पंतप्रधान कार्यालय
जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनाला पंतप्रधानांनी केले संबोधित
"कृष्णगुरुजींनी ज्ञान, सेवा आणि मानवतेच्या प्राचीन भारतीय परंपरांचा प्रसार केला"
"एकनाम अखंड कीर्तन जगाला ईशान्येचा वारसा आणि आध्यात्मिक चेतनेचा परिचय करून देत आहे"
“दर 12 वर्षांनी असे कार्यक्रम आयोजित करण्याची प्राचीन परंपरा आहे”
“वंचितांना प्राधान्य ही आज आपल्यासाठी प्रमुख मार्गदर्शक शक्ती आहे”
विशेष मोहिमेद्वारे 50 पर्यटन स्थळे विकसित करणार
"गेल्या 8-9 वर्षात देशात गोमोशाचे आकर्षण आणि मागणी वाढली आहे"
''महिलांच्या उत्पन्नाला त्यांच्या सक्षमीकरणाचे साधन बनवण्यासाठी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजनाही सुरू करण्यात आली आहे.''
''सामाजिक ऊर्जा आणि लोकसहभाग ही “देशाच्या कल्याणकारी योजनांची जीवनशक्ती आहे”
"श्री अन्न म्हणून भरडधान्याला आता नवी ओळख मिळाली आहे "
Posted On:
03 FEB 2023 6:22PM by PIB Mumbai
आसाममधील बारपेटा येथील कृष्णगुरु सेवाश्रम येथे आयोजित जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तन हे महिनाभर चालणारे कीर्तन 6 जानेवारीपासून कृष्णगुरु सेवाश्रम इथे आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी , कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तन महिनाभरापासून सुरू आहे असे सांगत कृष्ण गुरुजींनी प्रसार केलेल्या प्राचीन भारतातील ज्ञान, सेवा आणि मानवतेच्या परंपरा आजही कायम असल्याचे अधोरेखित केले. गुरु कृष्ण प्रेमानंद प्रभुजींचे योगदान आणि त्यांच्या शिष्यांच्या प्रयत्नांचे देवत्व या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसून येते, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. आजच्या तसेच पूर्वी आयोजित कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतानाच ,नजीकच्या काळात सेवाश्रमाला भेट देण्याची संधी मिळावी यासाठी पंतप्रधानांनी कृष्ण गुरूंचे आशीर्वाद मागितले .
कृष्णगुरुजींनी दर बारा वर्षांनी केलेल्या अखंड एकनाम जपाच्या परंपरेचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी मुख्य भाव असलेल्या कर्तव्यासह आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या भारतीय परंपरेचा उल्लेख केला.“अशा प्रकारचे कार्यक्रम व्यक्तींमध्ये आणि समाजात कर्तव्याची भावना पुन्हा जागृत करतात.मागील बारा वर्षातील घडामोडींवर चर्चा आणि विश्लेषण करण्यासाठी, वर्तमानाचे मूल्यमापन करण्यासाठी आणि भविष्याची रूपरेषा तयार करण्यासाठी या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोक एकत्र येत असत, असे पंतप्रधान म्हणाले. दर बारा वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या कुंभ, ब्रह्मपुत्रा नदीतील पुष्करम उत्सव, तामिळनाडूतील कुंभकोणम येथील महामहम, भगवान बाहुबली यांचा महामस्तकाभिषेक, नीलकुरिंजीच्या फुलांचे उमलणे या प्रमुख कार्यक्रमांची उदाहरणे दिली. एकनाम अखंड कीर्तन हे देखील एक अशाच सशक्त परंपरेचे उदाहरण आहे आणि जगाला ईशान्येचा वारसा आणि आध्यात्मिक चेतनेचा परिचय करून देत आहे, असेही ते म्हणाले.
कृष्णगुरुंच्या जीवनाशी संबंधित विलक्षण प्रतिभा, आध्यात्मिक अनुभूती आणि आश्चर्यकारक घटना आपल्या प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत म्हणून काम करतात, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. कोणतेही काम किंवा व्यक्ती लहान किंवा मोठी नसते, असे पंतप्राधानानी कृष्णगुरुंच्या शिकवणीकडे लक्ष वेधून नमूद केले. त्याचप्रमाणे, सर्वांच्या विकासासाठी (सबका विकास) सर्वांना सोबत घेऊन (सबका साथ) या एकाच भावनेने देशाने पूर्ण समर्पण भावनेने आपल्या लोकांच्या भल्यासाठी काम केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.आतापर्यंत वंचित आणि उपेक्षित राहिलेल्यांना आता देशाने सर्वोच्च प्राधान्य दिले, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. "वंचितांना प्राधान्य" याची आसाम आणि ईशान्येकडील राज्यांची उदाहरणे देत, विकास आणि कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत अनेक दशकांपासून या प्रदेशांकडे दुर्लक्ष केले जात होते, मात्र आज त्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
यंदाच्या अर्थसंकल्पाचा संदर्भ देत , वंचितांना दिलेले प्राधान्य ही प्रमुख मार्गदर्शक शक्ती असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.ईशान्येच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन, या वर्षीच्या अर्थसंकल्पात 50 पर्यटन स्थळांचा विकास आणि सुधारणा करण्याच्या तरतुदीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला ज्याचा या क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. आसाममध्ये लवकरच पोहोचणाऱ्या गंगा विलास क्रूझबद्दलही पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय वारशाचा सर्वात मौल्यवान खजिना नदीच्या काठावर वसलेला आहे,हे त्यांनी अधोरेखित केले.
