माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांचा संग्रह असलेल्या "सबका साथ सबका विकास सबका विश्वास" चे प्रकाशन

Posted On: 22 SEP 2022 11:32AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ( मे 2019 - मे 2020 या काळातील) निवडक भाषणांचा संग्रह असलेल्या "सबका साथ सबका विकास सबका विश्वास" चे प्रकाशन 23 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत आकाशवाणी भवन, रंग भवन सभागृह इथे होणार आहे. प्रकाशन विभाग तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित  केला आहे.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान उपस्थित राहणार आहेत. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू सन्माननीय अतिथी असतील.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर हे या कार्यक्रमाचे यजमान असतील.   माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि मंत्रालयाच्या विविध माध्यम विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांचे संकलन असलेले हे पुस्तक नवभारताच्या निर्माणासाठी सर्वसमावेशक विकासाकरिता – लोक सहभागातून, सामूहिक विश्वासातून आणि हे ध्येय साध्य करण्याचा हा संकल्प असून 130 कोटी भारतीयांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतीक आहे.

यामध्ये मे 2019 ते मे 2020 या काळातील पंतप्रधानांच्या विविध विषयांवरील 86 भाषणांवर लक्ष केंद्रित केले आहे. दहा संकल्पनांवर  आधारित भागात ही भाषणे विभागण्‍यात आली  आहेत. या भाषणांमधून  ‘नवभारता’ निर्माणासाठी पंतप्रधानांची दूरदृष्टी प्रतिबिंबित होते.  अतिशय चपखलपणे यात भाषणांची विभागणी केली आहे. उदा.  – आत्मनिर्भर भारत: अर्थव्यवस्था, जनता-प्रथम प्रशासन, कोविड-19 विरुद्ध लढा, उदयोन्मुख भारत: परराष्ट्र व्यवहार, जय किसान, टेक इंडिया-न्यू इंडिया, हरित भारत- परिवर्तनशील भारत-स्वच्छ भारत, आरोग्यदायी भारत-  कार्यक्षम भारत, शाश्वत भारत-आधुनिक भारत: सांस्कृतिक वारसा आणि मन की बात.

या पुस्तकात नवभारतात असलेल्या स्वावलंबन, लवचिकता आणि आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर  करण्याच्या सक्षमतेच्या,पंतप्रधानांच्या दृष्टीकोनांचे चित्रण केले आहे. पंतप्रधानांमध्ये नेतृत्व सामर्थ्य, दूरदर्शी विचारसरणी आणि उत्कृष्ट संभाषण क्षमतेसह दूरदृष्टी तसेच असामान्य वक्तृत्व शैलीद्वारे जनसामान्यांशी संपर्क साधण्याचे कौशल्य या गुणांचा समुच्चय आहे. 'सबका साथ, सबका विकास' या  मंत्राने आम्ही प्रारंभ केला होता; पण पाच वर्ष सतत समर्पित वृत्तीने कार्य केल्यामुळे लोकांनी त्यात आणखी एक अद्भुत शब्दाची भर घातली आहे, ती म्हणजे 'सबका विश्वास',या त्यांच्या शब्दांतून त्याचे प्रतिबिंब या पुस्तकात उमटले आहे.

हिंदी तसेच इंग्रजी भाषेत प्रकाशित होणारी ही पुस्तके देशभरातील प्रकाशन विभागाच्या विक्री केंद्रांवर आणि सूचना भवन,सीजीओ (CGO) कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली येथील बुक गॅलरी येथे उपलब्ध असतील. प्रकाशन विभागाचे संकेतस्थळ तसेच भारतकोश या  प्लॅटफॉर्मवरूनही पुस्तके ऑनलाइन पद्धतीने खरेदी करता येतील.  ॲमेझॉन आणि गुगल प्लेवरही ही ई-बुक्स या प्रकारात ही उपलब्ध असतील.

प्रकाशन विभागाबद्दल:

प्रकाशन विभाग संचालनालय हे राष्ट्रीय महत्त्वाच्या आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तक आणि संशोधन पत्रिकांचे भांडार आहे. या संचालनायलयाची  1941 मध्ये स्थापना झाली आहे, प्रकाशन विभाग हे भारत सरकारचे असे एक प्रमुख प्रकाशन गृह आहे. याव्‍दारे  विविध भाषांमध्ये आणि विकास, भारतीय इतिहास, संस्कृती, साहित्य, चरित्र, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि रोजगार यासारख्या विविध विषयांवर पुस्तके आणि संशोधन पत्रिका प्रकाशित करण्‍यात येतात. या विभागाच्या पुस्तकांना वाचक आणि प्रकाशकांची विश्वासार्हता लाभली आहे आणि या पुस्‍तकांमधील  अधिकृत माहितीमुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

या विभागाच्या प्रमुख प्रकाशनांमध्ये ‘योजना’,‘कुरुक्षेत्र’ आणि ‘आजकल’ यांसारखी लोकप्रिय मासिके तसेच साप्ताहिक रोजगार वार्ता पत्र  'एम्प्लॉयमेंट न्यूज' आणि 'रोजगार समाचार' यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त,या प्रकाशन विभागाद्वारे सरकारचे सुप्रतिष्ठित वार्षिक संदर्भ पुस्तक 'इंडिया इयर बुक' देखील प्रकाशित करण्‍यात येते .

 

 S.Bedekar/Vinayak/Sampada/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1861405) Visitor Counter : 266