पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधील अहमदाबाद येथे विविध विकास उपक्रमांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
11 OCT 2022 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2022
नमस्कार बंधूंनो,
गुजरातमधल्या आरोग्य सुविधांच्या दृष्टीने आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. भूपेंद्रभाई, मंत्रिमंडळातले सर्व सहकारी, व्यासपीठावर बसलेले सर्व खासदार, आमदार, महानगरपालिकेतले मान्यवर, या सर्वांचे हे महत्त्वाचे काम पुढे नेल्याबद्दल आणि वेगाने पुढे नेल्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि आभार मानू इच्छितो. जगातील सर्वात प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, उत्तमोत्तम सुविधा आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा आता आपल्या अहमदाबाद आणि गुजरातमध्ये अधिक चांगल्या तऱ्हेने उपलब्ध होतील आणि या समाजातील सामान्य माणसाला त्याचा उपयोग होईल. बंधू भगिनींनो, ज्यांना खाजगी रुग्णालयात जाता येत नाही अशा सर्वांसाठी हे सरकारी रुग्णालय, शासकीय पथक 24 तास सेवेसाठी सज्ज असेल. तीन -साडेतीन वर्षांपूर्वी इथे या परिसरामध्ये 1200 खाटांच्या सुविधेसह माता व बाल आरोग्य आणि सुपर स्पेशालिटी सेवा सुरू करण्याचे सौभाग्य मला मिळाले. आज इतक्या कमी कालावधीत हे मेडिसिटी कॅम्पसही इतक्या भव्य स्वरूपात आपल्यासमोर तयार झाले आहे. त्याचबरोबर, इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीजेस आणि यू एन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी आपल्या क्षमता आणि सेवाही विस्तारत आहेत. गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीसोबत बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या अद्ययावत सुविधाही सुरू होत आहेत. हे देशातील पहिले सरकारी रुग्णालय असेल, जेथे सायबर-चाकूसारखे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असेल. विकासाची गती जेव्हा गुजरातसारखी वेगवान असते तेव्हा काम आणि यश एवढे असते की त्याची गणती करणेही कठीण जाते. नेहमीप्रमाणेच असे बरेच काही आहे, जे देशात प्रथमच गुजरात करत आहे. या यशासाठी मी आपल्या सर्वांचे आणि सर्व गुजरातवासीयांचे अभिनंदन करतो. विशेषत: मी मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि त्यांच्या सरकारचे मनापासून कौतुक करतो, ज्यांनी खूप मेहनत घेऊन या योजना यशस्वी केल्या आहेत.
मित्रांनो,
आज आरोग्याशी संबंधित या कार्यक्रमात मी गुजरातच्या मोठ्या यात्रेबद्दल बोलू इच्छितो. ही यात्रा आहे विविध प्रकारच्या रोगांमधून बरे होण्याची. तुम्ही विचार कराल, रुग्णालयामध्ये कार्यक्रम आहे. मोदी विविध प्रकारच्या रोगांबाबत काय बोलत आहेत. मी सांगतो, हे विविध प्रकारचे रोग कोणते. मी डॉक्टर नाही पण मला हे रोग बरे करावे लागायचे. 20-25 वर्षांपूर्वी गुजरातची यंत्रणा अनेक रोगांनी ग्रासलेली होती. एक रोग होता - आरोग्य क्षेत्रातील मागासलेपण. दुसरा रोग होता शिक्षणातील गैरप्रकार. तिसरा रोग होता विजेचा अभाव. चौथा रोग होता पाणीटंचाई. पाचवा रोग होता सर्वत्र बोकाळलेला गैरकारभार. सहावा आजार होता ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था. आणि या सर्व रोगांच्या मुळाशी सर्वात मोठा रोग होता- मतपेटीचे राजकारण. इथे जे वडीलधारी उपस्थित आहेत, गुजरातच्या जुन्या पिढीतील जे लोक आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी चांगल्याच स्मरणात असतील. हीच परिस्थिती होती 20-25 वर्षांपूर्वीच्या गुजरातची ! तरुणांना चांगल्या शिक्षणासाठी बाहेर जावे लागले. लोकांना चांगल्या उपचारासाठी वणवण करावी लागे. लोकांना विजेची प्रतीक्षा करावी लागे. भ्रष्टाचार आणि ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेशी तर रोज लढावे लागे. पण या सर्व रोगांमधून मुक्त होऊन आज गुजरात सर्वांच्या पुढे वाटचाल करत आहे. आणि म्हणूनच नागरिकांना रोगातून मुक्त करण्यासोबतच राज्याला अनेक रोगांपासून मुक्त करण्याचा हा मुक्तयज्ञ आम्ही करत आहोत. आज उच्च तंत्रज्ञानयुक्त रुग्णालयांचा विचार केला तर गुजरातचे नाव अग्रस्थानी येते. मी जेव्हा इथला मुख्यमंत्री होतो तेव्हा अनेक वेळा सरकारी रुग्णालयाला भेट द्यायचो. तेव्हा मध्य प्रदेशातील काही भाग, राजस्थानच्या काही भागातले लोक मोठ्या संख्येने उपचारासाठी सरकारी रुग्णालयाला प्राधान्य द्यायचे.
