पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

त्रिपुराची राजधानी आगरतला इथं, 4350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण


पीएमएवाय- शहरी आणि ग्रामीण योजनांअंतर्गत, दोन लाखांपेक्षा  अधिक लाभार्थ्यासाठी गृहप्रवेश कार्यक्रमाची घोषणा

“त्रिपुरा  सुंदरी मातेच्या आशीर्वादामुळे, त्रिपुरा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे.”

“गरीबांसाठी घरे बांधण्याच्या बाबतीत भारतात आघाडीवर असलेल्या राज्यांपैकी त्रिपुरा एक राज्य आहे.”

“आज त्रिपुराची चर्चा स्वच्छतेसाठी, पायाभूत सुविधांसाठी आणि गरीबांना घरे देण्यासाठी होत आहे.”

“त्रिपुराच्या माध्यमातून संपूर्ण ईशान्य भारत आंतरराष्ट्रीय व्यापारासाठीचा महामार्ग ठरत आहे.”

“आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, ईशान्य भारतातील गावांसाठी, सात हजारपेक्षा अधिक घरे मंजूर करण्यात आली आहेत”

“इथल्या स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारात स्थान मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत”

Posted On: 18 DEC 2022 9:51PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 4350 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केलीराष्ट्रार्पण आणि उद्घाटन केले. यात, प्रधानमंत्री आवास योजना-शहरी आणि ग्रामीण अंतर्गत, लाभार्थ्यांसाठी गृह प्रवेश अभियान, अगरतला बायपास (खैरपूर आमतली) NH-08 च्या रुंदीकरणासाठी कनेक्टिव्हिटी प्रकल्प, पीएम-जीएसवाय च्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 230 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या 32 रस्त्यांची पायाभरणी आणि 540 किलोमीटरहून अधिक अंतरावरील 112 रस्त्यांच्या सुधारणा प्रकल्पांची पायाभरणी अशा प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी आनंदनगर आणि आगरतला शासकीय दंत महाविद्यालय इथं हॉटेल व्यवस्थापन संस्थांचेही उद्घाटन केले.

या मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी कार्यक्रमाच्या प्रारंभाची आतुरतेने वाट पाहिल्याबद्दल उपस्थित सर्वांचे आभार मानले. मेघालयमध्ये  केलेली पायाभरणी आणि यापूर्वी अनेक प्रकल्पांचे लोकार्पण केले त्या व्यस्ततेमुळे थोडासा विलंब झाला असं सांगत त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

गेल्या पाच वर्षांपासून राज्यात स्वच्छता मोहिमेबाबत केलेल्या प्रशंसनीय कार्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. आणि त्रिपुराच्या जनतेनेच या अभियानाला जनचळवळीत रूपांतरित केले आहे, असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. त्यामुळे, छोट्या राज्यांच्या क्षेत्रानुसार त्रिपुरा भारतातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून पुढे आले आहे. " त्रिपुरा सुंदरी मातेच्या आशीर्वादाने, त्रिपुराचा विकास आज नव्या उंचीवर पोहोचला आहे", असं पंतप्रधान म्हणाले.

दळणवळण, कौशल्य विकास आणि गरीबांच्या घराशी संबंधित योजनांशी संबंधित असलेल्या आजच्या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी त्रिपुरातील लोकांचे अभिनंदन केले.

त्रिपुराला आज पहिले दंत महाविद्यालय मिळत आहे, असं सांगत पंतप्रधान म्हणाले की त्रिपुरातील तरुणांना आपल्याच  राज्यात डॉक्टर होण्याची संधी मिळेल. आज राज्यातील दोन लाखांहून अधिक गरीब लोक त्यांच्या नवीन पक्क्या घरांमध्ये गृहप्रवेश करत आहेत जिथे घरांच्या मालक आपल्या माता-भगिनी आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

या योजनेमुळे ज्या पहिल्यांदाच घराच्या मालकीण होणार आहेत अशा सर्व महिलांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. गरिबांसाठी घरे बांधण्याच्या बाबतीत त्रिपुरा हे अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे,असे सांगतया कामासाठी माणिक साहाजी आणि त्यांच्या चमूने केलेल्या मेहनतीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. या कार्यक्रमासाठी इथे येतांना, हजारो समर्थकांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 

