पंतप्रधान कार्यालय
कोविड-19 शी संबंधित सार्वजनिक आरोग्याची स्थिती आणि सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली उच्च स्तरीय बैठक
आत्मसंतुष्ट न राहता, कठोर दक्षता बाळगण्याची पंतप्रधानांची सूचना
जनुकीय क्रमनिर्धारणावर विशेष लक्ष पुरवत दक्षतेच्या उपाययोजना मजबूत करण्याच्या आणि चाचण्या वाढवण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला
रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांची परिचालन सज्जता सुनिश्चित करण्याची राज्यांना सूचना
नागरिकांनी मास्कच्या वापरासह कोविड प्रतिबंधक वर्तणुकीचे पालन करण्याचे आवाहन
वयोवृद्ध आणि दुर्बल गटातील जनतेने प्रीकॉशन डोस घेण्यावर पंतप्रधानांचा भर
आघाडीचे आरोग्य सेवक आणि कोरोना योद्ध्यांच्या निःस्वार्थी सेवेची पंतप्रधानांकडून प्रशंसा
Posted On:
22 DEC 2022 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2022
देशातील कोविड-19 बाबतची परिस्थिती, आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिकची तयारी, देशातील लसीकरण मोहिमेची स्थिती, कोविड-19 च्या नवीन उत्परिवर्तित विषाणू आणि देशातील सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम याचे मूल्यांकन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. काही देशांमध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही उच्च स्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत, आरोग्य सचिव आणि नीती आयोगाच्या सदस्यांनी, काही देशांमधील कोविडचा वाढता प्रादुर्भाव, यासह कोविड-19 च्या जागतिक स्थिती बाबतचे सर्वसमावेशक सादरीकरण केले. देशात कोविडच्या रुग्णसंख्येत सातत्त्याने घट होत असून, 22 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात दैनंदिन रुग्ण संख्या 153, तर साप्ताहिक पॉझीटीवीटी दर 0.14% इतका खाली आला. मात्र, गेल्या 6 आठवड्यांमध्ये जगभरात सरासरी 5.9 लाख दैनंदिन कोविड रुग्णांची नोंद झाल्याची माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली.
कोविड संसर्ग कमी होत असल्याबद्दल आत्मसंतुष्ट न राहता, दक्षता बाळगण्याची सूचना पंतप्रधानांनी यावेळी दिली. कोविड अद्याप संपला नसल्याचा पुनरुच्चार करत, संबंधित अधिकाऱ्यांनी विशेषतः आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील खबरदारीच्या उपाययोजना आणखी मजबूत कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
देखरेख, उपकरणे, प्रक्रिया आणि मनुष्यबळासह कोविड सज्जतेबाबतच्या पायाभूत सुविधा सर्व बाबतीत उच्च स्तरावर राहील हे सुनिश्चित करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. सर्व राज्यांनी ऑक्सिजन सिलेंडर, पीएसए प्लांट्स, व्हेंटिलेटर आणि मनुष्यबळ यासह रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांची परिचालन सज्जता सुनिश्चित करण्यासाठी कोविड विशेष सुविधांचा लेखाजोखा घ्यावा अशी सूचना त्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी चाचण्या आणि जनुकीय क्रमानिर्धारणाचे प्रयत्न वाढवावेत असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. विषाणूचे जनुकीय क्रमानिर्धारण रोजच्यारोज व्हावे, यासाठी राज्यांनी जनुकीय क्रमानिर्धारणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयएनएसएसीओजी प्रयोगशाळांना जास्तीतजास्त नमुने द्यावेत असे ते म्हणाले. यामुळे देशात उत्परिवर्तित विषाणूचा प्रसार होत असेल, तर त्याचा वेळेवर शोध घ्यायला आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना हाती घ्यायला मदत होईल.
गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यासह आगामी सणासुदीच्या काळात सर्वांनी नेहमी कोविड सुसंगत वर्तनाचे पालन करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. प्रीकॉशन डोस विशेषतः असुरक्षित आणि वयोवृद्ध गटाने घ्यावी, यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
देशात औषधे, लस-मात्रा आणि रुग्णालयांमधील खाटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली. अत्यावश्यक औषधांची उपलब्धता आणि किमतींवर नियमितपणे लक्ष ठेवण्याची सूचना पंतप्रधानांनी दिली.
आघाडीवरच्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे जागतिक स्तरावरील कौतुकास्पद काम अधोरेखित करत, त्यांनी अशाच निःस्वार्थी आणि समर्पित भावनेने यापुढेही काम करत रहावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती प्रवीण पवार, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी.के.मिश्रा, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पंतप्रधान कार्यालयाचे सल्लागार अमित खरे, गृहसचिव ए. के. भल्ला, सचीव (एचएफडब्ल्यू) राजेश भूषण, सचीव (डीएचआर) राजीव बहल, फार्मास्युटिकल्स (आय/सी) सचीव अरुण बरोक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1885875)
Visitor Counter : 407
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam