पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2022 च्या अंतिम फेरी कार्यक्रमाला केले संबोधित


"तुम्ही नवोन्मेषक 'जय अनुसंधान' या घोषणेचे ध्वजवाहक आहात"

"तुमची अभिनव मानसिकता येत्या 25 वर्षांत भारताला अव्वल स्थानावर नेईल"

"भारताचा आकांक्षी समाज येत्या 25 वर्षात नवनिर्मितीसाठी एक प्रेरक शक्ती म्हणून काम करेल"

"आज भारतात प्रतिभा क्षेत्रात क्रांती घडत आहे"

"संशोधन आणि नावीन्य हे कार्यपद्धतीतून जीवनशैलीमध्ये रूपांतरित व्हावेत"

"भारतीय नवकल्पना नेहमीच सर्वात स्पर्धात्मक, किफायतशीर , शाश्वत, सुरक्षित आणि व्यापक उपाय प्रदान करतात"

"21 व्या शतकातील भारत आपल्या तरुणाईवर पूर्ण विश्वास टाकत मार्गक्रमण करत आहे'

Posted On: 25 AUG 2022 11:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2022 च्या अंतिम फेरी कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.

पंतप्रधानांनी हॅकाथॉनमध्ये सहभागी झालेल्यांशी संवाद साधला. केरळमधील SIX_PIXELS च्या प्रतिनिधींना  प्राचीन मंदिरांमधील मजकुराचे देवनागरीमध्ये भाषांतर करण्याच्या प्रकल्पाबद्दल पंतप्रधानांनी विचारले. सर्व मुली असलेल्या या गटाने  प्रकल्पाचे निष्कर्ष, फायदे आणि प्रक्रियेचे वर्णन केले. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यांचे काम सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.

तामिळनाडूच्या क्ट्युएटर्स संघाला दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांबाबत आव्हान देण्यात आले होते. त्यांनी बो लेग किंवा नॉक नीड म्हणजे पाय गुडघ्याजवळ बाहेरच्या बाजूला वाकल्यामुळे येणारे व्यंग या  समस्येवर काम केले. त्यांचे  क्ट्युएटर ‘प्रेरक’ अशा लोकांना मदत करते. वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.

कनिष्ठ गटातील स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचा विजेता गुजरातचा विराज विश्वनाथ मराठे याने  स्मृतिभ्रंश ही जागतिक आरोग्य समस्या असल्याचे लक्षात आल्यानंतर स्मृतिभ्रंश झालेल्या लोकांसाठी HCam नावाचे मोबाइल गेम अॅप्लिकेशन तयार केले आहे. यात मागील घटनांची  चर्चा आणि  प्रॉप्स किंवा सूचक आशय जसे छायाचित्रे आणि व्हिडिओ यांचा  समावेश आहे. अ‍ॅपमध्ये आर्ट थेरपी, खेळ, संगीत आणि व्हिडिओ आहेत जे स्मृतिभ्रंशाच्या  रुग्णांच्या संज्ञानात्मक सुधारणांमध्ये  मदत करतील आणि स्वत: च्या अभिव्यक्तीसाठी मार्ग  प्रदान करतील. योग संस्थेच्या संपर्कात असल्याबद्दल पंतप्रधानांच्या प्रश्नाला उत्तर देताना, विराज म्हणाला  की तो योग प्रशिक्षकांच्या संपर्कात आहे ज्यांनी वृद्धापकाळासाठी  काही आसने सुचवली आहेत.

बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  मेसरा, रांची येथील डेटाक्लॅनचे अनिमेश मिश्रा यांनी चक्रीवादळांचा अंदाज वर्तवण्यात 'डीप लर्निंगवापराचे वर्णन केले. ते इन्सॅटच्या उपग्रह प्रतिमांवर काम करतात. त्यांचे कार्य चक्रीवादळांच्या विविध पैलूंचा अधिक चांगल्या प्रकारे अंदाज लावण्यास मदत करू शकते. पंतप्रधानांनी प्रकल्पासाठी डेटाच्या उपलब्धतेबद्दल विचारले. प्रत्युत्तरादाखल अनिमेश म्हणाले की त्यांनी 2014 नंतर भारतीय किनारपट्टीवर धडकलेल्या चक्रीवादळांचा विचार केला आहे आणि अचूकता 89 टक्क्यांच्या जवळपास आहे. आतापर्यंत गोळा केलेला डेटा कमी असला तरी त्यांच्या तांत्रिक क्षमतेच्या जोरावर त्यांनी जास्तीत जास्त अचूकता आणि परिणाम  मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमधील टीम सर्वज्ञचे प्रियांश दिवाण यांनी पंतप्रधानांना इंटरनेटशिवाय रेडिओ लहरींद्वारे रेडिओ सेटवर मल्टीमीडिया डेटा सुरक्षितपणे हस्तांतरित करण्यास सक्षम करण्याविषयी  त्यांच्या चमूने केलेल्या  कार्याची माहिती दिली.  या प्रणालीसह, गोपनीयतेसंदर्भातल्या  समस्यांचे पूर्णपणे निराकरण केले जाऊ शकते कारण हे अॅप स्वदेशी  आहे आणि सर्व्हर देखील भारतात आहेत,असे त्यांनी सांगितले.  जेव्हा पंतप्रधानांनी प्रियांशला विचारले की ही यंत्रणा सैन्याद्वारे सीमावर्ती भागात तैनात केली जाऊ शकते, तेव्हा प्रियांश म्हणाले की ट्रान्समिशन एनक्रिप्टेड आहे ज्यामुळे सिग्नल व्यत्ययाचा  धोका असलेल्या भागात त्याचा वापर केला जाऊ शकतो. या प्रणालीद्वारे व्हिडीओ फाइल्सच्या ट्रान्समिशनसाठी ते  काम करत आहे का, असेही पंतप्रधानांनी प्रियांशला विचारले. त्यावर प्रियांशने सांगितले, ट्रान्समिशन माध्यम तेच राहिल्याने व्हिडिओ प्रेषण शक्य आहे आणि ते  आगामी  हॅकाथॉनमध्ये व्हिडिओ प्रेषणासाठी  दिशेने काम करत आहे.

IDEAL-BITS आसामच्या नितेश पांडे यांनी पंतप्रधानांना आयपीआर अर्थात बौद्धिक संपदा हक्क  अर्ज दाखल करण्यासाठी तळागाळातील नवोदितांसाठी असलेल्या त्यांच्या अँपविषयी  सांगितले. पेटंट अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अॅप AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करेल. अॅप नवोन्मेषकांना  कशी मदत करेल या पंतप्रधानांच्या प्रश्नाला उत्तर देताना, नितेश म्हणाले की हे ऍप्लिकेशन नवोन्मेषकांना  पेटंटबद्दल  शिक्षित करते. पेटंट दाखल करू इच्छिणाऱ्या नवोन्मेषकांसाठी हे अॅप अथपासून इतिपर्यंत माहिती  प्रदान करते. हे नवोन्मेषकाला क्षेत्राशी संबंधित विविध मध्यस्थांच्या  संपर्कात राहून मदत करते जे त्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करू शकतात.

उत्तर प्रदेशच्या टीम आयरिसचे अंशित बन्सल यांनी  सर्वाधिक गुन्हे होत असलेल्या परिसराचे क्राईम हॉटस्पॉट तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करण्याच्या समस्येबद्दल सांगितले. क्राईम क्लस्टर मॅप करण्यासाठी कोणत्याही देखरेखीशिवाय मशीन लर्निंग अल्गोरिदम तैनात केले जात आहेत. पंतप्रधानांनी या मॉडेलची लवचिकता आणि त्याची  मोजमाप क्षमता याबाबत  माहिती विचारली.  या मॉडेलच्या सहाय्याने अंमली पदार्थांची  समस्या हाताळता येईल का   याबाबतही  पंतप्रधानांनी विचारणा  केली. यावर उत्तर देताना  अंशित यांनी सांगितले की हे मॉडेल  भौगोलिक स्थानावर अवलंबून नाही तसेच गुन्ह्यांबद्दल प्राप्त  डेटा सेटच्या आधारे काम करत असल्यामुळे ते स्केलेबल आहे .

पंजाबमधील कनिष्ठ स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचा  विजेता  मास्टर हरमनजोत सिंगने त्याचा स्मार्ट ग्लोव्हचा प्रकल्प दाखवलाजो  आरोग्याशी संबंधित  मापदंडांवर देखरेख  ठेवतो. स्मार्ट ग्लोव्ह इंटरनेट ऑफ मेडिकल थिंग्जच्या मॉडेलवर कार्य करते आणि ते मानसिक आरोग्य, हृदयाची  गती, रक्तदाब, ऑक्सिजन संपृक्तता पातळी, मूडमधील बदल  शोधणे, हाताला बसणारे हादरे आणि शरीराचे तापमान यासारख्या आरोग्याच्या दृष्टीने  महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यास मदत करते. या संशोधनात   सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्याच्या पालकांचे कौतुक केले.

पंजाबमधील समिधा येथील भाग्यश्री संपाला हिने  मशीन लर्निंग आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानाद्वारे जहाजांच्या वास्तविक वेळेतील  इंधन देखरेखीबद्दलच्या  त्यांच्या समस्येबद्दल माहिती दिली. मानवरहित सागरी देखरेख प्रणाली निर्माण  करण्याचे समिधाचे स्वप्न  आहे. पंतप्रधानांनी भाग्यश्रीला विचारले की ही प्रणाली इतर क्षेत्रासाठीही  वापरता  येईल का? यावर भाग्यश्री म्हणाली की ते शक्य आहे.

यावेळी संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा लोकसहभागाचा एक महत्त्वाचा मार्ग बनला आहे. ते म्हणाले की तरुण पिढीबद्दल त्यांना पूर्ण विश्वास आहे .  स्वातंत्र्याच्या 100 वर्षानंतर आपला देश कसा असेल याविषयी देश मोठ्या संकल्पांवर काम करत आहे. या संकल्पांच्या पूर्ततेसाठी ‘जय अनुसंधान ’ या घोषणेचे तुम्ही युवा संशोधक  ध्वजवाहक  आहात.  मोदींनी युवा  संशोधकांच्या  यशाचा सामायिक मार्ग आणि पुढील  25 वर्षातला  देशाच्या यशाचा मार्ग अधोरेखित केला. "तुमची नवोन्मेषाची मानसिकता पुढील 25 वर्षात भारताला अव्वल स्थानी  नेईल", असे ते  म्हणाले.

पुन्हा एकदा, स्वातंत्र्यदिनी केलेल्या आकांक्षी समाजाबद्दलच्या  घोषणेसंदर्भात  पंतप्रधान म्हणाले की, हा महत्त्वाकांक्षी समाज पुढील  25 वर्षांत एक प्रेरक शक्ती म्हणून काम करेल. या समाजाच्या आकांक्षा, स्वप्ने आणि आव्हाने नवसंशोधकांसाठी  अनेक संधी घेऊन येतील.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 7-8 वर्षांत एकामागून एक अनेक क्रांतीच्या माध्यमातून देश वेगाने प्रगती करत आहे. आज भारतात पायाभूत सुविधांमध्ये क्रांती होत आहे. आज भारतात आरोग्य क्षेत्रात क्रांती होत आहे. आज भारतात डिजिटल क्रांती होत आहे. भारतात आज तंत्रज्ञान क्रांती होत आहे. आज भारतात प्रतिभा क्षेत्रात क्रांती घडत आहे, याकडे मोदींनी लक्ष वेधले.  आज प्रत्येक क्षेत्राला आधुनिक बनविण्यावर भर दिला जात असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की दररोज नवीन क्षेत्रे आणि आव्हाने यावर अभिनव  उपाय शोधले जात  आहेत. शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्याचे आवाहन  त्यांनी संशोधकांना  केले. त्यांनी युवा संशोधकांना प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर आणि 5G ची सुरुवात , या   दशकाच्या अखेरीस 6G साठी सुरु असलेली  तयारी आणि गेमिंग परिसंस्थेला चालना  यासारख्या उपक्रमांचा पुरेपूर लाभ घेण्यास सांगितले. ते म्हणाले की भारतातील अभिनव संशोधन  नेहमीच सर्वात स्पर्धात्मक, किफायतशीर शाश्वत, सुरक्षित आणि मोठ्या संख्येने उपाय पुरवते.  त्यामुळेच  जग भारताकडे आशेने पाहत आहे.

