आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आयुष्मान भारत डिजिटल अभियानाद्वारे स्कॅन आणि शेअर सेवेच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये जलद ओपीडी नोंदणीची सुविधा


या सेवेचा वापर करून 1,00,000 हून अधिक रुग्णांनी जलद ओपीडी नोंदणीचा घेतला लाभ

Posted On: 21 DEC 2022 12:04PM by PIB Mumbai

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची  (एनएचए) पथदर्शी योजना असलेल्या आयुष्मान भारत डिजिटल अभियान (एबीडीएम) अंतर्गत स्कॅन आणि शेअर सेवेच्या माध्यमातून रुग्णांसाठी जलद बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा प्रदान केली जाते. ऑक्टोबर 2022 मध्ये नवी दिल्लीतील एका रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या सेवेचा अवलंब आता भारतातील 18 राज्यांमधील 200+ आरोग्य सुविधांमध्ये करण्यात आला आहे. स्कॅन आणि शेअर सेवा सुरु केल्याच्या 75 दिवसांच्या आत, ओपीडी  सल्लामसलतीसाठी त्वरित नोंदणी करून 1 लाखांहून अधिक रुग्णांना त्यांचा वेळ आणि प्रयत्न वाचवण्यात ही सेवा सहाय्य्यकारी ठरली आहे. रुग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी या सुविधेचा वापर करणारी कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश ही  आघाडीवर असलेली  राज्ये आहेत.


ही सेवा रुग्णांना त्यांच्या पसंतीचे कोणतेही आरोग्यविषयक अनुप्रयोग (जसे की एबीएचए (ABHA ) अॅप, आरोग्य सेतू अॅप,  एकेएकेअर (EkaCare), डी रिफकेस (DRiefcase), बजाज हेल्थ, पे टीएम ) वापरून सहभागी रुग्णालय /आरोग्य सुविधेचा विशिष्ट क्युआर कोड स्कॅन करू देते आणि त्यांचे एबीएचए (आयुष्मान भारत आरोग्य खाते)) प्रोफाइल सामायिक करू देते. रुग्णाचे नाव, पालकांचे नाव, वय, लिंग, पत्ता, मोबाईल क्रमांक त्यांच्या एबीएचए मधील (आयुष्मान भारत आरोग्य खाते)   नागरिकांचे तपशील थेट रुग्णालय व्यवस्थापन माहिती यंत्रणेशी (एचएमआयएस) सामायिक केले जातात, यामुळे डिजिटल नोंदणी होते. त्यानंतर रुग्ण त्यांची बाह्यरुग्ण नोंदणीची पावती गोळा करण्यासाठी आणि डॉक्टरांना भेटण्यासाठी काउंटरला भेट देऊ शकतो.


या सेवेबद्दल बोलताना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. आर. एस. शर्मा यांनी सांगितले की, – “एबीडीएम अंतर्गत, आम्ही आंतर-कार्यान्वयता निर्माण करत आहोत आणि आरोग्य सेवा वितरण प्रक्रियेत सुलभतेला प्रोत्साहन देत आहोत. स्कॅन आणि शेअर कार्यान्वयता हे  असेच एक वैशिष्ट्य आहे जे भारतातील हजारो रुग्णांना दररोज मदत करत आहे. ही त्वरित नोंदणी सेवा कार्यान्वित करण्यासाठी आमचा चमू देशभरातील विविध रुग्णालयांसोबत कार्यरत आहे, सहभागी आरोग्य सुविधांमध्ये वापरकर्त्याने  निवडलेला अनुप्रयोग आणि एचएमआयएस  यांच्यात साध्या आंतर-कार्यान्वयतेद्वारे, रुग्णालये आणि रुग्ण दोघांनाही फायदा होऊ शकतो.''

 
या स्कॅन आणि शेअर कार्यक्षमतेने ओपीडी नोंदणी सहज, विनाअडथळा आणि अचूक केली आहे. विशेषतः लांब रांगेत उभे न राहता डॉक्टरांना पुन्हा भेटण्याच्या बाबतीत, या प्रक्रियेमुळे रुग्णाला स्वतःची नोंदणी करण्याचा अधिकारही मिळाला आहे,यामुळे रूग्णांना तात्काळ आणि प्रत्यक्ष फायदा तर मिळतोच शिवाय त्यांना त्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिजिटल उपायांचा अवलंब करण्यासही प्रोत्साहन मिळते.


स्कॅन आणि शेअर सेवेद्वारे ओपीडी टोकन उपलब्धतेसंदर्भातील अद्यतने एबीडीएम सार्वजनिक डॅशबोर्डमधील ‘हेल्थ फॅसिलिटी टोकन जनरेटेड’ टॅब अंतर्गत उपलब्ध आहेत. - https://dashboard.abdm.gov.in/abdm/

 

***

S.Thakur/S.Chavan/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1885338) Visitor Counter : 176