पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शासकीय विभाग आणि संघटनांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 71,000 जणांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नियुक्ती पत्रांचे वितरण केले, त्याप्रसंगीचे भाषण

Posted On: 20 JAN 2023 1:47PM by PIB Mumbai

नमस्‍कार!

मित्रहो,

2023 वर्षातला हा पहिलाच रोजगार मेळावा आहे. उज्वल भविष्याच्या नव्या आशेसह 2023 वर्षाची सुरुवात झाली आहे. ज्या 71 हजार कुटुंबांमधील सदस्यांना शासकीय सेवेची संधी मिळाली आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष आनंदाची नवी भेट घेऊन आले आहे. या सर्व युवांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मी मनापासून अभिनंदन करतो.

आजचा हा कार्यक्रम केवळ यशस्वी उमेदवारांनाच नाही तर कोट्यवधी कुटुंबांनाही आशेची नवीन किरणे प्रदान करणारा ठरेल. येत्या काही दिवसांत आणखी लक्षावधी कुटुंबांमधील सदस्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती मिळणार आहे.

केंद्र सरकार बरोबरच रालोआ आणि भाजपशासित राज्यांमध्ये सुद्धा सातत्याने रोजगार मेळावे सुरू आहेत. आसाम सरकारने कालच रोजगार मेळावा आयोजित केला होता. मला सांगण्यात आले आहे की येणाऱ्या काळात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंड अशा अनेक राज्यांमध्ये रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. सातत्याने होणारे हे रोजगार मेळावे, आता आमच्या सरकारची ओळख बनले आहेत.

आमचे सरकार जो संकल्प करते, तो पूर्णत्वाला नेते, हे यावरून दिसून येते. तुम्हाला आठवत असेल, गेल्या वर्षी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर पहिल्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

रोजगार मेळाव्यात सरकारी नोकरी मिळालेल्या काही तरुण सहकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधीही आज मला मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि समाधानाची भावना स्पष्टपणे दिसत होती. यापैकी बहुतेक जण अगदी साधारण कुटुंबातील आहेत. आणि त्यांच्यामध्ये असे अनेक तरुण आहेत, जे आपल्या संपूर्ण कुटुंबात पाच पिढ्यांमध्ये सरकारी नोकरी मिळवणारे पहिलेच सदस्य ठरले आहेत. शासकीय सेवा करण्याची, सरकारी नोकरी करायची संधी मिळाली, एवढ्यापुरता त्यांचा आनंद मर्यादित नाही. पारदर्शक आणि न्याय्य भरती प्रक्रियेमुळे आपल्या गुणवत्तेचा आदर करण्यात आल्याचेही त्यांना समाधान आहे.

आपणा सर्वांच्याही लक्षात आले असेल की भरती प्रक्रियेत मोठा बदल झाला आहे. केंद्रीय सेवांमधील भरती प्रक्रिया आधीच्या तुलनेत जास्त सुव्यवस्थित आणि कालबद्ध झाली आहे.

मित्रहो,

आज तुम्हाला भरती प्रक्रियेत जी पारदर्शकता आणि गती दिसते आहे, ती सरकारच्या प्रत्येक कामात दिसून येते आहे. एक काळ असा होता की तेव्हा वेगवेगळ्या कारणांमुळे नियमित पदोन्नतींचाही खोळंबा होत असे.

आमच्या सरकारने वेगवेगळे वाद निकाली काढले आहेत, कोर्ट-कचेर्‍यांचीही बरीच प्रकरणे असतात, दीर्घ काळापासून रखडलेल्या पदोन्नती मार्गी लावण्यासाठी आम्ही वचनबद्धतेने काम केले आहे. पारदर्शक पद्धतीने भरती आणि पदोन्नतीमुळे तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. ही पारदर्शकताच त्यांना चांगल्या तयारीनीशी स्पर्धेत उतरण्यास प्रवृत्त करते. आमचे सरकार या दिशेने सातत्याने काम करत आहे.

मित्रहो,

आज ज्यांना नियुक्तीपत्र मिळाले आहे, त्यांच्यासाठी ही आयुष्यातील एका नवीन प्रवासाची सुरूवात आहे. सरकारचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, विकसित भारताच्या प्रवासात तुमचा सक्रिय सहभाग होत राहिल, ही एक विशेष जबाबदारी असेल. तुमच्यापैकी बहुतेक जण सरकारचे प्रतिनिधी म्हणून थेट लोकांच्या संपर्कात असाल. तुमच्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीने लोकांच्या जीवनावर परिणाम करेल.

ग्राहक नेहमीच बरोबर असतो, असे व्यापारी जगतात म्हटले जाते, ते तुम्ही ऐकले असेलच. त्याचप्रमाणे, शासकीय व्यवस्थेत, नागरीक नेहमीच बरोबर असतो, असा आपला मंत्र असला पाहिजे. हीच भावना आपल्यातल्या सेवा वृत्तीला आणखी बळ देते. जेव्हा शासकीय नोकरीत तुमची नियुक्ती होते, त्याला शासकीय सेवा म्हणतात, नोकरी नाही, हे तुम्ही कधीही विसरू नका.

खाजगी काम असेल तर नोकरी करतो, असे सांगितले जाते. मात्र सरकारमध्ये असलात तर शासकीय सेवेत आहे, असे म्हटले जाते. हाच सेवाभाव अंतरी बाळगून तुम्ही माझ्या या 140 कोटी देशबांधवांची सेवा करावी, तुम्हाला हे मोठे सौभाग्य लाभले आहे. आयुष्यात एक संधी मिळाली आहे आणि अशा भावनेतून काम केले तर त्याचा लोकांवर सकारात्मक परिणाम होईल आणि तुम्हालाही तुमच्या कामाचा आनंद मिळत राहील.

