पंतप्रधान कार्यालय
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील नामकरण न झालेल्या सर्वात मोठ्या आकाराच्या 21 बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्या वीरांची नावे प्रदान करण्यासाठी आयोजित समारंभात पंतप्रधानांचा सहभाग
नेताजी सुभाष चंद्र बोस बेटावर नेताजींना समर्पित उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाच्या लघु-प्रतिकृतीचे केले अनावरण
“जेव्हा इतिहास घडत असतो, तेव्हा येणाऱ्या पिढ्या केवळ त्याचे स्मरण, मूल्यमापन आणि मूल्यांकन करत नाहीत,तर त्यापासून अविरत प्रेरणा देखील घेतात”
“आजचा दिवस, स्वातंत्र्याच्या अमृत काळातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय म्हणून येणाऱ्या पिढ्यांच्या स्मरणात राहील”
“सेल्युलर तुरुंगाच्या कोठड्यांमधून अजूनही प्रचंड वेदनेसह अभूतपूर्व दृढनिश्चयाचे ध्वनी कानी येतात ”
“बंगाल ते दिल्ली ते अंदमान असा देशाचा प्रत्येक भाग नेताजींना सलाम करतो आणि त्यांचा वारसा जपतो”
“आपल्या लोकशाही संस्था आणि कर्तव्य पथ यांच्यासमोरच्या परिसरात उभा असलेला नेताजींचा भव्य पुतळा आम्हाला आमच्या कर्तव्यांची जाणीव करून देतो”
“जसा समुद्र विविध बेटांना जोडतो तशीच, ‘एक भारत,श्रेष्ठ भारत’ ही भावना भारतमातेच्या प्रत्येक सुपुत्राला एकत्र आणते”
“लष्कराच्या योगदानासह, राष्ट्रीय सुरक्षेसाठी ज्या सैनिकांनी प्राण वेचले त्यांचा विस्तृतपणे गौरव करणे हे देशाचे कर्तव्य आहे”
“आता अनेक लोक इतिहास जाणून घेत,तो नव्याने जगण्यासाठी अंदमान आणि निकोबार बेटांना भेट देत आहेत”
Posted On:
23 JAN 2023 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2023
पराक्रम दिनानिमित्त, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील नामकरण न झालेल्या सर्वात मोठ्या आकाराच्या 21 बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्या वीरांची नावे प्रदान करण्यासाठी आयोजित समारंभात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, सहभागी झाले. या कार्यक्रमात, नेताजी सुभाष चंद्र बोस बेटावर उभारण्यात येणाऱ्या आणि नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या लघु-प्रतिकृतीचे देखील त्यांनी अनावरण केले.
याप्रसंगी, उपस्थितांना संबोधित करताना प्रत्येकाला पराक्रम दिनाच्या शुभेच्छा देऊन ते म्हणाले की, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त, देशभर हा प्रेरणादायी दिवस साजरा करण्यात येत आहे. “जेव्हा इतिहास घडत असतो, तेव्हा येणाऱ्या पिढ्या केवळ त्याचे स्मरण, मूल्यमापन आणि मूल्यांकन करत नाहीत,तर त्यापासून अविरत प्रेरणा देखील मिळवतात,” त्यांनी सांगितले. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील 21 बेटांचे नामकरण आज होत असून ही बेटे आता 21 परमवीरचक्र विजेत्या शूरवीरांच्या नावांनी ओळखली जातील अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. ते पुढे म्हणाले की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्या बेटावर काही काळ वास्तव्य केले त्या बेटावर बोस यांच्या जीवनकार्याचा गौरव करणाऱ्या नव्या स्मारकाची कोनशीला देखील आज बसवली जात असून आजचा दिवस, स्वातंत्र्याच्या अमृत काळातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय म्हणून येणाऱ्या पिढ्यांच्या सदैव स्मरणात राहील. नेताजी स्मारक आणि नव्याने नामकरण झालेली 21 बेटे म्हणजे तरुण पिढीसाठी प्रेरणेचा अविरत स्त्रोत असतील ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली.