भारतात नवोन्मेषाची  संस्कृती जोपासण्यासाठी आपल्याला सामाजिक पाठिंबा  आणि संस्थात्मक सहाय्य  या दोन गोष्टींकडे कायम  लक्ष द्यावे लागेल यावर पंतप्रधानांनी भर दिला. नवोन्मेषाला व्यवसाय म्हणून स्वीकारण्याचे प्रमाण समाजात वाढले असून अशा परिस्थितीत आपल्याला नवीन कल्पना आणि मूळ विचार स्वीकारावे लागतील, असे  पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  "संशोधन आणि नवोन्मेष  केवळ कामाची शैली  न राहता जीवनशैलीत रूपांतरित व्हायला हवे ", असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नवोन्मेषाचा  मजबूत पाया रचण्यासाठी पथदर्शी आराखडा  मांडला  आहे. अटल टिंकरिंग लॅब आणि आय-क्रिएट प्रत्येक स्तरावर नवोन्मेषला प्रोत्साहन देत आहेत. 21व्या शतकातील आजचा भारत आपल्या तरुणाईवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे मार्गक्रमण करत  आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  याचा परिणाम म्हणून आज नवोन्मेष  निर्देशांकात भारताचे मानांकन वाढले आहे असे त्यांनी अधोरेखित केले. गेल्या 8 वर्षांत पेटंटची संख्या 7 पटीने वाढली आहे. युनिकॉर्नची संख्याही 100 च्या पुढे गेली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, आजची तरुण पिढी समस्येवर वेगवान आणि स्मार्ट उपाय घेऊन पुढे येत आहे. तरुण पिढीने समस्यांचे निराकरण केले पाहिजे हा विचार अशा हॅकॅथॉनमागे असून युवक  , सरकार आणि खाजगी संस्था यांच्यातील ही सहकार्याची भावना हे ‘सबका प्रयास ’चे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

पूर्वपीठिका

देशात, विशेषत: युवकांमध्ये नवोन्मेषाची  भावना रुजवण्याचा पंतप्रधानांचा सतत प्रयत्न असतो. याच विचाराने  स्मार्ट इंडिया हॅकाथॉनची  2017 साली सुरुवात करण्यात आली. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हा समाज, संघटना आणि सरकारला भेडसावणाऱ्या  गंभीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एक राष्ट्रव्यापी उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्पादनातील अभिनवता , समस्येवर उपाय शोधणे  आणि चाकोरी बाहेरचा विचार करण्याची संस्कृती जोपासणे हा यामागचा  उद्देश आहे.

स्मार्ट इंडिया हॅकाथॉनसाठी नोंदणी केलेल्या संघांची संख्या पहिल्या आवृत्तीतील सुमारे 7500 वरून यंदाच्या  पाचव्या आवृत्तीत सुमारे 29,600 म्हणजेच चार पटीने वाढली आहे यावरून त्याच्या वाढत्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. यावर्षी 15,000 हून अधिक विद्यार्थी आणि मार्गदर्शक हाकेथॉन 2022 च्या महाअंतिम फेरीत भाग घेण्यासाठी 75 नोडल केंद्रांवर प्रवास करत आहेत. 2900 हून अधिक शाळा आणि 2200 उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी मंदिराच्या शिलालेखांचे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन (OCR) आणि देवनागरी लिपींमधील अनुवाद, नाशवंत खाद्यपदार्थांसाठी शीतसाखळी मधील IoT-सक्षम जोखीम देखरेख प्रणाली, भूप्रदेशाचे हाय -रिझोल्यूशन 3D मॉडेल, आपत्तीग्रस्त भागात पायाभूत सुविधा आणि रस्त्यांची परिस्थिती यासह 53 केंद्रीय मंत्रालयांमधील 476 समस्या हाताळतील.

शालेय स्तरावर नवोन्मेष संस्कृती वृद्धिंगत  व्हावी आणि समस्या सोडवण्याची वृत्ती विकसित व्हावी यासाठी  यावर्षी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन - ज्युनियर हा  शालेय विद्यार्थ्यांसाठी एक पथदर्शी उपक्रम म्हणून सादर करण्यात आला.

 

N.Chitale/Sonali/Sushama/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1854528) Visitor Counter : 277