राष्ट्रपती कार्यालय

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) एकात्मिक क्रायोजेनिक इंजिन निर्मिती केंद्राचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन; तसेच प्रादेशिक विषाणूशास्त्र संस्थेची (दक्षिण क्षेत्र) केली पायाभरणी



संरक्षण दलांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे पाठबळ - राष्ट्रपती मुर्मू

Posted On: 27 SEP 2022 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2022

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (27 सप्टेंबर, 2022) बंगळुरू येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल ) एकात्मिक क्रायोजेनिक इंजिन निर्मिती केंद्राचे उद्‌घाटन केले.यावेळी त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  क्षेत्रीय विषाणूशास्त्र संस्थेची (दक्षिण क्षेत्र ) पायाभरणीही केली. 

क्रायोजेनिक आणि सेमी-क्रायोजेनिक इंजिन तयार करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेल्या एकात्मिक क्रायोजेनिक इंजिन निर्मिती केंद्राचे उद्‌घाटन हा, केवळ एचएएल आणि इस्रोसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी खरोखरच ऐतिहासिक क्षण आहे, असे राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी  एचएएलचे मोठे योगदान असल्याचे त्या म्हणाल्या. असे म्हणता येईल की, संरक्षण दलांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल)पाठबळ आहे.एचएएलने वेळोवेळी संशोधन, विकास आणि विविध प्रकारच्या विमान निर्मितीमध्ये आपली क्षमता दाखवून दिली आहे, असे राष्ट्रपतींनी  सांगितले.

इस्रो हा देशाचा अभिमान आहे. 1960 च्या दशकात जेव्हा या संस्थेने कार्य सुरू केले तेव्हा भारत एक तरुण प्रजासत्ताक देश होता, गरिबी आणि निरक्षरतेसारख्या गंभीर आव्हानांना तोंड देत होता. मात्र देशात क्षमता अफाट होती. इस्रोने  वेगवान गतीने प्रगती करत अगदी अतिविकसित आणि तंत्रज्ञानाने विकसित देशांचेही लक्ष वेधून घेतले. इस्रोचे प्रामाणिक प्रयत्न आणि समर्पण यामुळे भारत हा क्रायोजेनिक इंजिन निर्मिती क्षमता असलेला जगातील सहावा देश म्हणून उदयाला आला आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

धोरणात्मक संरक्षण आणि विकासासाठी एचएएल आणि इस्रो एकत्रितपणे योगदान देतात. दोन्ही संस्थांनी विविध उपकरणे आणि कार्यक्रमांच्या विकासामध्ये मोठी भूमिका बजावल्यामुळे  आपल्या देशाची सुरक्षा आणि विकास बळकट  झाला आहे.संरक्षण संबंधित उपकरणे तयार करण्याच्या उच्च दर्जाच्या सुविधेसह हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आपल्या देशासाठी एक बहुमोल संपत्ती असल्याचे सिद्ध झाले आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

भारताने प्रवेश केलेल्या अमृत काळात या संस्था भविष्यात महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक भूमिका बजावत राहतील याची ग्वाही, एचएएल आणि इस्रोचा गौरवशाली भूतकाळ आपल्याला देतो.  2047 पर्यंत, जेव्हा आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करू, तेव्हा आपल्या सभोवतालचे जग झपाट्याने बदललेले असेल. ज्याप्रमाणे 25 वर्षांपूर्वी आपण आजच्या जगाची कल्पना करू शकत नव्हतो,त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि स्वयंचलन जीवनात कशाप्रकारे बदल  घडवून आणणार आहेत याची कल्पना आज आपण करू शकत नाही. स्वतंत्र देश म्हणून आपण 75 वर्षे पूर्ण केली आहेत.भारताची नव्याने कल्पना करण्याचा आणि भारताला विकसित देश बनवण्याचा कालावधी म्हणून आपण आगामी 25 वर्षांकडे पाहत आहोत.2047 चा भारत अधिक समृद्ध आणि बळकट  असेल हे सुनिश्चित करणे ही आपली  संयुक्त जबाबदारी आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले. 

 राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

 

R.Aghor /S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 1862564) Visitor Counter : 206