या आधी सकाळी झालेल्या ईशान्य भारत परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी बैठकीबद्दल बोलतांना त्यांनी, त्रिपुरासह सर्व ईशान्य देशांच्या विकासासाठीचा आराखडा तयार करण्यासाठी या बैठकीत झालेल्या चर्चेची माहीती दिली. ईशान्य भारतातील आठ राज्ये, म्हणजे अष्टलक्ष्मीच्या विकासासाठी, अष्ट-आधार म्हणजेच आठ महत्वाचे मुद्दे आहेत, असेही त्यांनी सांगितले. दुहेरी इंजिनच्या सरकारची ताकद अधोरेखित करतांना, पंतप्रधान म्हणाले की, विकासाच्या कामांना गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

या दुहेरी इंजिनाच्या सरकारपूर्वीच्या काळात, ईशान्य भारतातील राज्यांची चर्चा  केवळ निवडणुका आणि हिंसाचारच्या घटना अशा दोन प्रसंगीच होत असे. आज मात्र, त्रिपुराची चर्चा, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि गरिबांना घरे देणारे राज्य अशा सकारात्मक गोष्टींसाठी होत आहे.असे ते पुढे म्हणाले. केंद्र सरकार इथल्या पायाभूत सुविधांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी देत आहे, आणि राज्य सरकार या पायाभूत सुविधा प्रकल्पांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत आहे. गेल्या पांच वर्षांत, त्रिपुरामधील अनेक गावांना, रस्ते दळणवळणाच्या सुविधा मिळाल्या असून, त्रिपुरातील सर्व गावांना एकमेकांशी रस्त्याने जोडण्यासाठीचे काम सुरु झाले आहे. असे त्यांनी सांगितले. आज ज्यांची पायाभरणी केली गेली, ते प्रकल्प राज्यातील दळणवळण आणि संपर्क व्यवस्था अधिक मजबूत आणि वेगवान करतील, त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल आणि लोकांचे जीवनमान अधिक सुखकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्रिपुरा मार्गे ईशान्येकडील प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रवेशद्वार बनत आहेत, पंतप्रधानांनी आगरतळा-अखौरा रेल्वे मार्ग आणि भारत-थायलंड-म्यानमार महामार्ग पायाभूत सुविधा यांसारख्या प्रकल्पांमुळे खुल्या होणाऱ्या नव्या दालनाची माहिती देताना सांगितले. आगरतळा येथे  महाराजा बीर बिक्रम विमानतळावर आंतरराष्ट्रीय टर्मिनल उभारण्यामुळे कनेक्टिविटीला चालना मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. परिणामी त्रिपुरा ईशान्य प्रदेशाचे एक महत्त्वाचे लॉजिस्टिक केंद्र म्हणून विकसित होऊ लागले आहे. सध्याच्या काळात युवा वर्गासाठी अतिशय उपयुक्त असलेली इंटरनेट कनेक्टिविटी त्रिपुरामध्ये उपलब्ध करून देण्याचे श्रेय त्यांनी सरकारच्या प्रयत्नांना दिले.

त्रिपुरामधील डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळेच आता त्रिपुरामधील अनेक पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या आहेत, पंतप्रधानांनी नमूद केले.