सरकारी नोकरी मिळालेले आपले कितीतरी सहकारी कर्मचारी, कर्मयोगी बंधू ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहेत, हे आपण अत्ताच पाहिलं. iGOT कर्मयोगी या डिजिटल प्रशिक्षण मंचावरून त्यांना भविष्याच्या तयारीसाठी मदत मिळत आहे. अधिकृत प्रशिक्षण कार्यक्रमांव्यतिरिक्त, या मंचावर इतरही अनेक अभ्यासक्रम आहेत, जे तुमची वैयक्तिक क्षमता वाढवतात. तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासात तुमच्या विचारांच्या खोलीत हळूहळू प्रगती होत जाते, फायदा होतो.

मला विश्वास आहे की तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वयं प्रशिक्षण ही आजच्या पिढीला मिळालेली संधी आहे, ती सोडू नका. जीवनात सतत शिकत राहण्याची जिद्दच आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाते. आणि मी नेहमी म्हणतो, की माझ्यातल्या विद्यार्थ्याला मी कधीच संपू देत नाही. तुम्हीही, कितीही वरच्या स्थानावर पोहोचलात, तरी सतत काही ना काही शिकत रहा. त्याने तुमची क्षमता वाढेल, ज्या संस्थेशी तुम्ही जोडले गेले आहात, तिची क्षमता वाढेल आणि या सर्वांच्या प्रयत्नांनीच भारताची क्षमता वाढेल.

बदलत्या भारतात, वेगाने पुढे जात असलेल्या भारतात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी सतत निर्माण होत आहेत. आणि जेव्हा वेगाने विकास होत असतो, तेव्हा स्वयंरोजगाराच्या अगणित संधी निर्माण होऊ लागतात, भारत आज तोच अनुभव घेत आहे. स्वयंरोजगाराचं क्षेत्र आज वेगाने पुढे जात आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये व्यापक स्तरावरच्या पायाभूत सुविधा विकासामुळे रोजगाराच्या लाखो संधी निर्माण झाल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रातली 100 लाख कोटीची गुंतवणूक रोजगाराच्या अगणित संधींचं दार उघडत आहे.

जेव्हा एखादा नवीन रस्ता बनतो, तेव्हा त्याच्या आजूबाजूला रोजगाराच्याही नवीन वाटा कशा बनू लागतात, हे तुम्हाला माहीत आहे. त्याच रस्त्याच्या कडेला नवीन बाजार उभे राहतात, सर्व प्रकारची दुकानं उघडतात. रस्ता असल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन बाजारापर्यंत सहज पोहोचू लागतं.

तसंच जेव्हा एखादी नवीन जागा, नवीन रेल्वे मार्गाबरोबर जोडली जाते, तेव्हा तिथला बाजार समृद्ध होऊ लागतो. येण्या जाण्याच्या सोयीमुळे पर्यटनाचाही विस्तार होतो, आणि अशा प्रकारच्या प्रत्येक विस्तारामध्ये रोजगाराच्या नवीन संधी असतात.

आज भारतनेट प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक गावाला ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी दिली जात आहे. जेव्हा आपण इंटरनेटच्या माध्यमातून गावांना उर्वरित जगाशी जोडतो तेव्हा यामधूनही रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ लागतात.  ज्याला तंत्रज्ञान समजत नाही अशा माणसालाही हे माहीत असतं, की ज्या कामांसाठी यापूर्वी धावपळ करावी लागत होती, तीच आता मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरच्या एका क्लिकने केली जातात.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अनेकदा तंत्रज्ञानाच्या जाणकाराची मदत लागते, हे आपण पाहतो. आणि सर्वसामान्य माणसाच्या याच गरजेतून रोजगाराच्या नव-नवीन शक्यता निर्माण होतात. आज खेड्यापाड्यात, किंवा शहरांमध्येही असे उद्योजक दिसतील जे लोकांना ऑनलाइन सेवा देण्यासाठी स्वतःचं नवीन क्षेत्र सुरु करून ते काम पुढे नेत आहेत. आज भारताच्या छोट्या छोट्या शहरांचे लोक ज्या प्रकारे स्टार्टअप सुरु करत आहेत, ते नवीन पिढीसाठी आकर्षणाचं आणि आत्मविश्वासाचं केंद्र बनले आहेत. स्टार्टअपच्या यशामुळे युवा शक्तीच्या क्षमतेची जगभरात ओळख निर्माण झाली आहे.   

मित्रांनो,

आपल्यापैकी बहुतांश तरुण मुलगे आणि मुली अगदी सामान्य कुटुंबातून आले आहात. इथवर पोहोचण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम केले आहेत. तुमच्या आई-वडिलांनीही खूप कष्ट घेतले आहेत. आज तुम्हाला 140 कोटी देशवासीयांची कायमस्वरूपी सेवा करण्याची संधी मिळाली आहे, तरीही तुमच्यामधील ती भावना सदैव जीवंत ठेवा, जिने तुम्हाला इथवर पोहोचण्याची  प्रेरणा दिली होती. सतत शिकत रहा, आपली कौशल्य वाढवत रहा, आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत रहा.

माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही यशस्वी व्हा, पण आपला देशही यशस्वी झाला पाहिजे. तुम्ही पुढे जा, पण आपला देशही पुढे जायला हवा. आणि देशाला पुढे नेण्यासाठी तुम्हालाही पुढे जावं लागेल. देशाला पुढे नेण्यासाठी तुम्हालाही समर्थ व्हावं लागेल, सक्षम व्हावं लागेल. स्वत:चा सतत विकास करत राहा आणि तुम्हाला मिळालेली जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडा. या माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.

धन्यवाद!  

*****

S.Thakur/M.Pange/R Agashe/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1892650) Visitor Counter : 170