शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली, तसेच भारत ऑस्ट्रेलिया शिक्षण परिषदेच्या 6व्या बैठकीत क्लेअर यांच्यासोबत सहअध्यक्ष म्हणून सहभागी झाले


शिक्षण व कौशल्यविकासाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासंबंधात दोन्ही बाजूंचे एकमत

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ऑस्ट्रेलियन शिक्षणसंस्थांना भारतात शिक्षण परिसर उभे करण्यासाठी आमंत्रित केले

भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रलंबित व्हिसाचा मुद्दा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उपस्थित केला

Posted On: 22 AUG 2022 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑगस्‍ट 2022

 

केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली, तसेच पश्चिम सिडनी विद्यापीठात (WSU) भारत ऑस्ट्रेलिया शिक्षण परिषदेच्या (AIEC) 6 व्या बैठकीत क्लेअर यांच्यासोबत सह अध्यक्ष म्हणून सहभागी झाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001JSRI.jpg

द्विपक्षीय बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन, नवोन्मेष तसेच उद्योजकतेच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासंबंधात अतिशय फलदायी चर्चा केली. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ऑस्ट्रेलियन विद्यापीठे व कौशल्य विकास संस्थांना भारतात शिक्षण परिसर उभे करण्यासाठी, तसेच भारतीय शिक्षणसंस्थांशी सहकार्य करण्याच्या दिशेने पावले उचलण्यासाठी आमंत्रित केले. प्रधान यांनी महामहिम जेसन क्लेअर यांना या वर्षाअखेरीस भारताला भेट देण्याचे आमंत्रण दिले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002N6Y9.jpg

अध्ययन, कौशल्य विकास आणि संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत दोंन्ही मंत्र्यांचे एकमत झाले. भारत ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान धोरणात्मक व सर्वसमावेशक भागीदारीमध्ये शिक्षणक्षेत्राचा मोठा वाटा असेल.

शिक्षण, कौशल्य विकास, व संशोधन क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध मजबूत होण्यासाठी भारत ऑस्ट्रेलिया शिक्षण परिषद (AIEC) हे उत्तम व्यासपीठ असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी परिषदेच्या 6 व्या बैठकीत सांगितले. परिषदेची सातवी बैठक पुढील वर्षी भारतात घेण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियन पथकाला आमंत्रित केले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003M6LU.jpg

आयुर्वेद, योग, कृषिक्षेत्र, इत्यादी क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्रितपणे संशोधन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. कौशल्य प्रमाणीकरण, तसेच खनिकर्म, दळणवळण व्यवस्थापन, इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. भारताने डिजिटल विद्यापीठ आणि गतिशक्ति विद्यापीठ स्थापन केले असून त्यांचे पाठ्यक्रम विकसित करण्यासोबत इतर अनेक बाबतीत दोन्ही देशांना एकत्रितपणे प्रयत्न करता येतील , असे त्यांनी सुचवले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004CEAT.jpg

ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा प्रलंबित असल्याचा मुद्दाही प्रधान यांनी यावेळी उपस्थित केला. हे व्हिसा लवकरात लवकर दिले जातील असे आश्वासन ऑस्ट्रेलियन मंत्र्यांनी दिले. त्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी एक संयुक्त वार्ताहर परिषद घेतली. दोन्ही देशांमधील शिक्षणविषयक नियमांची माहिती करून घेत दोन्ही देशांमधील शिक्षणसंस्थांचे परस्पर सहकार्य व आदानप्रदान कसे वाढवता येईल यावर काम करणाऱ्या एका कृतिगटाची स्थापना करत असल्याचे त्यांनी घोषित केले. दोन्ही देशांच्या प्रगतीसाठी शिक्षण, कौशल्यविकास व संशोधनाच्या क्षेत्रांमध्ये ऑस्ट्रेलियाशी द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, व त्यासाठी ज्ञानसेतूची निर्मिती करणे यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005G1Z8.jpg

न्यू साऊथ वेल्स च्या विधानपरिषद सदस्य व शिक्षणमंत्री सेरा मिचेल यांच्यासोबत धर्मेंद्र प्रधान एका ऑस्ट्रेलियन शाळेला भेट देणार आहेत. त्याशिवाय ते सिडनी मधील टीएएफई एनएसएफ (TAFE  NSF) आणि न्यू साऊथ वेल्स विद्यापीठालाही (UNSW) भेट देणार असून तिथल्या कुलगुरूंशी तसेच ऑस्ट्रेलियाच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ प्रतिनिधींशी चर्चा करतील.

 

* * *

S.Tupe/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1853596) Visitor Counter : 250