कृषी मंत्रालय
प्रमुख कृषी पिकांचे 2021-22 चौथे अग्रिम अंदाज जाहीर
देशात 315.72 दशलक्ष टन विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज; 2020-21 मध्ये 4.98 मेट्रिक टन जास्त अन्नधान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकरीहितैषी धोरण राबविल्याचा तसेच शेतक-यांनी आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक परिश्रमाचा परिणाम: नरेंद्र सिंह तोमर
Posted On:
17 AUG 2022 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2022
सन 2021 -22 या वर्षातील प्रमुख कृषी पिकांच्या उत्पादनासंबंधी चौथा अग्रिम अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जाहीर केला आहे. देशात अन्नधान्याचे उत्पादन या वर्षात 315.72 दशलक्ष टन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हा अंदाज मागील वर्षापेक्षा म्हणजेच 2020-21 या कालावधीत झालेल्या अन्नधान्य उत्पादनापेक्षा 4.98 दशलक्ष टन अधिक आहे. गेल्या पाच वर्षात (2016-17 ते 2020-21) अन्नधान्याच्या सरासरी उत्पादनाचा विचार करता 2021-22 मध्ये 25 दशलच टनांनी जास्त उत्पादन होईल, असा अंदाज आहे. यामध्ये तांदूळ, मका, हरभरा, डाळी, कडधान्ये आणि मोहरी, तेलबिया आणि ऊस यांचे विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकरीहितैषी धोरण राबविल्याचा तसेच शेतक-यांनी आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक परिश्रमाचा परिणाम म्हणजे हे विक्रमी अन्नधान्य उत्पादन आहे, असे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे.
चौथ्या अग्रिम अंदाजानुसार 2021-22 मध्ये प्रमुख पिकांचे उत्पादन पुढीलप्रमाणे होईल. अन्नधान्य: 315.72 दशलक्ष टन, तांदूळ- 130.29 दशलक्ष टन (विक्रमी), गहू - 106.84 दशलक्ष टन, पोषण/ भरड तृणधान्ये - 50.90 दशलक्ष टन, मका - 33.62 दशलक्ष टन (विक्रमी), डाळी- 27.69 दशलक्ष टन (विक्रमी), तूर- 4.34 दशलक्ष टन, हरभरा - 13.75 दशलक्ष टन (विक्रमी), तेलबिया - 37.70 दशलक्ष टन (विक्रमी), भूईमूग - 10.11 दशलक्ष टन, सोयाबिन - 12.99 दशलक्ष टन , रेपसीड आणि मोहरी- 11.75 दशलक्ष टन (विक्रमी),ऊस - 431.81 दशलक्ष टन (विक्रमी), कापूस- 31.20 गासड्या (प्रत्येकी 170 किलो), ज्यूट (ताग) आणि मेस्ता- 10.32 गासड्या (प्रत्येकी 180 किलो).
वर्ष 2021-22 मध्ये तांदळाचे एकूण उत्पादन विक्रमी म्हणजे 130.29 दशलक्ष टन होईल, असा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांचे भात उत्पादन पाहिले तर हे उत्पादन 13.85 दशलक्ष टनांनी जास्त आहे. गेल्या पाच वर्षात देशात तांदळाचे सरासरी उत्पादन 116.44 दशलक्ष टन झाले आहे.
वर्ष 2021-22 मध्ये गव्हाचे एकूण उत्पादन 106.84 दशलक्ष टन होईल, असा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षात गव्हाचे उत्पादन सरासरी 103.88 दशलक्ष टन झाले आहे. म्हणजेच यंदा गव्हाच्या उत्पादनामध्ये 2.96 दशलक्ष टन वाढ होईल, असा अंदाज आहे.
पोषक/ भरड तृणधान्याच्या उत्पादन अंदाजे 50.90 दशलक्ष टन होईल. हे गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा 3.87 दशलक्ष टनांनी जास्त आहे. या उत्पादनाची गेल्या पाच वर्षांची सरासरी 46.57 दशलक्ष टन आहे.
वर्ष 2021-22 मध्ये एकूण डाळींचे उत्पादन अंदाजे 27.69 दशलक्ष टन होईल. गेल्या पाच वर्षात सरासरी 23.82 दक्षलक्ष टन डाळींचे उत्पादन झाले आहे. यंदा यापेक्षा जास्त 3.87 दशलक्ष टन डाळींचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे.
वर्ष 2021-22 मध्ये देशात एकूण तेलबियांचे उत्पादन 37.70 दशलक्ष टन होतील असा अंदाज आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2020-21 मध्ये देशात 35. 95 दशलक्ष टन तेलबियांचे उत्पादन झाले होते. यापेक्षा यंदा 1.75 दशलक्ष टन तेलबियांचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. याशिवाय, 2021-22 मध्ये तेलबियांचे उत्पादन सरासरी उत्पादनापेक्षा 5.01 दशलक्ष टनांनी जास्त होईल.
देशामध्ये 2021-22 मध्ये उसाचे उत्पादन 431.81 दशलक्ष टन इतके विक्रमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ऊस उत्पादनाचा सरासरी आकडा 373.46 दशलक्ष टन असा आहे. यापेक्षा यंदा 58.35 दशलक्ष टन ऊस जास्त पिकेल, असा अंदाज आहे.
कापूस, ताग आणि मेस्ता यांचे उत्पादन अनुक्रमे 31.20 दशलक्ष गासड्या (प्रत्येकी 170 किलो), आणि 10.31 दशलक्ष गासड्या (प्रत्येकी 180 किलो) होईल, असा अंदाज आहे.
या विविध पिकांच्या उत्पादनाचा अंदाज हा राज्यांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे तसेच इतर स्त्रोतांकडून उपलब्ध झालेल्या प्रमाणित माहितीनुसार अंदाज निश्चित करण्यात आला आहे. 2021-22 या वर्षासाठी हा चौथा अग्रिम अंदाज व्यक्त केला आहे. तसेच वर्ष 2007 -08 पासूनच्या पुढील सर्व वर्षांच्या उत्पादनाचे तुलनात्मक अंदाजही देण्यात आले आहेत.
वर्ष 2021-22 च्या प्रमुख पिकांच्या उत्पादनाच्या चौथ्या अग्रिम अंदाजाविषयीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करावे
* * *
S.Thakur/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1852522)
Visitor Counter : 301