अर्थ मंत्रालय
युवा वर्गाचे सक्षमीकरण आणि अमृत पिढीला तिची स्वप्ने साकारण्यात मदत करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची निर्मिती
Posted On:
01 FEB 2023 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2023
युवा वर्गाचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि अमृत पिढीला तिची स्वप्ने साकारण्यात मदत करण्यासाठी आम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरणाची निर्मिती केली आहे, कौशल्यनिर्मितीवर भर दिला आहे, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणाऱ्या आर्थिक धोरणाचा अंगिकार केला आहे आणि व्यवसायाच्या संधींना पाठबळ दिले आहे असे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर करताना सांगितले. 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्राधान्यक्रमाच्या सात गोष्टींचा अंगिकार करण्यात आला आहे ज्या परस्परांना पूरक आहेत आणि आपल्याला अमृत काळात ‘सप्तर्षी’ म्हणून मार्गदर्शन करत आहेत. युवा ऊर्जा हे प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांपैकी एक आहे ज्यामध्ये कौशल्य विकास समाविष्ट आहे.
प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0
पुढील तीन वर्षांमध्ये लाखो युवकांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 सुरू करण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. नोकरीतील प्रशिक्षण, उद्योगांची भागीदारी आणि उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रमाना संलग्न करण्यावर ही योजना भर देईल, अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेत कोडिंग, एआय, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, आयओटी, थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन्स आणि सॉफ्ट स्किल्स यांसारख्या नव्या युगातील अभ्यासक्रमांचा देखील समावेश असेल ही बाब त्यांनी अधोरेखित केली. युवा वर्गाला आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यांमध्ये 30 स्किल इंडिया आंतरराष्ट्रीय केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याचे देखील सीतारामन यांनी प्रस्तावित केले.
नॅशनल ऍप्रेन्टिसशीप प्रोत्साहन योजना
देशव्यापी नॅशनल ऍप्रेन्टिसशिप प्रोत्साहन योजने अंतर्गत तीन वर्षात 74 लाख युवांना पाठ्यवृत्तीचे(स्टायपेंड) पाठबळ देण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण(डीबीटी) सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
युनिफाईड स्किल इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म
युनिफाईड स्किल इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करून कौशल्यासाठीची डिजिटल व्यवस्था आणखी विस्तारण्यात येईल, अशी माहिती सीतारामन यांन दिली. या प्लॅटफॉर्मबाबत अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले की हा प्लॅटफॉर्म मागणी आधारित औपचारिक कौशल्य निर्माण करेल, एमएसएमईसहित नियोक्त्यांशी जोडलेला असेल आणि उद्यमशीलता योजनांच्या वापराची सुविधा देईल.
* * *
M.Chopade/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1895435)
Visitor Counter : 346