सामाजिक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी डबल इंजिन सरकारने केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी आयुष्मान भारत योजनेचे उदाहरण दिले ज्या अंतर्गत ईशान्येकडील गावांमध्ये सात हजार पेक्षा जास्त आरोग्य आणि निरामयता केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.  अशा प्रकारची सुमारे एक हजार केंद्रे त्रिपुरामध्ये उभारली जाणार आहेत. त्याच प्रकारे आयुष्मान भारत पीएम जेएवाय योजनेंतर्गत त्रिपुरामधील हजारो गरिबांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची सुविधा मिळाली आहेते पुढे म्हणाले.    शौचालये असोत वीज किंवा गॅस कनेक्शन असो, अशा प्रकारचे विस्तृत काम पहिल्यांदाच झाले आहे., मोदी यांनी सांगितले. डबल इंजिन सरकार स्वस्त दरात पाईपद्वारे गॅस आणण्यासाठी आणि प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी काम करत आहे, असे ते म्हणाले. केवळ तीन वर्षांच्या काळात त्रिपुरामधील 4 लाख नवीन कुटुंबांना नळावाटे पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्रिपुरामधील एक लाखांपेक्षा जास्त गर्भवती मातांना लाभ देणाऱ्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेवर देखील पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. या योजने अंतर्गत  प्रत्येक मातेला पोषक आहार मिळावा यासाठी हजारो रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत. याचा परिणाम म्हणून आज जास्तीत जास्त प्रसूती रुग्णालयांमध्ये होत आहेत आणि हजारो माता आणि बालकांचे जीव वाचत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या माता आणि भगिनींसाठी आत्मनिर्भरतेवर (स्वावलंबनावर) बोलताना त्यांनी माहिती दिली की  सरकारने महिलांच्या रोजगारासाठी शेकडो कोटी रुपयांचे विशेष पॅकेज दिले आहे. त्यांनी राज्य सरकारच्या या प्रयत्नांची देखील प्रशंसा केली आणि ते म्हणाले, डबल इंजिन सरकार आल्यानंतर त्रिपुरामधील महिला बचतगटांच्या संख्येत 9 पट वाढ झाली आहे.

अनेक दशकांपासून त्रिपुरावर त्या पक्षांनी राज्य केले ज्यांच्या विचारसरणीचे महत्त्व संपले आहे आणि ज्यांनी संधीसाधूपणाचे राजकारण केले., अशी टिप्पणी करत पंतप्रधानांनी त्रिपुराला कशा प्रकारे विकासापासून वंचित ठेवण्यात आले होते त्यावर टीका केली. यामुळे गरीब, युवा वर्ग, शेतकरी आणि महिलांना सर्वात जास्त झळ पोहोचली, असे त्यांनी सांगितले.   अशा प्रकारच्या विचारसरणीचा, अशा प्रकारच्या मानसिकतेचा जनतेला फायदा होऊ शकत नाही. त्यांना केवळ नकारात्मकता कशी पसरवायची हेच माहीत आहे आणि त्यांच्याकडे कोणताही सकारात्मक जाहीरनामा नाही., असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की हे डबल इंजिन सरकार आहे ज्याने या परिस्थितीतून मार्ग काढला आणि त्याचबरोबर  आपली कामगिरी साध्य करणारा सकारात्मक मार्ग दाखवला. सत्तेच्या राजकारणामुळे आपल्या आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणावर झालेल्या विपरित परिणामांकडे लक्ष वेधत पंतप्रधानांनी आदिवासी समाज आणि आदिवासी भागांमध्ये विकासाचा अभाव असल्याबद्दल टीका केली.

भाजपाने अशा प्रकारच्या राजकारणात बदल केला आणि त्यामुळेच आज आदिवासी समाजाच्या पसंतीचा हा पहिला पर्याय बनला आहे., पंतप्रधानांनी अलीकडेच गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीचा दाखला देऊन सांगितले आणि 27 वर्षांनतरही भाजपाच्या विशाल विजयाचे श्रेय आदिवासी समाजाच्या योगदानाला दिले. भाजपाने आदिवासींसाठी राखीव असलेल्या 27 पैकी 24 जागा जिंकल्या आहेत, पंतप्रधानांनी नमूद केले.

आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी सरकारने केलेली विकासकामे पंतप्रधानांनी अधोरेखित केली आणि सर्वात पहिल्यांदाच अटलजींच्या सरकारने आदिवासी समुदायासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली होती आणि आदिवासींसाठी वेगळी अर्थसंकल्पीय तरतूद केली होती याची आठवण करून दिली. आदिवासी समाजासाठी 21 हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद होती, जी आता 88 हजार कोटी रुपये आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आदिवासी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 2014पूर्वी आदिवासी भागांमध्ये 100 पेक्षा कमी एकलव्य शाळा होत्या.  तर आता या शाळांची संख्या 500 पेक्षा जास्त झाली आहे. अशा प्रकारच्या 20 पेक्षा जास्त शाळा त्रिपुरासाठी देखील मंजूर झाल्या आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आधीची सरकारे केवळ 8 ते 10 वन उत्पादनांना हमी भाव देत होती तर भाजपा सरकार 90 पेक्षा जास्त वन उत्पादनांना किमान हमी भाव देत आहे, याकडेही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. आज आदिवासी भागांमध्ये 50,000 पेक्षा जास्त वन धन केंद्रे आहेत जी बहुसंख्य महिलांचा समावेश असलेल्या 9 लाख आदिवासींना रोजगार देत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

