राष्ट्रपती कार्यालय

भारतीय रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट


समाजातील विविध घटकांमधली दरी दूर करण्यासाठी तसेच सर्वसमावेशक आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

Posted On: 16 DEC 2022 3:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2022

भारतीय रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी (प्रोबेशनर्सनी) आज (16 डिसेंबर 2022) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची, नवी दिल्ली येथे  राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

या अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींनी संबोधित केले. अनेक लोक आपला उद्योग व्यवसाय आणि नोकरीनिमीत्त कामाच्या ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी दररोज रेल्वेने  प्रवास करतात, अशांकरता रेल्वे ही जीवनवाहिनी आहे, असे  त्या म्हणाल्या.  भारतीय रेल्वेचे अधिकारी हे एका अर्थाने  लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मदत करत असतात, त्यामुळेच ते एकप्रकारे मोठी जबाबदारीच पार पाडत आहेत असे  त्यांनी सांगितले. अनेक लोक उपचारांसाठी रेल्वेने  प्रवास करतात असे  त्यांनी नमूद केले. सर्वसामान्यांच्या जीवनात रेल्वेची भूमिका ही कायमच महत्वाची राहणार आहे असे  त्या म्हणाल्या. रेल्वेने  देशभरातल्या प्रवासासोबतच, कल्पना, विचार आणि माहितीच्या आदानप्रदानाला चालना दिली असल्याचे  राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.

आज भारत राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर वेगाने पुढे जात आहे, अशावेळी लोकांसह वस्तूंची वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे  आपण पाहत आहोत. भविष्यात यात आणखी वाढ होईल, ही बाब लक्षात घेऊन भारतीय रेल्वेनेही अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे आणि त्यासोबतच इतरही नवे पर्याय चाचपडून पाहायला हवेत असे  त्या म्हणाल्या. अधिक सोयीस्कर आणि उच्च गुणवत्तेची वाहतूक सेवा देण्याकरता उपयोगी ठरतील अशा सुरक्षित आणि वेळेची बचत करू शकणाऱ्या अत्याधुनिक वैशिष्ठयांचा  रेल्वेने आपल्या सेवेत अंतर्भाव केला पाहीजे असे  त्यांनी  यावेळी सूचवले .

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात रेल्वे प्रवासाशी निगडीत आठवणी असतात याचा उल्लेख करून राष्ट्रपती म्हणाल्या की, लोकांचा प्रवास आरामदायी असेल याची सुनिश्चिती करणे  हे भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे, हे पार पाडता आले  तर लोकांच्या मनात आपल्या रेल्वे प्रवासाबद्दलच्या मधूर आठवणी राहतील. अधिकाऱ्यांनी दिव्यांग व्यक्ती, महिला आणि वृद्धांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तत्पर राहायला हवे  आणि त्यांचा सुरक्षित आणि सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे  असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. सर्वसमावेशक आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय रेल्वेने समाजातील विविध घटकांमधली दरी दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आपला देश नवभारत आणि पुनर्निमीतीच्या प्रक्रियेतून वाटचाल करत आहे, हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने मोठे विकास प्रकल्प हाती घेतले असल्याची त्यांनी प्रशंसा केली. भारतीय रेल्वेने समर्पित भाडेतत्वावरच्या मालवाहतूकीसाठी समर्पित   मार्गिकांच्या  प्रकल्पाअंतर्गतचे 56 टक्क्यांहून अधिक लांबीचे काम पूर्ण केले असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे देशांतर्गत उत्पादन आणि माल वाहून नेण्याची क्षमता वाढेल, आणि त्यातूनच मालवाहतुकीतली क्रांती घडून येईल, आणि रेल्वेच्या जाळ्यात आमूलाग्र बदल घडून येतील असे  राष्ट्रपती म्हणाल्या. भाडेतत्वावरच्या मालवाहतूक कॉरिडॉरच्या माध्यमातून मालवाहतूकीवरचा तसेच  दळणवळणावरच्या इतर खर्चात लक्षणीय घट होईल असे  त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री गतिशक्ती, मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी, हायस्पीड रेल्वे प्रकल्प, हायपरलूप आधारित वाहतूक, चारधाम रेल्वे प्रकल्प, सेतू भारतम यांसारखे उपक्रम यामुळे देशातील औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन क्रिया प्रक्रियांना मोठी चालना मिळेल, आणि यातून संसाधनांच्या न्याय्य वितरणाचा मार्गही प्रशस्त होईल असे  राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

S.Kakade/T.Pawar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1884113) Visitor Counter : 163