संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इजिप्तचे संरक्षण मंत्री जनरल मोहम्मद झाकी यांच्यात कैरो इथे झाली द्विपक्षीय चर्चा
द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने संयुक्त सराव आणि प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांचे आदान-प्रदान वाढवण्यास सहमती
परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रात संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी
Posted On:
20 SEP 2022 11:50AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2022
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इजिप्तचे संरक्षण मंत्री जनरल मोहम्मद झाकी यांच्यात कैरो इथे 19 सप्टेंबर 2022 रोजी द्विपक्षीय चर्चा झाली. इजिप्तच्या अधिकृत दौऱ्यावर असलेल्या राजनाथ सिंह यांना द्विपक्षीय चर्चा सुरू होण्यापूर्वी, कैरो येथील संरक्षण मंत्रालयात औपचारिक मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) देण्यात आली. उभय बाजूंनी संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठीच्या पावलांवर बैठकीत चर्चा केली. संयुक्त सराव आणि प्रशिक्षणासाठी विशेषत: बंडखोरां विरोधात कारवाई संदर्भातल्या प्रशिक्षणासाठी कर्मचार्यांची देवाणघेवाण वाढवण्यासाठी काम करण्यावर यात एकमत झाले.
भारत आणि इजिप्तच्या संरक्षण उद्योगांमधील सहकार्याचा कालबद्ध पद्धतीने विस्तार करण्यासाठीच्या प्रस्तावांवर काम करण्यासही उभयतांनी सहमती दर्शवली. त्यांनी प्रादेशिक सुरक्षेबाबत विचारांची देवाणघेवाण केली आणि जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी भारत आणि इजिप्तच्या योगदानाचा उल्लेख यावेळी करण्यात आला. कोविड-19 महामारीअसूनही , गेल्या वर्षभरात संरक्षण संबंध आणि देवाणघेवाणीला चालना दिल्याबद्दल दोन्ही बाजूंनी आनंद व्यक्त केला.
संरक्षण मंत्र्यांनी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल-सिसी यांची भेट घेतल्यानंतर, दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या दृष्टीने सुरक्षा आणि संरक्षण पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यावर सहमती दर्शविली. या भेटीदरम्यान दोन्ही संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. हा द्विपक्षीय संबंधांतील एक मैलाचा दगड ठरला आहे. यामुळे परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुजरातमधे गांधीनगर इथे 18-22 ऑक्टोबर 2022 दरम्यान 12 वा डिफेन्स एक्सपो होणार आहे. या अंतर्गत आयोजित भारत-आफ्रिका संरक्षण संवाद आणि आयओआर संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेसाठी राजनाथ सिंह यांनी इजिप्तच्या संरक्षण मंत्र्यांना आमंत्रित केले.
संरक्षण मंत्र्यांनी आज कैरो येथील अज्ञात सैनिकांचे स्मारक आणि इजिप्तचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष अन्वर अल-सदात यांच्या समाधीस्थळावर श्रद्धांजली वाहिली.
* * *
N.Chitale/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860786)
Visitor Counter : 241