आदिवासींसाठी अभिमान म्हणजे काय हे भाजप सरकारलाच समजले आणि म्हणूनच 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती देशभरात जनजाती गौरव दिवस म्हणून साजरी करण्यास सुरुवात केली, असेही पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. पंतप्रधानांनी सांगितले की, देशभरात 10 आदिवासी स्वातंत्र्य सेनानी संग्रहालये उभारली जात आहेत आणि त्रिपुरामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांनी अलीकडेच महाराजा बिरेंद्र किशोर माणिक्य संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्राची पायाभरणी केली. ते पुढे म्हणाले की, त्रिपुरा सरकार आदिवासींचे योगदान आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे आणि त्रिपुराच्या आदिवासी कला आणि संस्कृतीला पुढे नेणाऱ्या व्यक्तींना पद्म सन्मान प्रदान करताना अभिमान वाटतो, असे त्यांनी  अधोरेखित केले.

त्रिपुरातील लहान शेतकरी आणि उद्योजकांसाठी चांगल्या संधी निर्माण करण्याच्या दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. येथील स्थानिक उत्पादकांना  जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे नमूद करून

मोदींनी त्रिपुरातील अननस परदेशात पोहोचल्याचा दाखला दिला. इतकेच नाही तर शेकडो मेट्रिक टन अननस व्यतिरिक्त इतर फळे आणि भाजीपाला देखील येथून बांगलादेश, जर्मनी आणि दुबईला निर्यात केला गेला आहे आणि परिणामी, शेतकर्‍यांना त्यांच्या मालाला जास्त भाव मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, त्रिपुरातील लाखो शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीकडून आतापर्यंत 500 कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे. त्यांनी त्रिपुरातील आगर-लाकूड उद्योगावरही प्रकाश टाकला आणि सांगितले की हे उद्योग त्रिपुरातील तरुणांसाठी नवीन संधी आणि उत्पन्नाचे स्रोत बनतील. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, राज्यातल्या विकासाच्या दुहेरी इंजिनाच्या आगमनाने त्रिपुरा आता शांतता आणि विकासाच्या मार्गावर आहे. मला त्रिपुरातील लोकांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. आपण सर्वजण मिळून विकासाचा वेग वाढवू, या अपेक्षेेसह तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदनअसे म्हणत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यावेळी त्रिपुराचे मुख्यमंत्री प्रा.(डॉ.) माणिक साहा, त्रिपुराचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य, त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिष्णु देव वर्मा आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे हे सुनिश्चित  करण्यावर पंतप्रधानांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रदेशात हे सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांसाठी गृह प्रवेश कार्यक्रम सुरू केला. 3400 कोटींहून अधिक रुपये खर्च करून विकसित केलेल्या या घरांमध्ये 2 लाखांहून अधिक लाभार्थी समाविष्ट असतील.

रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून, पंतप्रधानांनी आगरतळा बायपास (खैरपूर अमतली) NH-08 रुंदीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले, ज्यामुळे आगरतळा शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. त्यांनी PMGSY III (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना) अंतर्गत 230 किमी पेक्षा जास्त लांबीच्या 32 रस्त्यांची पायाभरणी केली आणि 540 किमी पेक्षा जास्त अंतराच्या 112 रस्त्यांच्या सुधारणा कामांची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी आनंदनगर येथील राज्य हॉटेल व्यवस्थापन संस्थेचे आणि आगरतळा येथील शासकीय दंत महाविद्यालयाचे देखील उद्घाटन केले.

***

S.Kane/R.Aghor/S.Patil/S.Patgaonkar/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1884653) Visitor Counter : 247