मित्रांनो,
जर आपण शैक्षणिक संस्थांचा,एकाहून एक सरस विद्यापीठांचा विचार केला तर तर आज गुजरातची तुलना होऊ शकत नाही. गुजरातमधील पाण्याची स्थिती, वीज परिस्थिती, कायदा आणि सुव्यवस्था या सर्व गोष्टी आता सुधारल्या आहेत. आज सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या विचाराचे सरकार गुजरातच्या सेवेसाठी अविरत कार्यरत आहे.
मित्रांनो,
आज अहमदाबादमधील हायटेक मेडिसिटी आणि आरोग्याशी संबंधित इतर सेवांनी गुजरातची ओळख नव्या उंचीवर नेली आहे. ही केवळ एक सेवा पुरवणारी संस्था म्हणून मर्यादित नाही तर ती गुजरातच्या लोकांच्या क्षमतेचे प्रतीक आहे. गुजरातमधील लोकांना मेडिसिटीमध्ये चांगले आरोग्यही मिळेल आणि जगातील सर्वोच्च वैद्यकीय सुविधा आता आपल्याच राज्यात सातत्याने विस्तारत आहेत याचाही अभिमान वाटेल. गुजरातमध्ये वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात असलेली अफाट क्षमताही आणखी वाढेल.
मित्रांनो,
निरोगी शरीरासाठी निरोगी मन आवश्यक आहे हे आपण सर्वजण नेहमी ऐकतो. हे सरकारांनाही लागू होते. सरकारचे मन सुदृढ नसेल, हेतू स्पष्ट नसेल, तर लोकांप्रती त्यांच्या मनात संवेदनशीलता नसेल, तर राज्याच्या आरोग्याचा पायाही कमकुवत होतो. 20-22 वर्षांपूर्वीपर्यंत गुजरातच्या लोकांना या त्रासाला खूप सामोरे जावे लागले, आणि त्रासापासून मुक्त होण्यासाठी, सर्वसाधारणपणे तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना भेटायला जाता, तेव्हा बहुतांश डॉक्टर नक्कीच या तीन प्रकारचा सल्ला देतील. तीन वेगवेगळे पर्याय सांगतील. सुरुवातीला ते म्हणतील भाऊ औषधाने बरा होईल. औषधाने बरे होण्याची वेळ निघून गेली असेल तेव्हा त्यांना नाईलाजाने सांगावे लागते, शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही. औषध असो किंवा शस्त्रक्रिया, पण त्यासोबत तो घरातील सदस्यांना समजावतो की मी तर माझे काम करीन पण तुझी काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही रुग्णाची चांगली काळजी घ्या . त्यासाठी तो सल्लाही देतो.
