पंतप्रधान कार्यालय

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी प्रसार माध्‍यमाच्या प्रतिनिधींसमोर केलेले निवेदन

Posted On: 31 JAN 2023 11:35AM by PIB Mumbai

नमस्कार मित्रहो,  

2023 या नववर्षात आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे आणि अगदी आरंभापासूनच अर्थकारणात ज्यांच्या मतांना महत्व आहे, अशाप्रकारची मते एक सकारात्मक संदेश घेऊन येत आहेत, एक आशेचा किरण घेऊन आणि नवीन उत्साह घेऊन येत आहे. आज एक महत्वपूर्ण दिवस आहे. भारताच्या राष्ट्रपती आज प्रथमच संसदेच्या संयुक्त सभागृहांना मार्गदर्शन  करणार आहेत. राष्ट्रापतीजींचे भाषण म्हणजे भारताच्या संविधानाचा सन्मान आहे, भारताच्या संसदीय प्रणालीचा गौरव आहे आणि आज मुख्यत्वे महिलांच्या सन्मानाचा क्षण आहे तसेच तो दुर्गम भागात वनांमध्ये आपले जीवन व्यतीत करणाऱ्या आपल्या देशाच्या महान आदिवासी परंपरेच्या गौरवाचा देखील क्षण आहे. भारताच्या वर्तमान राष्ट्रपतींचे आज संसदेत होणारे पहिले भाषण हा केवळ संसद प्रतिनिधींसाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी एक अभिमानाचा क्षण आहे.  आपल्या संसदीय कार्यकाळातील मागील सहा सात दशकांमध्ये जी परंपरा रुजली आहे, त्यावरून असे दिसून आले आहे की, सभागृहात बोलण्यासाठी पहिल्यांदाच उभा राहणारा कोणीही नवा संसदपटू हा कोणत्याही पक्षाचा का असो , तो जेव्हा प्रथमच सभागृहात बोलतो तेव्हा संपूर्ण सभागृह  त्यांचा  आदर करते, अशा प्रकारे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि एक अनुकूल वातावरण तयार होते. ही एक उत्तम आणि उदात्त परंपरा आहे. आज राष्ट्रपतींचे भाषण देखील त्यांचे पहिलेच भाषण आहे, आजचा हा क्षण सर्व खासदारांच्या वतीने आशा, उत्साह आणि उर्जेने परिपूर्ण बनविणे,  ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मला विश्वास आहे की आपण सर्व संसदपटू या जबाबदारीचे  कसोशीने पालन करू. आपल्या देशाच्या वित्तमंत्री देखील महिला आहेत आणि त्या उद्या आणखी एक अर्थसंकल्प देशासमोर सादर करणार आहेत. आजच्या जागतिक परिस्थितीत भारताच्या अर्थसंकल्पाकडे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष आहे.  जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत असताना, भारताचा अर्थसंकल्प भारतातील सर्वसामान्य माणसांच्या आशा - आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न तर करेलच  मात्र जगाला भारतामध्ये जो आशेचा किरण दिसत आहे तो अधिक दैदिप्यमान होईल. मला मनोमन खात्री आहे की,  निर्मलाजी या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी अथक परिश्रम घेतील. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचे  ‘इंडिया फर्स्ट सिटिझन फर्स्ट’- अर्थात ‘सर्वात आधी देश , सर्वात आधी देशवासी’  हे एकच उद्दिष्ट, एकच बोधवाक्य, एकच ध्येय आणि हाच विचार आपल्या कार्यसंस्कृतीच्या केंद्रस्थानी राहिला आहे. तोच जोश पुढे नेत या  अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चर्चा होईल.  पण चर्चा ही व्हायला हवी. आणि मला विश्वास आहे की आमचे  विरोधी पक्ष नेते अतिशय बारकाईने अभ्यास करून पूर्ण तयारीनिशी आपले म्हणणे सभागृहासमोर मांडतील. देशाच्या धोरणात्मक निर्णयांवर  सभागृहात चांगले विचारमंथन  होईल आणि यातूनच देशासाठी उपयुक्त ठरेल असे,  अमृत प्राप्त होईल . मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.

मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.  

***

सुवर्णा बेडेकर/ भक्ती सोनटक्के/सी.यादव

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1894894) Visitor Counter : 222