पंतप्रधान कार्यालय

केरळमधल्या कोची इथे मेट्रो आणि रेल्वे विषयक अनेक प्रकल्पांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 01 SEP 2022 9:34PM by PIB Mumbai

केरळचे राज्यपाल  आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन जी, केरळ सरकारचा  मंत्रीवर्ग,इतर मान्यवर,कोचीमधल्या माझ्या बंधू-भगिनीनो !

आज केरळच्या कानाकोपऱ्यात ओणमच्या पवित्र उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. उत्साहाच्या या प्रसंगी,केरळच्या कनेक्टीव्हिटीशी संबंधित 4,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांची भेट केरळला मिळाली आहे. जीवनमान सुखकर करणाऱ्या आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रकल्पांसाठी मी आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा देतो.

आपण भारतवासियांनी, स्वातंत्र्याचा अमृतकाळ  म्हणजेच येत्या 25 वर्षात विकसित भारत निर्माण करण्याचा विशाल संकल्प घेतला आहे. विकसित भारताच्या या पथदर्शी आराखड्यात आधुनिक पायाभूत सुविधांची अतिशय मोठी भूमिका आहे. आज केरळच्या या महान भूमीने विकसित भारतासाठी  एक आणखी मोठे पाऊल उचलले आहे.

मित्रहो,

मला आठवते आहे, जून  2017 मध्ये कोची मेट्रोच्या  अलुवा ते पलारीवट्टोम या भागाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली होती. आज कोची मेट्रोच्या पहिल्या  टप्प्याच्या विस्ताराचे उद्घाटन झाले आहे. त्याचबरोबर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पायाभरणीही झाली आहे. कोची मेट्रोचा दुसरा टप्पा जे.एल.एन. स्टेडियम पासून  इंफोपार्क पर्यंत जाईल.सेझ-कोची स्मार्ट सिटीला कक्कनडशीही जोडेल.म्हणजे कोची मेट्रोचा दुसरा टप्पा आपल्या युवा वर्गासाठी, व्यावसायिकांसाठी मोठे वरदान ठरणार आहे.

कोचीमध्ये संपूर्ण देशासाठी नागरी विकास, वाहतूक विकासाला दिशा देणारे कामही सुरु झाले आहे.कोचीमध्ये ‘युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अॅथॉरिटी’ लागू करण्यात आले आहे. मेट्रो,बस, जलमार्ग अशी वाहतुकीची जितकी साधने आहेत ती सर्व एकीकृत करण्याचे काम हे प्राधिकरण करेल.

मल्टी मोडल कनेक्टीव्हिटीच्या या मॉडेलमुळे कोची शहराला थेट तीन लाभ होतील. या शहरातल्या लोकांचा ये-जा करण्याचा वेळ वाचेल, रस्तावरच्या वाहतूकीचा भार कमी होईल आणि शहरात प्रदूषणही कमी होईल. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी भारताने नेट झिरो हा जो विशाल संकल्प केला आहे त्यासाठी याची मदत होईल आणि कार्बन उत्सर्जनही कमी होईल.  

मेट्रो हे नागरी वाहतुकीचे सर्वात मुख्य साधन व्हावे यासाठी गेल्या आठ वर्षात केंद्र सरकारने सातत्याने काम केले आहे. केंद्र सरकारने मेट्रोचा  राजधानी बाहेर राज्याच्या दुसऱ्या मोठ्या शहरातही विस्तार केला आहे. आपल्या देशाची पहिली मेट्रो सुमारे 40 वर्षांपूर्वी धावली होती. त्यानंतर 30 वर्षात देशात  250 किलोमीटरपेक्षाही कमी मेट्रो नेटवर्क तयार होऊ शकले. गेल्या आठ वर्षात देशात मेट्रोचे  500 किलोमीटरपेक्षाही जास्त नवे मार्ग तयार झाले आहेत आणि एक हजार पेक्षा जास्त मेट्रो मार्गांवर काम सुरु आहे.