अंदमान निकोबार द्वीपसमूहाच्या इतिहासावर प्रकाश टाकत ते म्हणाले की, सर्वप्रथम याच भूमीवर तिरंगा फडकविण्यात आला आणि येथेच भारताच्या पहिल्या स्वतंत्र सरकारची स्थापना झाली. ते पुढे म्हणाले की, वीर सावरकर आणि त्यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी याच ठिकाणी देशासाठी केलेली तपश्चर्या आणि त्याग यांचा परमोच्च बिंदू गाठला. ते म्हणाले, “सेल्युलर तुरुंगाच्या कोठड्यांमधून अजूनही त्या प्रचंड वेदनेसह अभूतपूर्व इच्छांचे ध्वनी कानी येतात.” अंदमानची ओळख स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणींऐवजी, गुलामगिरीचे प्रतीक म्हणून सर्वश्रुत झाली याबद्दल खेद व्यक्त करून ते म्हणाले, “अगदी आपल्या बेटांच्या नावांवर देखील गुलामगिरीची छाप होती.” अंदमान परिसरातील तीन मुख्य बेटांचे नामकरण करण्यासाठी चार-पाच वर्षांपूर्वी पोर्ट ब्लेयरला दिलेल्या भेटीचे स्मरण करून, “रॉस बेट आज नेताजी सुभाषचंद्र बोस बेट झाले आहे तर हॅवलॉक आणि नील बेटांची नावे अनुक्रमे स्वराज आणि शहीद अशी झाली आहेत” अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. स्वराज आणि शहीद या बेटांना नेताजींनी स्वतःच ही नावे दिली होती मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील या गोष्टीला महत्त्व दिले गेले नाही. “जेव्हा आझाद हिंद सेना सरकारला 75 वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने आमच्या सरकारने ही नावे पुनर्स्थापित केली,” पंतप्रधानांनी सांगितले.
काही काळापूर्वी, भारताच्या इतिहासाच्या पानांमध्ये हरवून गेलेल्या त्याच नेताजींचे आज एकविसाव्या शतकातील भारत पुन्हा स्मरण करत आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. नेताजींनी अंदमान येथे ज्या ठिकाणी सर्वप्रथम तिरंगा फडकवला होता त्याच ठिकाणी आज उत्तुंग भारतीय तिरंगा फडकविण्यात आला ही गोष्ट ठळकपणे नमूद करत पंतप्रधान म्हणाले की, हा तिरंगा अंदमानला भेट देणाऱ्या प्रत्येक देशवासीयाचे हृदय राष्ट्रप्रेमाने भरून टाकेल.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात येणारे नवीन संग्रहालय आणि स्मारकामुळे अंदमानची भेट अधिक संस्मरणीय होईल, असे त्यांनी नमूद केले. 2019 मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावर उदघाटन झालेल्या नेताजी संग्रहालयाचा उल्लेख करत ते ठिकाण लोकांसाठी प्रेरणास्रोत बनले आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. बंगालमध्ये नेताजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात विशेष कार्यक्रम आणि हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा या गोष्टी त्यांनी नमूद केल्या. “बंगाल ते दिल्ली ते अंदमान पर्यंत, देशाचा प्रत्येक भाग नेताजींचा वारसा जपत आहे आणि त्याला अभिवादन करत आहे ”, असे पंतप्रधान म्हणाले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित कार्ये अधोरेखित करत जी कार्ये स्वातंत्र्यानंतर त्वरित व्हायला हवी होती आणि ती गेल्या 8-9 वर्षात करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.1943 मध्ये या भागात स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन झाले आणि देशाने ते अधिक अभिमानाने स्वीकारल्याचे त्यांनी अधोरेखित केले.आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाने नेताजींना आदरांजली वाहिल्याचे त्यांनी नमूद केले. नेताजींच्या जीवनाशी संबंधित फायली सार्वजनिक करण्याच्या अनेक दशकांपासूनच्या मागणीवर भर देत हे काम पूर्ण निष्ठेने केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.“आज आपल्या लोकशाही संस्थांसमोरील नेताजींचा भव्य पुतळा आणि कर्तव्यपथ आपल्याला आपल्या कर्तव्याची आठवण करून देत राहील ”, असे पंतप्रधान म्हणाले.
