पंतप्रधान कार्यालय

दक्षिणेकडील देशांच्या ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ समिट-2023’ च्या नेत्यांच्या सत्राच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 12 JAN 2023 4:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जानेवारी 2023

 

मान्यवर महोदय,

आपण या परिषदेत केलेल्या सखोल निवेदनांबद्दल आपले आभार. तुम्ही यात व्यक्त केलेली निरीक्षणे, पहिल्या ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ समिट-2023’ परिषदेतील पुढच्या आठ सत्रांसाठी मार्गदर्शक ठरतील. तुम्ही जे विचार व्यक्त केले आहेत, त्यातून हे तर स्पष्ट आहे, की विकसनशील देशांचे, मानव-केंद्री विकासाला सर्वाधिक प्राधान्य आहे. आज झालेल्या चर्चेतून, आपल्या सर्व राष्ट्रांसमोर असलेली काही समान आव्हाने देखील ऐरणीवर आली आहेत.  त्यातील प्रमुख आव्हाने, आपल्या विकासाच्या गरजांसाठी असलेल्या स्त्रोतांची कमतरता, तसेच नैसर्गिक हवामानबदल  आणि भू-राजकीय परिस्थिती या दोन्हीमध्ये वाढत असलेली अस्थिरता यामुळे आलेली आहेत. असे असूनही, आपण विकसनशील देश सकारात्मक उर्जेने, आत्मविश्वासाने पुढे जात आहोत, हे ही स्पष्ट आहे.

विसाव्या शतकात, विकसित देश, जागतिक अर्थव्यवस्थेचे वाहक होते. मात्र आज, यापैकी अनेक विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांचा विकासाचा वेग मंदावला आहे. म्हणजेच, 21 व्या शतकात, जागतिक विकासाचा प्रवाह दक्षिणी देशांकडून वाहणार आहे, हे स्पष्ट आहे. आणि म्हणूनचआपण जर एकत्र काम केले तर आपण जागतिक अजेंडा निश्चित करू शकतो, असे मला वाटते. आज आणि उद्याच्या आगामी सत्रांमध्ये, आपण आजच्या चर्चेतून समोर आलेल्या महत्वपूर्ण कल्पनांचा  आणखी विस्तृत विचार करू. आपला प्रयत्न दक्षिणेकडील देशांसाठी कृती आराखडा निश्चित करण्याचा असेल. आपण एकत्रितपणे काय करू शकतो आणि जागतिक अजेंड्याबाबत आपण सगळे मिळून काय निर्णय घेऊ शकतो अशा दोन्हीचा आराखडा.

‘द व्हॉईस ऑफ द ग्लोबल साउथने’ स्वतःचे मत, स्वतःचा आवाज निश्चित करण्याची आवश्यकता आहे. आपल्या निर्मितीत नसलेल्या इतर व्यवस्थांवर आणि परिस्थितींवर अवलंबून राहण्याच्या चक्रातून आपण एकत्रितपणे बाहेर पडण्याची गरज आहे.

आपण सर्व या परिषदेला उपस्थित राहिलात, आणि आपली बहुमूल्य मते मांडलीत त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो.

धन्यवाद !   

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1890726) Visitor Counter : 176