भारतीय रेल्वेचा आम्ही संपूर्ण कायापालट करत आहोत. आज देशात रेल्वे स्थानकांचाही विमानतळाप्रमाणे विकास करण्यात येत आहे.आज केरळला ज्या प्रकल्पांची भेट मिळाली आहे त्यामध्ये केरळमधील 3 मोठ्या रेल्वे स्थानकांचा विकास करून त्यांना आंतरराष्ट्रीय तोडीची करण्याची योजना आहे. आता एर्नाकुलम शहर स्थानक,एर्नाकुलम जंक्शन आणि कोल्लम स्थानकांमध्येही आधुनिक सुविधा निर्माण केल्या जातील.  

केरळमधली रेल्वे कनेक्टीव्हिटी आज एका नव्या टप्प्यावर पोहोचत आहे.  तिरुवनंतपुरम पासून  ते  मेंगलुरु पर्यंत  संपूर्ण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाले आहे, त्याच बरोबर केरळमधल्या सर्वसामान्य प्रवाश्यांबरोबरच भाविकांचीही मोठी सोय झाली आहे. एट्टुमनुर-चिंगावनम-कोट्टायम मार्गाच्या दुपदरीकरणामुळे भगवान अयप्पा दर्शनासाठी मोठी सुविधा होणार आहे. लाखो भाविकांची प्रदीर्घ काळापासून असणारी मागणी आता पूर्ण झाली आहे. शबरीमालासाठी येऊ इच्छिणाऱ्या देशभरातल्या आणि जगातल्या भक्तांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. कोल्लम-पुनलुर भागाच्या विद्युतीकरणामुळे या संपूर्ण भागाला प्रदूषणरहित आणि जलद रेल्वे प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. यामुळे स्थानिक लोकांना सुविधा प्राप्त होण्याबरोबरच या लोकप्रिय पर्यटक स्थानाचे आकर्षण आणखी वाढणार आहे.केरळमध्ये सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम सुरु आहे. या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे केरळमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील त्याच बरोबर शेतीपासून ते उदयोग क्षेत्रापर्यंत सर्वाना नवे बळ प्राप्त होईल.

केरळच्या कनेक्टीव्हिटीवर केंद्र सरकार अधिक भर देत आहे. आमचे सरकार, केरळची जीवनरेखा मानला जाणारा राष्ट्रीय महामार्ग 66 आता सहापदरी करत आहे. यावर 55 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात येत आहे. आधुनिक आणि उत्तम कनेक्टीव्हिटीचा सर्वात जास्त लाभ पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला होतो. पर्यटन हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये गरीब, मध्यमवर्ग, गाव,शहर सर्वाना सामावून घेतले जाते आणि सर्वाना त्यातून रोजीरोटी कमावता येते. स्वातंत्र्याच्या अमृत काळात पर्यटन क्षेत्राचा विकास, देशाच्या विकासासाठी  मोठा सहाय्यकारक ठरेल.

केंद्र सरकार,पर्यटन क्षेत्रात उद्योजकतेलाही मोठे प्रोत्साहन देत आहे. मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांचे विनाहमी कर्ज उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत केरळमध्ये 70 हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांची मदत लाखो छोट्या उद्योजकांना देण्यात आली आहे. यामध्ये पर्यटनक्षेत्रातल्या अनेकांचा समावेश आहे.

केरळचे, इथल्या लोकांचे हे वैशिष्ट्य आहे की, सुश्रुषा आणि ममत्वभाव  हा इथल्या समाजजीवनाचा भाग आहे.काही दिवसांपूर्वी माता अमृतानंदमयी जी यांच्या अमृता रुग्णालयाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली.करुणामूर्ती  अमृतानंदमयी माता यांचा आशीर्वाद घेऊन मी धन्य झालो.केरळच्या या भूमीवरून मी त्यांच्या  प्रती पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.

मित्रहो,

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास हा मूलमंत्र घेऊन आमचे सरकार,देशाचा विकास करत आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत काळात आपण सर्वजण मिळून विकसित भारताचा मार्ग प्रशस्त करू, अशी इच्छा बाळगत विकास प्रकल्पांसाठी आपणा सर्वाना पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा. आपणा सर्वाना ओणमच्या पुन्हा एकदा शुभेच्छा.

खूप-खूप धन्यवाद !

***

JaydeviPS/NC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1856263) Visitor Counter : 134