ज्या देशांनी जनतेची नाळ आपले शूर वीर तसेच स्वातंत्र्यसैनिकांशी जोडलेली ठेवत सक्षम आदर्श निर्माण करून सामायिक केले, ते देश विकासाच्या आणि राष्ट्र निर्मितीच्या शर्यतीत खूप पुढे गेले आहेत, भारत स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये अशा प्रकारची पावले उचलत आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
21 बेटांना नावे देण्यामागील ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा अनोखा संदेश अधोरेखित करत, देशासाठी दिलेल्या बलिदानाचा आणि भारतीय सैन्याच्या धैर्याचा आणि शौर्याचा हा संदेश आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 21 परमवीर चक्र विजेत्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग केल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि हे भारतीय सैन्यातील शूर सैनिक वेगवेगळ्या राज्यांतील होते, ते वेगवेगळ्या भाषा आणि बोली बोलत होते आणि भिन्न जीवनशैली जगत होते मात्र भारतमातेची सेवा आणि मातृभूमीसाठीची अखंड भक्तीने त्यांना एकत्र आणले, हे त्यांनी नमूद केले. "जसा समुद्र वेगवेगळ्या बेटांना जोडतो, त्याचप्रमाणे 'एक भारत, श्रेष्ठ भारत' ही भावना भारतमातेच्या प्रत्येक सुपुत्राला एकत्र आणते ," असे पंतप्रधान म्हणाले. “मेजर सोमनाथ शर्मा, पिरू सिंह , मेजर शैतान सिंह यांच्यापासून ते कॅप्टन मनोज पांडे, सुभेदार जोगिंदर सिंह आणि लान्स नायक अल्बर्ट एक्का, वीर अब्दुल हमीद आणि मेजर रामास्वामी परमेश्वरनपासून ते सर्व 21 परमवीरांपर्यंत सर्वांचा एकच संकल्प होता- राष्ट्र प्रथम! भारत प्रथम! हा संकल्प आता या बेटांच्या नावाने कायमचा अमर झाला आहे. अंदमानमधील एक टेकडीही कारगिल युद्धातील कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या नावाने समर्पित केली जात आहे असे ते म्हणाले.
अंदमान आणि निकोबार मधील बेटांचे नामकरण केवळ परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांचाच नाही तर भारतीय सशस्त्र दलांचाही सन्मान आहे. स्वातंत्र्यापासूनच आपल्या लष्कराला युद्धांना सामोरे जावे लागले होते, याची आठवण करून देत, आपल्या सशस्त्र दलांनी सर्व आघाड्यांवर आपले शौर्य सिद्ध केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ज्या जवानांनी या देश रक्षणाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले त्यांच्यासह लष्कराच्या योगदानाची व्यापक दखल घेतली जावी, हे देशाचे कर्तव्य होते.'' ''आज देश या कर्तव्याचे जबाबदारीने पालन करत आहे तसेच आज देश जवान आणि सैन्याच्या नावाने ओळखला जात आहे.", असे पंतप्रधानांनी सांगितले.
अंदमान आणि निकोबार बेटांच्या क्षमतेवर प्रकाश टाकत , ही जल, निसर्ग, पर्यावरण, प्रयत्न, शौर्य, परंपरा, पर्यटन, प्रबोधन आणि प्रेरणेची भूमी आहे आणि येथील क्षमता आणि संधी ओळखण्याची गरज आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. पंतप्रधानांनी गेल्या 8 वर्षात केलेली कामे अधोरेखित करत , 2014 च्या तुलनेत 2022 मध्ये अंदमानला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाली झाल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यटनाशी संबंधित रोजगार आणि उत्पन्नात वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले. अंदमानशी संबंधित स्वातंत्र्याच्या इतिहासाविषयीही उत्सुकता वाढत असल्याने या ठिकाणाची ओळखही वैविध्यपूर्ण होत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.“आता लोक सुद्धा इतिहास जाणून घ्यायला आणि काळाची अनुभूती घ्यायला येथे येत आहेत" असे ते म्हणाले. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांना समृद्ध आदिवासी परंपरा लाभली असून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित स्मारक आणि सैन्याचे शौर्य यांचा सन्मान केल्याने भारतीयांमध्ये या स्थळाला भेट देण्याची उत्सुकता नव्याने निर्माण होईल.
