पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
कॉप 27 मध्ये भारताकडून राष्ट्रीय निवेदन सादर
Posted On:
15 NOV 2022 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2022
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज कॉप 27 मध्ये भारताचे राष्ट्रीय निवेदन सादर केले.
"महामहीम,
मी सर्वप्रथम आपल्या यजमानांचे आणि कॉप 27 चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या इजिप्तचे या आयोजनाबद्दल आणि आनंददायी आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
वर्षभरापूर्वी, ग्लासगो येथे, आपण विज्ञानाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि महत्त्वपूर्ण संकल्प आणि वचनबद्धतेने पुढे आलो.
या वर्षी शर्म-अल-शेख येथे हा आपल्या कृतीचा क्षण आहे आणि अध्यक्षपद भूषवणाऱ्या इजिप्तने याला कार्यान्वयनाचा कॉप म्हणून नामित केलं आहे.
महामहीम,
आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे झालेल्या परिषदेत 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट जाहीर केले होते. एका वर्षाच्या आत, भारताने दीर्घकालीन कमी उत्सर्जन वाढीची रणनीती सादर केली आहे, यात प्रमुख आर्थिक क्षेत्रांमध्ये कमी कार्बन संक्रमणाचे मार्ग दाखवले आहेत.
आमच्या हवामान उद्दिष्ट 2030 मध्ये महत्त्वाकांक्षा वाढीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भारताने ऑगस्ट 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदान अद्यतनित केले. आम्ही पर्यायी इंधन स्रोत म्हणून नवीकरणीय ऊर्जा, ई-गतिशीलता, इथेनॉल मिश्रित इंधन आणि ग्रीन हायड्रोजनमध्ये दूरगामी नवीन उपक्रम सुरू केले आहेत.
भारताने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडी सारख्या कृती आणि उपाय-आधारित आघाडीच्या माध्यमातून मजबूत आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत आहोत.
जागतिक हितासाठी सामूहिक कृतीच्या आमच्या नीतिमूल्यांचा हा पुरावा आहे.
1.3 अब्ज लोकसंख्या असलेल्या भारताचे जगाच्या एकत्रित उत्सर्जनातले योगदान 4 टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि आमचे वार्षिक दरडोई उत्सर्जन हे जागतिक सरासरीच्या सुमारे एक तृतीयांश आहे, हे वास्तव असूनही, भारताकडून जिकिरीचे प्रयत्न सुरू आहेत.
सुरक्षित ग्रहाच्या भारताच्या कल्पनेच्या केंद्रस्थानी पर्यावरणासाठी जीवनशैली हा मंत्र आहे - जो पंतप्रधान मोदी यांनी कॉप 26 मधील आमच्या राष्ट्रीय निवेदनात मांडला होता. 20 ऑक्टोबर 2022 रोजी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस महामहीम अँटोनियो गुटेरस यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींनी मिशन लाईफचा प्रारंभ केला होता.
जगाला अविवेकी आणि विध्वंसक उपभोगापासून सजग आणि जाणीवपूर्वक वापराकडे वळवण्याची तातडीची गरज आहे. आपण या पृथ्वी ग्रहाचे विश्वस्त आहोत. आपण संसाधनांचा योग्य वापर आणि कचरा कमी करून शाश्वत जीवनशैलीद्वारे त्याचे पालनपोषण केले पाहिजे.
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली लोकशाही आणि एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून, भारत उदाहरणाद्वारे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत आहे आणि वैयक्तिक, कौटुंबिक आणि समुदाय-आधारित कृतीसाठी मिशन लाईफचा भाग बनण्यासाठी जागतिक समुदायाला आमंत्रित करत आहे.
महामहीम,
'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या ब्रीदवाक्यासह भारत 2023 मध्ये जी 20 चे अध्यक्षपद स्वीकारत आहे. मानवतेसाठी सुरक्षित ग्रहाकडे जाणारा आपला प्रवास असा आहे की कोणताही राष्ट्र एकट्याने करू शकत नाही. समानता आणि हवामान न्याय ही आमची मार्गदर्शक तत्त्वे मानून हा सामूहिक प्रवास करायचा आहे.
आम्हाला आशा आहे की हवामान बदलाविरुद्धचा हा लढा जगाला एक कुटुंब म्हणून एकत्र आणेल.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1876243)
Visitor Counter : 351