विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी भारतामध्ये पहिली स्वदेशी लस ‘सर्व्हाव्हॅक’ विकसित झाल्याची केली घोषाणा
Posted On:
01 SEP 2022 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2022
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी भारतामध्ये पहिली स्वदेशी लस ‘सर्व्हाव्हॅक’ विकसित झाल्याची घोषणा केली.
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अदर सी पुनावाला आणि इतर प्रमुख संशोधक आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (क्युएचपीव्ही) लस वैज्ञानिकदृष्टीने पूर्ण तयार झाली असल्याची घोषणा करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, ही लस सर्वांना परवडणा-या किफायतशीर दरामध्ये उपलब्ध होईल. जैवतंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहायक परिषद - बीआयआरएसी यांच्यासाठी ही लस तयार झालेला दिवस अतिशय महत्वाचा आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार आत्मनिर्भर भारताच्या जवळ जाण्यासाठी टाकलेले हे पाऊल आहे.
भारतामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा दुस-या क्रमांकाचा सर्वात प्रचलित कर्करोग आहे. या प्रकारचा कर्करोग होणे टाळता येणे शक्य आहे , तरीही जगभरामधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या मृत्यूंपैकी एक चतुर्थांश मृत्यू भारतात होतात. अलिकडेच वर्तविलेल्या अंदाजानुसार दरवर्षी सुमारे 1.25 लाख महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. तर 75 हजारांहून अधिक महिलांचा या आजाराने मृत्यू होतो. 83 टक्के महिलांना गर्भाशयाचा मुखाच्या अतितीव्र स्वरूपातला कर्करोग होतो. जगभरात अशा प्रकारच्या आजाराचे प्रमाण 70 टक्के आहे.
प्रख्यात चित्रपट अभिनेत्री मनीषा कोईराला, यांनी अंडाशयाच्या कर्करोगाविरूद्ध अतिशय धैर्याने लढा दिला. विशेष म्हणजे, ही लढाई मनीषा जिंकल्याही! विज्ञान- संशोधनाने हा टप्पा गाठल्याबद्दल विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभागचे आभार मानण्यासाठी यावेळी मनीषा कोईराला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘ भारतातल्या आणि जगभरातल्या महिलांसाठी आजचा एक विशेष, महत्वाचा दिवस आहे, कारण कर्करोगाच्या पलिकडेही जीवन आहे. त्या म्हणाल्या, सर्वांना परवडणा-या किफायतशीर प्रतिबंधात्मक उपचारांमुळे लाखो रूग्णांना ‘यस टू लाईफ’ असे म्हणण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
* * *
S.Kane/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1856090)
Visitor Counter : 320