मित्रांनो,
जर वेगळ्या पद्धतीने या गोष्टीचा विचार केला, तर गुजरातमधील वैद्यकीय व्यवस्था सुधारण्यासाठी आमच्या सरकारने उपचाराच्या या तीन पद्धती वापरल्या. रुग्णासाठी जो सल्ला दिला जातो, तेच मी राज्यव्यवस्थेसाठी करायचो. डॉक्टर काय शिफारस करतात. शस्त्रक्रिया - म्हणजे माझ्यासाठी जुन्या सरकारी व्यवस्थेत धैर्याने आणि पूर्ण ताकदीने बदल. निष्क्रियता, हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचारावर कात्री, ही माझी शस्त्रक्रिया. दुसरे औषध - म्हणजे, नवीन व्यवस्था उभारण्यासाठी नित्यनवे प्रयत्न, नव्या व्यवस्था विकसित करणे, मनुष्यबळ विकसित करणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे, संशोधन करणे, नवोन्मेषाला चालना, नवीन रुग्णालये बांधणे,अशी अनेक कामे. आणि तिसरे म्हणजे, देखभाल किंवा काळजी-
गुजरातचे आरोग्य क्षेत्र ठीक करण्याचा हा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे. आम्ही काळजी म्हणजे संवेदनशीलतेने काम केले. आम्ही लोकांमध्ये गेलो, त्यांचे त्रास समजून घेतले आणि एवढेच नाही तर आज मला अत्यंत नम्रतेने सांगायचे आहे, गुजरात हे देशातील पहिले राज्य होते. जे केवळ माणसांसाठीच नव्हे तर प्राण्यांसाठीही आरोग्य शिबिरे आयोजित करत असे. आणि जेव्हा मी जगाला सांगायचो की माझ्या इथे प्राण्यांच्या दातांवर उपचार केले जातात, प्राण्यांच्या डोळ्यांचे उपचार केले जातात तेव्हा बाहेरच्या लोकांना आश्चर्य वाटायचे.
बंधू आणि भगिनिंनो,
आम्ही जे प्रयत्न केले ते लोकांना एकत्र जोडून, लोकसहभागातून केले आणि कोरोनाचे संकट जेव्हा होते तेव्हा मी G-20 शिखर परिषदेत बोलत होतो. तेव्हा मी ठामपणे सांगितले होते. जगातील एवढी भीषण परिस्थिती पाहून , मी म्हणालो होतो - जोपर्यंत आपण एक पृथ्वी, एक आरोग्य या अभियानावर काम करत नाही तोवर जो गरीब आहे, पीडित आहे, त्याला कोणी मदत करणार नाही आणि आपण जगात पाहिले आहे. काही देश असे आहेत की जिथे कोरोनावर लसीचे चार-चार, पाच-पाच डोस देण्यात आले आहेत, तर दुसरीकडे असे काही देश आहेत जिथे गरिबांना एकही लस मिळालेली नाही. तेव्हा मला वेदना होत होत्या,मित्रांनो. मग आम्ही लस जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून यामुळे जगात कोणाचा मृत्यू होऊ नये. आपण सर्वांनी पाहिले आहे की जेव्हा व्यवस्था सुदृढ झाली तेव्हा गुजरातचे आरोग्य क्षेत्रही निरोगी झाले. लोक देशात गुजरातकडे आदर्श म्हणून पाहू लागले.
मित्रहो,
प्रयत्न जेव्हा पूर्ण मनापासून समग्र दृष्टीकोनातून केले जातात तेव्हा त्याचे परिणामसुद्धा तेवढेच बहुआयामी असतात. हाच गुजरातच्या यशाचा मंत्र आहे. आज गुजरातच रुग्णालय आहे ,डॉक्टर्स आहेत आणि तरुणांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या संधीही आहेत. 20-22 वर्षांपूर्वी आमच्या एवढ्या मोठ्या राज्यात केवळ 9 वैद्यकीय महाविद्यालये होती. केवळ 9 वैद्यकीय महाविद्यालये! वैद्यकीय महाविद्यालये कमी होती म्हणजे स्वस्त आणि चांगल्या इलाजाची शक्यताही कमी होती. पण आज इथे 36 वैद्यकीय महाविद्यालये आपली सेवा देत आहेत. 20 वर्षांपूर्वी गुजरातच्या सरकारी रुग्णालयात जवळपास 15 हजार बेड होते. आता येथील सरकारी रुग्णालयात बेडची संख्या 60 हजार झाली आहे. आधी गुजरात मध्ये पदवीधर आणि पदव्युत्तर मिळून मेडिकलच्या एकूण जागा 2200 होत्या. आता गुजरातमध्ये आठहजार पाचशे मेडिकलच्या सीट्स आमच्या तरुण तरुणींसाठी उपलब्ध आहेत. इकडून शिकून बाहेर पडलेले डॉक्टर्स गुजरातच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सेवा बळकट करत आहेत. आज हजारो उपकेंद्रे CHCs, PHCs आणि वेलनेस केंद्रांचा एक मोठे जाळेसुद्धा गुजरातमध्ये संपूर्णपणे तयार झाले आहे.