पारंपरिक कौशल्य असलेल्या कारागिरांसाठी कृष्णगुरु सेवाश्रमाने केलेल्या कार्याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि गेल्या काही वर्षांत देशाने पारंपरिक कौशल्ये विकसित करण्याचे आणि कारागिरांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचे ऐतिहासिक कार्य केले असल्याची माहिती दिली. बांबू संदर्भातील नियम बदलून बांबूची वर्गवारी वृक्ष ऐवजी गवत प्रकार अशी केल्याने बांबू उद्योगासाठी कवाडे खुली झाली, असे ते म्हणाले. अर्थसंकल्पातील ‘युनिटी मॉल्स' अर्थात ‘एकता मॉल्स' च्या प्रस्तावामुळे शेतकरी, कारागीर आणि आसाम मधील युवकांना त्यांच्या उत्पादनासाठी इतर राज्ये आणि मोठ्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी गोमोशा बद्दलच्या त्यांच्या आवडीबद्दलही सांगितले आणि त्यात आसामच्या महिलांचे अथक परिश्रम आणि कौशल्ये अंतर्भूत आहेत, असे ते म्हणाले. गोमोशाच्या मागणीत वाढ होत असून या त्याप्रमाणात गोमोशाचे उत्पादन करण्यासाठी स्वयंसहायता गट उदयाला येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
महिलांना मिळणारे उत्पन्न हे त्यांच्या सक्षमीकरणाचे साधन व्हावे या उद्देशाने ‘महिला सम्मान बचत प्रमाणपत्र’ योजना सुरु केल्याचे ते म्हणाले. “महिलांना त्यांच्या बचतीवर उच्च व्याज दराचा लाभ मिळू शकेल” पीएम आवास योजनेंतर्गत घरकुलांच्या वाटपाची व्याप्ती 70 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवली असून अधिकतम घरे ही त्या कुटुंबातील महिलांच्या नावावर आहेत. "या अर्थसंकल्पात अशा अनेक तरतुदी आहेत, ज्याचा आसाम, नागालँड, त्रिपुरा, मेघालय यांसारख्या ईशान्येकडील राज्यांतील महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण होतील," असे ते पुढे म्हणाले.
कृष्णगुरु यांच्या शिकवणीतील संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की प्रत्येकाने नित्यकर्म आणि भक्तीमध्ये विश्वास ठेवून नेहमी स्वतःच्या आत्म्याची सेवा केली पाहिजे. देशाच्या विकासाकरता केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची जीवनरेखा समाजाची शक्ती आणि लोकसहभाग यांना चालना देते असे ते म्हणाले. आज आयोजित केलेल्या यज्ञाप्रमाणेच हा एक सेवायज्ञ असून भविष्यात तो देशाची फार मोठी ताकद बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसहभागातून यशस्वी झालेल्या स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया यांसारख्या योजनांचे उदाहरण देत पंतप्रधान म्हणाले की बेटी बचाओ बेटी पढाओ, पोषण अभियान, खेलो इंडिया, फिट इंडिया, योग आणि आयुर्वेद यांसारख्या योजना पुढे नेण्यात कृष्णगुरु सेवाश्रमाची महत्त्वाची भूमिका आहे, ज्यामुळे देश आणखी मजबूत होईल.
पारंपरिक कारागीरांसाठी देश ‘पी एम विश्वकर्मा कौशल योजना’ सुरु करत आहे, या पारंपरिक कारागीरांच्या कौशल्य वृद्धीसाठी देशाने पहिल्यांदाच हे पाउल उचलले आहे. असे पंतप्रधान म्हणाले. या योजनेबद्दल कृष्णगुरु सेवाश्रमाने जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. नुकतेच श्रीअन्न असे नामकरण केलेल्या भरड धान्याचे महत्व लोकांना पटवून देण्याकरता श्रीअन्नाच्या प्रसादाचे वितरण करण्याचे आवाहन देखील त्यांनी सेवाश्रमाला केले. सेवाश्रमाच्या प्रकाशनांच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांच्या गाथा आणि इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवाव्यात असे त्यांनी सांगितले. 12 वर्षांनंतर जेव्हा हे अखंड कीर्तन होईल तेव्हा आपण अधिक सशक्त आणि समृद्ध भारताचे साक्षीदार होऊ, असे आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले.
पार्श्वभूमी
परमगुरु कृष्णगुरु ईश्वर यांनी आसाममधील बारपेट येथील नास्तरा या गावी 1974 मध्ये कृष्णगुरु सेवाश्रमाची स्थापना केली. ते महान वैष्णव संत श्री शंकरदेवांचे अनुयायी असलेल्या महावैष्णव मनोहरदेवांचे नववे अनुयायी आहेत. जागतिक शांततेसाठी कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तन या महिनाभर चालणाऱ्या कीर्तनाचा 6 जानेवारीपासून कृष्णगुरु सेवाश्रम येथे आरंभ झाला आहे.
***
S.Patil/S.Chavan/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1896192)
Visitor Counter : 200
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam