गृह मंत्रालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आज नवी दिल्लीत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली


गृहमंत्री अमित शाह यांनी एकता दिनानिमित्त मेजर ध्यानचंद मैदानावरुन रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवला आणि उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली

Posted On: 31 OCT 2022 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2022

 

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी नवी दिल्लीत त्यांना पुष्पांजली वाहिली.

त्यानंतर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मेजर ध्यानचंद स्टेडियम इथून ‘रन फॉर युनिटी’ म्हणजेच एकता दौड ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री निशीथ प्रामाणिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांना गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.

गुजरातच्या मोरबी इथं झालेल्या पूल अपघातात जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती अमित शाह यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.

यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत हा होणारा हा कार्यक्रम विशेष असल्याचं अमित शाह म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला आणि आपल्या कल्पनेतला भारत घडवण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले अशा थोर व्यक्तीचा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आपण पुढे घेऊन जात आहोत,  असे अमित शाह म्हणाले. जेव्हा जेव्हा आपण सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मरण करतो, तेव्हा तेव्हा, आजच्या एकत्रित/अखंड भारताचा नकाशा आपल्या डोळ्यांसमोर येतो. जर सरदार साहेब नसते, तर आज आपल्याला दिसणारा हा विशाल, दृढ, शक्तिशाली भारत आपल्याला दिसला नसता, असेही ते पुढे म्हणाले. 

   

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, स्‍वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासमोर सर्वात मोठा प्रश्‍न होता, तो म्हणजे 500 पेक्षा जास्त संस्थाने  एकत्रित करून भारतीय संघराज्याची निर्मिती करणे. आणि या कार्यामध्‍ये देशाचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून सरदार साहेबांचा खूप मोठा- महत्‍वाचा वाटा होता. अमित शाह म्हणाले की, सरदार साहेबांनी आपल्‍या कुशल आणि अव्दितीय राजकीय कुशाग्र बुद्धीने संपूर्ण देशाला एकत्र केले. यावेळी अमित शाह म्हणाले की, त्यावेळीही देशविघातक शक्तींनी देशाचे विभाजन करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती, परंतु सरदार साहेबांच्या प्रयत्नांमुळेच आज भारताचा अखंड  नकाशा आपल्याला दिसत आहे.

ते म्हणाले, 2047 मध्ये सरदार साहेबांच्या कल्पनेमधील  भारत निर्माण करण्याचा   130 कोटी लोकांचा आणि देशातील राज्यांचा सामूहिक संकल्प नक्कीच यशस्वी होईल.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाला एकसंध करण्याचे स्वप्न साकार करून आज भारत राष्ट्रांच्या समुदायात अभिमानाने उभा आहे.  सरदार पटेल यांचा वारसा अनेक वर्षांपासून दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करूनही ते त्यांच्या गुणांमुळे अमर राहिले आणि आज सरदार पटेल हे राष्ट्रातील तरुणांसाठी प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गाचे अनुसरण करण्‍यासाठी आज प्रतिज्ञा घेतली जात आहे तसेच  आज देशभरात ‘एकात्मता दौड’ चे आयोजन केले जात आहे.

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या महान कार्याचे स्मरण करून, त्यांनी  दाखविलेल्या मार्गावर चालावे आणि 2047 पर्यंत त्यांचा संकल्प पूर्ण करावा, असे आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी देशवासियांना केले.


* * *

S.Kane/Radhika/Suvarna/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1872264) Visitor Counter : 208