आणि मित्रहो
मला आपल्याला सांगायचे आहे की गुजरातने जे शिकवले ते दिल्लीला गेल्यावर माझ्या कामी आले. आरोग्याचा हा दृष्टीकोण घेऊन आम्ही केंद्रात काम करणे सुरू केले. या आठ वर्षांमध्ये आम्ही देशाच्या साधारणपणे वेगवेगळ्या भागात 22 नवीन एम्स दिले आहेत. ज्याचा गुजरातलासुद्धा फायदा झाला आहे. राजकोटमध्ये गुजराथला आपले पहिलेवहिले एम्स मिळाले आहे. गुजराथेत ज्याप्रकारे आरोग्याच्या क्षेत्रात काम होत आहे ते पाहता वैद्यकीय संशोधन, औषधविषयक संशोधन आणि जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुजरात आपला झेंडा फडकवेल तो दिवस फार लांब नाही. डबल इंजिनच्या सरकारचा खूप मोठा फोकस यावर आहे.
मित्रहो,
जेव्हा संसाधनांना संवेदनांची जोड मिळते तेव्हा ती संसाधने सेवेचे उत्तम माध्यम बनतात. परंतू जिथे संवेदना नसतात तेव्हा संसाधने स्वार्थाच्या आणि भ्रष्टाचाराच्या ताब्यात जातात. म्हणूनच मी सुरुवातीलाच संवेदनांचा उल्लेख केला, आणि कुशासन असलेल्या जुन्या व्यवस्थेची आठवण करून दिली. आता व्यवस्था बदललेली आहे. या संवेदनशील आणि पारदर्शी व्यवस्थेचा परिणाम हा आहे की अहमदाबादेत मेडिसिटी उद्याला आली आहे, कॅन्सर इन्स्टिट्यूटचे आधुनिकीकरण झाले आहे. आणि त्याचबरोबर गुजरातच्या प्रत्येक जिल्ह्यात डे केअर किमोथेरपीची सोयही मिळू लागली आहे म्हणजे गावोगावच्या रुग्णांना किमोथेरपीसाठी धावाधाव करावी लागू नये. आता आपण गुजरातच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असा, आपल्या घराजवळच, आपल्याच जिल्ह्यात किमोथेरपीसारखा महत्वाचा उपचार उपलब्ध होईल. याचप्रकारे भूपेंद्रभाईच्या सरकारतर्फे डायलिसिससारखी किचकट आरोग्यसेवाही तालुका स्तरावर उपलब्ध करुन दिली जात आहे. गुजराथने डायलिसिस व्हॅनची सोयही सुरु केली आहे. कारण जेव्हा रुग्णाला गरज असेल तेव्हा त्याच्या घरी जाऊनही त्याला सेवा दिला जाऊ शकेल. आज इथे आठमजली सार्वजनिक रचनेचे लोकार्पणसुद्धा झाले आहे. आणि जेथपर्यंत डायलिसिसचा प्रश्न आहे संपूर्ण हिंदुस्थानात सगळी व्यवस्था कमकुवत होती डायलिसिसवाल्यांसाठी एका निश्चित कालावधीत डायलिसिस होणे आवश्यक आहे. तेव्हा कुठे मी जगातल्या मोठमोठ्या आरोग्यक्षेत्रात कामे करणाऱ्यांशी चर्चा केली. मी म्हटले मला माझ्या हिंदुस्थानात प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस केंद्र उघडायची आहेत. आणि जसे गुजरातमध्ये तहसीलपर्यंत काम होत आहे मी देशातील प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस व्यवस्था पोचवण्याचा विडा उचलला आणि फार मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे.
मित्रहो,
रोग्यांचे कुटुंबिय या अडचणींना तोंड देत असतात, त्यांना अजून अडचणींचा सामना करावा लागू नये याची काळजी गुजरात सरकारने घेतली आहे. हाच आज देशातील काम करण्याची पद्धत आहे, आज हीच देशाची प्राथमिकता आहे.