याआधीच्या सरकारने आत्मविश्वासाचा अभाव, दशकानुदशके बाळगलेला न्यूनगंड आणि विशेषतः वैचारिक पातळीवरील अपरिपक्व राजकारणामुळे देशाच्या क्षमता जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, असे पंतप्रधानांनी सांगितले. मग ती आपली हिमालयातील राज्ये विशेषतः ईशान्येकडील राज्ये असोत किंवा अंदमान आणि निकोबार सारखे महासागरातील द्वीपकल्प असोत, या भागांकडे कायमच दुर्गम, बिन महत्वाचा भाग म्हणून पाहिल्याने हे प्रदेश कित्येक दशके विकासापासून वंचित राहिले आहेत. भारतातील द्वीपकल्प आणि त्यांच्या संख्येचा हिशेब ठेवला जात नाही, असा उल्लेख पंतप्रधानांनी केला. सिंगापूर, मालदीव आणि सेशेल्स सारख्या विकसित बेट राष्ट्रांची उदाहरणे देत, पंतप्रधान म्हणाले की या राष्ट्रांचे भौगोलिक क्षेत्रफळ हे अंदमान आणि निकोबार पेक्षाही कमी आहे मात्र आपल्या साधनसंपत्तीचा योग्य उपयोग करून या राष्ट्रांनी एक नवीन उंची गाठली आहे. भारतातील बेटांवरही अशीच क्षमता असल्याचे आणि त्या दिशेने देशाचे प्रयत्न सुरु असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. अंदमानला "सबमरीन ऑप्टिकल फायबर"च्या माध्यमातून जलद गती इंटरनेट सेवा पुरवल्यामुळे डिजिटल व्यवहारात वाढ होऊन पर्यटकांना त्याचा कसा लाभ होत आहे, याचे उदाहरण पंतप्रधानांनी यावेळी दिले. आता आपल्या देशात नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आधुनिक संसाधनांची सांगड घातली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
ज्याप्रमाणे भूतकाळात अंदमान निकोबार बेटांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली, त्याचप्रमाणे हा प्रदेश देशाच्या भविष्यातील विकासाला नवसंजीवनी देईल असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. ' आपण नक्कीच एका सामर्थ्यशाली भारताची उभारणी करू आणि आधुनिक विकासाचे शिखर सर करू, असा मला दृढ विश्वास आहे" असे पंतप्रधान म्हणाले.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल अॅडमिरल डी के जोशी , चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
अंदमान आणि निकोबार बेटांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2018 मधील या बेटांच्या भेटीच्या वेळी रॉस बेटांला नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असे नाव देण्यात आले होते. नील बेट आणि हॅवलॉक बेट यांचे देखील शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप असे नामकरण करण्यात आले होते.
देशात वास्तविक जीवनातल्या खऱ्या नायकांना योग्य आदर सन्मान देण्याला पंतप्रधानांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. याच अनुषंगाने आता द्वीपसमूहातील नामकरण न झालेल्या 21 सर्वात मोठ्या बेटांना 21 परमवीर चक्र पुरस्कार विजेत्या वीरांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधील सर्वात मोठ्या बेटाला पहिल्या परमवीर चक्र पुरस्कार विजेत्याचे तर दुसऱ्या क्रमांकावरील मोठ्या बेटाला दुसऱ्या परमवीर चक्र पुरस्कार विजेत्याचे नाव अशाप्रकारे ही नावे दिली जातील .या वीरांपैकी कित्येकांनी आपल्या देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता कायम राखण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्या वीरांना हा कायमस्वरूपी सन्मान ठरेल.
ही बेटे ज्या परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने ओळखली जातील त्यांची नावे पुढीलप्रमाणे - मेजर सोमनाथ शर्मा , सुभेदार आणि मानद कॅप्टन ( तत्कालीन लान्स नायक) करम सिंग एम एम, सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे, नायक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पीरू सिंग, कॅप्टन जी. एस सलारिया, लेफ्टनंट कर्नल (तत्कालीन मेजर) धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, सीक्यूएमएच अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बर्जोरजी तारापोर, लान्स नायक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेखॉऺ, मेजर रामस्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बनासिंग, कॅप्टन विक्रम बात्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, सुभेदार मेजर (तत्कालीन रायफल मॅन) संजय कुमार आणि निवृत्त सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव.
* * *
N.Chitale/Sanjana/Sonal C/Bhakti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1893022)
Visitor Counter : 395
Read this release in:
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam