कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
19-25 डिसेंबर 2022 दरम्यान साजऱ्या होणार्या दुसऱ्या "सुशासन सप्ताह" कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
येत्या 25 वर्षांच्या अमृत काळात गौरवशाली आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्याचा जनतेचा संकल्प, जनतेच्या प्रयत्नांना पाठबळ देऊन या संकल्पाला पूरक ठरण्याची सरकारची भूमिका असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह 19 डिसेंबर 2022 रोजी सुशासन सप्ताह- "सुशासन सप्ताह 'प्रशासन गाव की और' 2022" मोहिमेचा शुभारंभ करणार
Posted On:
17 DEC 2022 4:44PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या 25 वर्षांच्या अमृतकाळात गौरवशाली आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्याचा संकल्प जनतेने केला आहे. लोकांच्या प्रयत्नांना पाठबळ देऊन त्यांच्या संकल्पाला पूरक बनण्याची सरकारची भूमिका आहे. संधी वाढवणे आणि त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करणे ही आमची भूमिका आहे.
19-25 डिसेंबर 2022 या कालावधीत साजऱ्या होत असलेल्या दुसऱ्या “सुशासन सप्ताह” (गुड गव्हर्नन्स वीक) च्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा देताना, पंतप्रधानांनी एका संदेशात म्हटले आहे, 'सिटिझन-फर्स्ट' हे तत्त्व अंगीकारून, प्रत्येक स्तरावर कार्यान्वयन आणि प्रक्रिया सुलभ करून पारदर्शक आणि जलद परिसंस्था निर्माण करण्यासाठी आमचे सरकार अथक प्रयत्न करत आहे.
पंतप्रधान म्हणाले, आम्ही सार्वजनिक तक्रारींचे निवारण, ऑनलाइन सेवा, सेवा वितरण अर्जांचा निपटारा आणि सुशासन पद्धती यासह विविध नागरिक-केंद्रित उपक्रम हाती घेतले आहेत. सेवा वितरण यंत्रणेचा विस्तार वाढवणे आणि त्याला अधिक प्रभावी बनवणे, हा आमचा दृष्टीकोन आहे.
पंतप्रधान म्हणाले, प्रशासनाचा प्रभाव वाढवून प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप कमी करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. हजारो अनावश्यक अनुपालन रद्द करणे, हजारो कालबाह्य कायदे रद्द करणे आणि अनेक किरकोळ गुन्ह्यांना गुन्हेगारीच्या व्याख्येतून सूट देणे, ही या दिशेने टाकलेली मोठी पावले आहेत.
पंतप्रधान म्हणाले, तंत्रज्ञानामध्ये सरकार आणि नागरिकांना जवळ आणण्याची प्रचंड क्षमता आहे. आज तंत्रज्ञान हे नागरिकांना सक्षम बनवण्याचे एक शक्तिशाली साधन बनले आहे, तसेच दैनंदिन कामकाजामधील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुधारण्याचे एक माध्यम बनले आहे. विविध धोरणात्मक हस्तक्षेपांद्वारे, आम्ही नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण आणि संस्थांच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. यंदाच्या वर्षीही 'प्रशासन गाव की ओर' मोहीम सुशासन सप्ताहाचा एक भाग आहे, याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि पक्रमाशी निगडित असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (स्वतंत्र प्रभार), भू विज्ञान मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन, अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, 19 डिसेंबर 2022 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आणि सुशासन सप्ताह कार्यक्रमाचा भाग असलेल्या ‘प्रशासन गाव की ओर’ 2022 या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ करतील.
***
S.Pophale/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884414)
Visitor Counter : 235