राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार प्रदान केले


पर्यावरणाचे रक्षण करून आपण अनेक मानवी हक्कांचे रक्षण करू शकतो : राष्ट्रपती मुर्मु

Posted On: 14 DEC 2022 3:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2022

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज (14 डिसेंबर, 2022) राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण केले. यावेळी त्यांनी ‘ईव्ही-यात्रा पोर्टल’ लाँच केले. जवळच्या सार्वजनिक ईव्ही चार्जरपर्यंत पोहचण्यासाठी वाहनातील नेव्हिगेशन सुलभ व्हावे या उद्देशाने ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीद्वारे ‘ईव्ही-यात्रा पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे.

भावी पिढ्यांना प्रदूषणमुक्त वातावरणात श्वास घेता यावा, चांगली प्रगती करता यावी आणि निरोगी जीवन जगता यावे, याला आपल्या सर्वांचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे राष्ट्रपती याप्रसंगी बोलताना म्हणाल्या. स्वच्छ हवेत श्वास घेणे हा मानवी हक्क आहे. पर्यावरणाचे रक्षण करून आपण अनेक मानवी हक्कांचे रक्षण करू शकतो, असेही त्या म्हणाल्या.

हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगसारख्या आव्हानांना तोंड देताना ऊर्जा संरक्षणाला जागतिक आणि राष्ट्रीय प्राधान्य आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. भारताचे दरडोई कार्बन उत्सर्जन आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे जागतिक सरासरीच्या एक तृतीयांश पेक्षा कमी असले तरी, भारत एक जबाबदार देश म्हणून पर्यावरण संरक्षणात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे विशेष करून लहान मुलांचे कौतुक केले. राष्ट्रपतींनी राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार विजेत्यांची त्यांची नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि कार्यपद्धतीबद्दल प्रशंसा केली. विजेत्यांच्या नवकल्पनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला पाहिजे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना प्रेरणा मिळू शकेल आणि पर्यावरण रक्षणासाठी नवीन पद्धती विकसित करता येतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण जे काही करू ते सदैव निसर्गाच्या बाजूनेच राहील, कधीही निसर्गाच्या विरोधात नाही, असा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. निसर्ग आणि विकास यांचा समतोल राखण्यातच मानवाचे कल्याण आहे, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

 

 

 

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1883433) Visitor Counter : 204