मित्रहो,
जेव्हा सरकारे संवेदनाशील असतात तेव्हा त्याचा सर्वात जास्त फायदा समाजातील दुर्बल घटकांना होत असतो, गरीबांना होतो, मध्यमवर्गाच्या कुटुंबाला होतो, माताभगिनींना होतो. आधी आम्हाला दिसत होतो की गुजरातेत मातामृत्यूदर, बालमृत्यूदर एवढा चिंतेचा विषय होता पण सरकारांनी तो नशीबावर सोडून दिला होता. आम्ही ठरवले की हा आमच्या माता भगिनींच्या जीवनाचा प्रश्न आहे. याचे खापर कोणाच्या नशीबावर फोडले जाऊ देऊ नये. गेल्या 20 वर्षांमध्ये आम्ही यासाठी सातत्याने योग्य धोरणे आखली, ती लागू केली. आज गुजराथेत माता मृत्यूदर आणि शिशू मृत्यूदर यात मोठी घट झाली आहे. मातेचा जीव वाचतो आहे आणि नवजातही जगात आपल्या विकासाच्या मार्गावर पावले टाकत चालत आहे. ‘बेटी-बचाओ, बेटी पढ़ाओ’ मोहीम यामुळे पहिल्यांदा मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त झाली आहे मित्रांनो. या यशापाठी गुजराथ सरकारची चिरंजीवी आणि खिलखिलाहट यासारख्या योजनांची मेहनत आहे. गुजरातचे हे यश, हे प्रयत्न आज संपूर्ण देशात मिशन इंद्रधनुष्य आणि मातृवंदनासारख्या योजनांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहे.
मित्रहो,
आज देशातील प्रत्येक गरीबावर मोफत उपचारांसाठी आयुष्मान भारत यासारख्या योजना उपलब्ध आहेत. गुजरातेत आयुष्मान भारत आणि मुख्यमंत्री अमृतम योजना एकत्रितपणे गरीबांना सतावणाऱ्या चिंता आणि ओझे कमी करत आहेत. हीच डबल इंजिनसरकारची ताकद असते.
मित्रहो,
शिक्षण आणि आरोग्य ही दोन अशी क्षेत्रे आहेत जी केवळ वर्तमानच नाही तर भविष्याची दिशाही निश्चित करतात. आणि उदाहरण म्हणून आपण पाहिले तर 2019 मध्ये सिव्हिल रुग्णालयात 1200 खाटांची सुविधा होती. एका वर्षाने महामारी आली तेव्हा हेच रुग्णालया सर्वात मोठे केंद्र म्हणून विकसित होऊन समोर आले. या आरोग्यक्षेत्रातील एका पायाभूत सुविधेने कितीतरी लोकांचे जीव वाचवले. याच प्रकारे, 2019 मध्ये अहमदाबादेत AMC च्या SVP रुग्णालयाची सुरुवात झाली होती. जागतिक महामारीशी दोन हात करण्यात या रुग्णालयाने मोठी भूमिका निभावली. जर गेल्या वीस वर्षांमध्ये एवढ्या आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा तयार झाल्या नसत्या तर कल्पना करा की जागतिक महामारीशी दोन हात करताना आपल्याला किती अडचणींना तोंड द्यावे लागले असते? आम्हाला गुजरातचे वर्तमान उत्तम करायचे आहेच आणि भविष्यही सुरक्षित करायचे आहे. मला हा विश्वास आहे की आपल्या विकासाची ही गती गुजरात अजून पुढे नेईल ती एका उंचीला पोचवेल तसेच आपले अशिर्वाद सदैव पाठीशी असतील आणि त्यातूनच शक्ती मिळवत आम्ही अधिक उर्जेने आपली सेवा करत राहू. मी आपणा सर्वांच्या उत्तम आरोग्याची कामना करतो. आणि आपण निरोगी रहावे आपले कुटुंब निरोगी राहो हीच शुभेच्छा माझ्या गुजराथच्या बंधू भगिनींना देत माझ्या बोलण्याला पूर्णविराम देतो. खूप खूप धन्यवाद.
JPS/GC/Sonali/Vijaya/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1867820)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam