पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 5 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशला भेट देणार


पंतप्रधानांच्या हस्ते 3650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

बिलासपूर एम्सचेही पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन, पायाभरणीही पंतप्रधानांनी केली होती

1690 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

या प्रकल्पामुळे या क्षेत्रातील औद्योगिक विकासाला आणि पर्यटनाला चालना मिळणार

नालागड येथील वैद्यकीय उपकरण पार्कची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी तर बांदला येथे शासकीय जल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटन

कुल्लू दसरा सोहळ्यात पंतप्रधान सहभागी होणार

Posted On: 03 OCT 2022 4:59PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 5 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशला भेट देणार आहेत. तिथे ते 3650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. सकाळी साडेअकराच्या सुमाराला पंतप्रधान बिलासपूर एम्सचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी पाऊण वाजता  ते बिलासपूरमधील लुहनू मैदानावर पोहोचतील आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करतील. तिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमालाही संबोधित करणार आहेत. दुपारी सव्वातीनच्या सुमाराला  पंतप्रधान कुल्लूमधील धालपूर मैदानावर पोहोचतील आणि कुल्लू दसरा सोहळ्यात सहभागी होतील.

बिलासपूर एम्स

बिलासपूर येथील एम्सच्या उद्घाटनाच्या माध्यमातून देशभरातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि वचनबद्धता पुन्हा एकदा दिसून येते. ऑक्टोबर 2017 मध्ये पंतप्रधानांनी या रुग्णालयाची पायाभरणी केली होती. प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजना या केंद्रीय योजनेंतर्गत या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे.

तब्बल 1470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून  बांधलेले हे बिलासपूर एम्स रूग्णालय 18 विशेष आणि 17 अतिविशेष विभागांसह 18 मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर आणि 64 आयसीयू खाटांसह 750 खाटा असलेले एक अत्याधुनिक रुग्णालय आहे. 247 एकर क्षेत्रावर वसलेले हे रूग्णालय 24 तास आपत्कालीन आणि डायलिसिस सुविधा तसेच अल्ट्रासोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय अशा आधुनिक निदान यंत्रणा, अमृत फार्मसी, जन औषधी केंद्र आणि 30 खाटांच्या आयुष विभागाने सुसज्ज आहे. हिमाचल प्रदेशात आणि दुर्गम आदिवासी भागात आरोग्य सेवा देण्यासाठी रुग्णालयाने  डिजिटल आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे. त्याचबरोबर काझा, सलुनी आणि केलॉंग अशा दुर्गम आदिवासी आणि हिमालयात उंचावर असणाऱ्या प्रदेशांमध्ये आरोग्य शिबिरांच्या मार्फत रुग्णालयाद्वारे तज्ञांच्या आरोग्य सेवा प्रदान केल्या जाणार आहेत. या रुग्णालयात दरवर्षी एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी 100 विद्यार्थ्यांना आणि परिचारिका अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

विकास प्रकल्प

राष्ट्रीय महामार्ग क्र. 105 वर पिंजोर ते नालागढ या भागातील महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी, सुमारे 31 किमी लांबीच्या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करतील. त्यासाठी 1690 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च आपेक्षित आहे. अंबाला, चंदीगड, पंचकुला आणि सोलन/शिमला या भागांमधून बिलासपूर, मंडी आणि मनालीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे. या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे 18 किमी अंतराचा भाग हिमाचल प्रदेशात आणि उर्वरित भाग हरियाणामध्ये आहे. या महामार्गामुळे हिमाचल प्रदेशचे औद्योगिक केंद्र असलेल्या नालागढ-बड्डीमध्ये चांगल्या वाहतूक सुविधा उपलब्ध होतील आणि परिणामी, या प्रदेशातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल. त्याचबरोबर राज्यातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

नालागड येथे सुमारे 350 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरण पार्कची  पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. या वैद्यकीय उपकरण पार्कमध्ये  उद्योग उभारणीसाठी 800 कोटी रूपयांपेक्षा जास्त मूल्याचे सामंजस्य करार यापूर्वीच झाले आहेत. या प्रकल्पामुळे या भागातील रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.

बांदला येथील शासकीय जल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. सुमारे 140 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे महाविद्यालय, जलविद्युत प्रकल्पांसाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास मदत करेल. हिमाचल प्रदेश हे सुद्धा जलविद्युत प्रकल्प राबविणारे एक आघाडीचे राज्य एक आहे. जलविद्युत क्षेत्रात   तरुणांचे कौशल्य वाढविण्यात आणि रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही हे महाविद्यालय उपयुक्त ठरेल.

कुल्लू दसरा

कुल्लूच्या धालपूर मैदानात 5 ते 11 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आंतरराष्ट्रीय कुल्लू दसरा महोत्सव साजरा केला जाणार आहे. खोऱ्यातील हा उत्सव वैशिष्ठ्यपूर्ण  आहे.  या ऐतिहासिक कुल्लू दसरा सोहळ्यात पंतप्रधान ही अनुपम रथयात्रा  अनुभवणार आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी कुल्लू दसरा सोहळ्यात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

 

* * *

S.Kakade/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864784) Visitor Counter : 218