय उपचार आणि औषधोपचार करण्याची कला विकसित करावी अशी विनंतीही मोदी यांनी केली. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे विशेष उपयुक्त ठरू शकतं असं ते म्हणाले. तुर्कीयेतल्या सध्याच्या भूकंपग्रस्त परिस्थितीत फिजिओथेरपीस्टची खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे आणि भारतीय फिजिओथेरपीस्ट मोबाईल फोन च्या माध्यमातून भूकंपग्रस्तांना मदत करू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतातील फिजिओथेरपिस्ट संघटनेनं या दृष्टीने विचार करावा असं त्यांनी आवाहन केलं. "मला पूर्ण खात्री आहे की तुमच्यासारख्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भारत संपूर्ण तंदुरुस्त होईल आणि त्याच प्रमाणे तंदुरुस्तीसह/तंदुरुस्ती मुळे सर्वच क्षेत्रात भारताचा डंका अवघ्या जगात वाजेल (फीट आणि सुपरहीट होईल)," असं म्हणत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
***
S.Tupe/A.Save/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1898263)
Visitor Counter : 202
Read this release in:
English
,
Assamese
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam