पंतप्रधान कार्यालय
लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधानांनी केलेले निवेदन
" राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या दूरदर्शी भाषणातून देशाला दिशा दिली ": पंतप्रधान
भारताप्रति जागतिक स्तरावर सकारात्मकता आणि आशा व्यक्त होत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
आज सुधारणा या सक्तीने नव्हे, तर दृढविश्वासाने केल्या जात असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास
यूपीएच्या काळातील भारताला ‘हरवलेले दशक’असे संबोधले जात होते, तर आजचे दशक हे ‘भारताचे दशक’ म्हणून ओळखले जात असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार
भारत ही लोकशाहीची जननी असून, सशक्त लोकशाहीसाठी विधायक टीका आवश्यक आहे, तर टीका ही 'शुद्धी यज्ञा' सारखी असल्याची पंतप्रधानांची स्पष्टोक्ती
विधायक टीका करण्याऐवजी, काही लोक विरोधासाठी विरोध म्हणून टीका करतात : पंतप्रधान
140 कोटी भारतीयांचे आशीर्वाद हेच माझे ‘सुरक्षा कवच’आहे, पंतप्रधानांचा विश्वास
“ आमच्या सरकारने मध्यमवर्गीयांच्या आकांक्षा पूर्ण केल्या असून, त्यांच्या प्रामाणिकपणाचा आम्ही गौरव केला ”, पंतप्रधानांचे प्रतिपादन
“ भारतीय समाजात नकारात्मकतेला सामोरे जाण्याची क्षमता आहे, पण तो नकारात्मकता कधीच स्वीकारत नाही ” : पंतप्रधान
Posted On:
08 FEB 2023 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले.
पंतप्रधान म्हणाले की राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या दूरदर्शी भाषणामधून देशाला दिशा दिली. ते म्हणाले की राष्ट्रपतींच्या संबोधनाने भारतातील ‘नारी शक्ती’ ला प्रेरणा दिली आणि भारतातील आदिवासी समुदायामध्ये अभिमानाची भावना निर्माण करून त्यांच्यामधील आत्मविश्वासाला चालना दिली. "त्यांनी देशाच्या 'संकल्प से सिद्धी' या मंत्राची तपशीलवार ब्लू प्रिंट दिली", पंतप्रधान म्हणाले.
आव्हाने उभी राहतील, पण 140 कोटी भारतीयांच्या दृढनिश्चयाने देश आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात करू शकतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले की, शतकामध्ये एकदाच येणारी आपत्ती आणि युद्ध काळात देशाचे व्यवहार हाताळून प्रत्येक भारतीयाला आत्मविश्वास मिळाला आहे. अशा संकटाच्या काळातही भारत जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आला आहे, असे ते म्हणाले. जागतिक स्तरावर भारताबद्दल सकारात्मकता आणि आशा निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी या सकारात्मकतेचे श्रेय स्थैर्य , भारताचे जागतिक स्तरावरील स्थान, भारताची वृद्धिंगत होणारी क्षमता आणि भारतातील नवीन उदयोन्मुख संधींना दिले. देशात निर्माण झालेले विश्वासाचे वातावरण अधोरेखित करत भारतात स्थिर आणि निर्णायक सरकार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सुधारणा सक्तीने नाही तर दृढविश्वासाने केल्या जातात, हा विश्वास त्यांनी अधोरेखित केला. भारताच्या समृद्धीमध्ये जग समृद्धी पाहत आहे असे ते म्हणाले.
2004 ते 2014 ही वर्षे घोटाळ्यांनी भरलेली होती आणि त्याच वेळी देशाच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत होते असे सांगत पंतप्रधानांनी 2014 पूर्वीच्या दशकांकडे लक्ष वेधले. या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण झाली आणि जागतिक व्यासपीठावर भारताचा आवाज खूपच क्षीण झाला. 'मौके में मुसिबत' -म्हणजेच संधीमध्ये आपत्ती अशा शब्दात पंतप्रधानांनी या युगाचे वर्णन केले.
आज देश आत्मविश्वासाने ओतप्रोत आहे आणि आपली स्वप्ने आणि संकल्प साकारत आहे हे लक्षात घेऊन,संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे असे सांगत पंतप्रधानांनी याचे श्रेय भारताचे स्थैर्य आणि संधींना दिले. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळातील भारताला ‘व्यर्थ गेलेले दशक’ म्हटले जात होते, तर आज लोक सध्याच्या दशकाला ‘भारताचे दशक’ म्हणून संबोधत आहेत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
भारत ही लोकशाहीची जननी आहे, असे नमूद करून पंतप्रधानांनी सशक्त लोकशाहीसाठी विधायक टीका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले आणि टीका ही ‘शुद्धी यज्ञा’ सारखी असल्याचे त्यांनी सांगितले.विधायक टीकेऐवजी काही लोक विरोधासाठी विरोध म्हणून टीका करतात असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 9 वर्षात आपल्याकडे विधायक टीका करण्याऐवजी बिनबुडाचे आरोप करणारे मारून मुटकून निर्माण झालेले टीकाकार आहेत, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आता पहिल्यांदाच मुलभूत सुविधांचा अनुभव घेत असलेले लोक ही टीका मान्य करणार नाहीत. घराणेशाहीऐवजी आपण 140 कोटी भारतीयांच्या कुटुंबातील सदस्य बनलो, असे ते म्हणाले. “140 कोटी भारतीयांचे आशीर्वाद हेच माझे ‘सुरक्षा कवच’ आहे,” असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
पंतप्रधानांनी वंचित आणि उपेक्षित लोकांविषयी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. आणि सरकारच्या विविध योजनांचा सर्वात मोठा, जास्त फायदा दलित, आदिवासी, महिला आणि असुरक्षित घटकांना झाला आहे, असे प्रतिपादन केले. भारताच्या नारी शक्तीवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की भारताच्या नारी शक्तीला बळकट करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करायचे बाकी ठेवले नाहीत. ज्यावेळी भारतातील माता सक्षम, बळकट होतील त्याचवेळी लोकही बळकट होणार आहेत आणि ज्यावेळी लोक बळकट होतील तेव्हा समाज मजबूत होत असतो, अर्थात यामुळेच राष्ट्र मजबूत होते. आपल्या सरकारने मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांकडे लक्ष दिले आहे आणि त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा गौरव केला आहे, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारतातील सामान्य नागरिकांमध्ये सकारात्मकता पूर्णपणे भरलेली आहे, असे अधोरेखित करून पंतप्रधानांनी यावर भर दिला की, भारतीय समाजात नकारात्मकतेला सामोरे जाण्याची क्षमता असली तरी या समाजाने नकारात्मकतेचा कधीही स्वीकार केलेला नाही.
S.Patil/Rajashree/Sonal C/Suvarna/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897497)
Visitor Counter : 176
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam