वस्त्रोद्योग मंत्रालय

आपले कारागीर भारताच्या वारशाचे जागतिक राजदूत आहेत, आपल्या संस्कृतीचे दीपस्तंभ आहेत- उपराष्ट्रपती


आपला देश जागतिक पातळीवर गुंतवणूक आणि संधींचे सर्वात पसंतीचे स्थान आहे- उपराष्ट्रपती

हस्तकला, हातमाग म्हणजे उर्वरित जगाशी आत्मनिर्भर, आत्मविश्वासयुक्त व्यवहार करणाऱ्या भारताचा पाया आहे- पीयूष गोयल

Posted On: 28 NOV 2022 5:34PM by PIB Mumbai

 

आपले कारागीर जागतिक वारशाचे भारतीय राजदूत आहेत, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितले आहे. ते आज वस्त्रोद्योग मंत्रालयाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या शिल्प गुरु आणि राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलत होते.

भारताचा अभूतपूर्व झपाट्याने उत्कर्ष होत आहे. आपण संपूर्ण जगाचे गुंतवणूक आणि संधींचे सर्वाधिक पसंतीचे स्थान बनलो आहोत आणि हस्तकला आणि हातमाग क्षेत्राशी संबंधित कारागीरांनी या वृद्धीमध्ये आपली भूमिका बजावली आहे, असे ते म्हणाले. कारागीरांची कारागिरी आणि कौशल्य याविषयी बोलताना ते म्हणाले की अशी कुशलता भारताचा अभिमान वाढवते. हे कारागीर आपल्या संस्कृतीचे दीपस्तंभ आहेत.

2017,2018 आणि 2019 या वर्षांसाठी शिल्पगुरु आणि गुणवान कारागीर राष्ट्रीय पुरस्कारांचे आज वितरण करण्यात आले. कोरोना महामारीमुळे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रत्यक्ष उपस्थितीद्वारे आयोजन करता आले नव्हते. संपूर्ण जग माननीय पंतप्रधानांचे विचार आणि त्यांच्या दृष्टीकोनाचे अनुसरण करत असल्याचे जी-20च्या अध्यक्षपदामधून सूचित होत आहे, असे धनखड यांनी नमूद केले. या दशकाच्या अखेरपर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करताना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की हस्तकला आणि हातमाग म्हणजे उर्वरित जगाशी आत्मविश्वासाने आणि स्वयंपूर्ण होऊन व्यवहार करणाऱ्या भारताचा पाया आहे. आपल्या शिल्पकारांनी अनेक शतकांपासून दगड, धातू, चंदन आणि माती यांमध्ये जिवंतपणा आणणारी आपली स्वतःची आगळी शैली, वेगळ्या पद्धती आणि तंत्र विकसित केले आहे, असे ते म्हणाले. अगदी जुन्या काळापासून त्यांनी काळाच्या कितीतरी पुढे जात विज्ञान आणि अभियांत्रिकी प्रक्रियांमध्ये प्रावीण्य आत्मसात केले होते. त्यांच्याकडे असलेले आधुनिक ज्ञान आणि अतिशय उच्च सौंदर्यदृष्टी यांची प्रचिती त्यांच्या निर्मितीमधून आली. हस्तकला उत्पादनांमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या लाखो लोकांना अतिशय अल्प भांडवली गुंतवणुकीमध्ये चरितार्थाच्या संधी मिळाल्या आणि या उत्पादनांना स्थानिक आणि परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. या हस्तकला भारताचा वारसा,संस्कृती आणि परंपरेचा एक भाग आहेत.

हस्तकला उत्पादने, घरातली इतर कामे करत असताना, घरीच तयार करता येणे शक्य असल्याने, ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणामध्ये हस्तकला उत्पादनांचे विशेष महत्त्व आहे, असे ते म्हणाले. या व्यवसायातील मनुष्यबळामध्ये महिलांचा वाटा मोठ्या प्रमाणावर आहे आणि कारागीर क्षेत्रात हे प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे, अशी माहिती गोयल यांनी दिली.

अतिशय उच्च दर्जाच्या कारागिरीसाठी आणि पारंपरिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून कलेची जोपासना करण्यामध्ये बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी हे पुरस्कार दिले जात असले तरीही जागतिक बाजारातले कल लक्षात घेऊन उत्पादनांचा दर्जा उंचावणे देखील महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली देशाने निर्धार केला आहे की 2047 साली भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होत असताना हा देश विकसित आणि समृद्ध देश असेल.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पीयूष गोयल यांच्यासोबत यावेळी पुरस्कार विजेत्यांच्या नावांची यादी प्रकाशित केली. 2017,2018 आणि 2019 साठी प्रावीण्यप्राप्त कारागिरांना 30 शिल्प गुरु आणि 78 राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कार विजेत्यांमध्ये 36 महिलांचा समावेश होता. कारागीरांचे कौशल्य आणि भारतीय हस्तकला आणि वस्रोद्योग क्षेत्रातील त्यांचे बुहमूल्य योगदान यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879570) Visitor Counter : 200