पंतप्रधान कार्यालय

पानिपत इथल्या 2 जी इथेनॉल प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 10 AUG 2022 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2022

 

नमस्कार जी!

हरियाणाचे राज्यपाल  बंडारू दत्तात्रेयजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र सिंह तोमरजी, हरदीप सिंह पुरीजी, रामेश्वर तेलीजी, खासदार, आमदार, पानिपतमधे मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय शेतकरी बंधू-भगिनी, या कार्यक्रमात सहभागी सर्व महानुभाव, स्त्रिया आणि सज्जन, तुम्हा सर्वांना जागतिक जैवइंधन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

आजचा कार्यक्रम पानिपत, हरियाणासह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पानिपतमधील हा आधुनिक इथेनॉल प्रकल्प, जो जैवइंधन प्रकल्प सुरु झाला आहे, ही केवळ एक सुरुवात आहे. या प्रकल्पामुळे दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण हरियाणामधील प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार आहे. मी हरियाणातील लोकांचे विशेषत: शेतकरी भगिनी आणि बांधवांचे अभिनंदन करतो. तसे तर, आज हरियाणा दुहेरी अभिनंदनासही पात्र आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हरियाणाच्या मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करत देशाचे नाव उज्वल केले आहे. देशाला अनेक पदके मिळवून दिली आहेत. हरियाणाच्या खेळाडूंनी खेळाच्या मैदानात जी ऊर्जा दाखवली, तशीच ऊर्जा आता हरियाणाची शेतंही दाखवतील.

मित्रांनो,

निसर्गाची पूजा करणाऱ्या आपल्या देशात बायो-फ्युएल किंवा जैवइंधन हे निसर्गाच्या रक्षणासाठीचे समानार्थी शब्द आहेत. हे आपल्या शेतकरी बंधू भगिनींना चांगले समजते. आपल्यासाठी जैवइंधन म्हणजे हरित इंधन, पर्यावरण वाचवणारे इंधन. तुम्ही शेतकरी बंधू आणि भगिनींनो शतकानुशतके इतके जागरूक आहात की बियाणे पेरण्यापासून ते पीक वाढेपर्यंत आणि नंतर ते बाजारात नेण्यापर्यंत तुम्ही काहीही वाया जाऊ देत नाही. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातून पिकवलेली प्रत्येक गोष्ट कशी वापरायची हे माहित आहे. जे शेत माणसांसाठी अन्न पिकवते, तेच जनावरांसाठी चाराही देते. पीक घेतल्यानंतर शेतात उरलेल्या कडब्याचा योग्य वापर कसा करायचा हे आपल्या बहुतेक शेतकऱ्यांना माहीत आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी कडब्याचा वापर केला जातो, अनेक गावांमध्ये मातीची भांडी भाजण्यासाठीही कडबा वापरला जातो.  पण हेही खरे आहे की, हरियाणासारख्या प्रदेशात, जेथे तांदूळ आणि गहूचे अधिक उत्पादन घेतले जाते, तेथे कडब्याचा पुरेपूर वापर होऊ शकला नाही. आता इथल्या शेतकर्‍यांना कडब्याच्या वापराचे दुसरे साधन उपलब्ध होत आहे. आणि ते आहे - आधुनिक इथेनॉल प्रकल्प, जैव-इंधन संयंत्र. पानिपतच्या जैव-इंधन प्रकल्पात कडबा न जाळताही त्याची विल्हेवाट लावली जाऊ शकेल. आणि एक नाही, दोन नाही तर अनेक फायदे एकाच वेळी होणार आहेत. पहिला फायदा असा होईल की, कडबा जाळल्याने धरणीमातेला ज्या वेदना होत असत, ती अग्नीत होरपळत असे त्या वेदनांतून धरणी मातेला मुक्ती मिळेल. धरणी मातेलाही आवडेल की कडबा, पेंढा आता योग्य ठिकाणी वापरला जात आहे. दुसरा फायदा असा होईल की, कडबा कापण्यापासून त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या कामासाठी नवीन यंत्रणा बनवली जात आहे, नवीन यंत्रे येत आहेत, वाहतुकीसाठी नवीन सुविधा निर्माण होत आहेत, हे नवीन जैव-इंधन संयंत्र उभारले जात आहेत, या सर्व गावांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हरित रोजगाराचे क्षेत्र मजबूत होईल. तिसरा फायदा असा होईल की, जो कडबा शेतकर्‍यांसाठी ओझे होता, त्रासदायक होता, तो त्यांच्यासाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन होईल. चौथा फायदा म्हणजे प्रदूषण कमी होईल, पर्यावरण रक्षणात शेतकऱ्यांचे योगदान आणखी वाढेल. आणि पाचवा फायदा असा होईल की देशाला पर्यायी इंधनही मिळेल. म्हणजेच ज्या कडब्याने, पेंढ्याने पूर्वी नुकसान होत असे, त्यातून हे पंचामृत निघतील. देशाच्या विविध भागांमध्ये असे अनेक जैवइंधन संयंत्रे उभारण्याचे काम सुरू असल्याचा मला आनंद आहे.

मित्रांनो,

राजकीय स्वार्थासाठी शॉर्टकटचा अवलंब करून समस्या टाळण्याकडे ज्यांचा कल असतो, ते प्रश्न कायमचे सोडवू शकत नाहीत. शॉर्टकटचा अवलंब करणाऱ्यांना काही काळ शाबासकी मिळू शकते, राजकीय फायदा होऊ शकतो, पण समस्या कमी होत नाही. म्हणूनच मी म्हणतो की शॉर्टकटचा अवलंब केल्याने शॉर्ट सर्किट नक्कीच होते. शॉर्टकटचा अवलंब करण्याऐवजी आपले सरकार समस्यांवर कायमस्वरूपी उपाय करण्यात सक्रीय आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये कडब्याच्या समस्यांबद्दल बरेच काही सांगितले जात आहे. पण शॉर्टकटचा अवलंब करणारे लोक यावर उपाय देऊ शकले नाहीत. शेतकऱ्यांच्या कडब्याबाबतच्या समस्या आम्हाला समजतात, त्यामुळे आम्ही त्यांना त्यापासून मुक्त होण्यासाठी सोपे पर्यायही देत आहोत.

जे शेतकरी उत्पादक संघ आहेत, एफपीओ आहेत, त्यांना आम्ही कडब्याची विल्हेवाट लावण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. या संबंधित आधुनिक यंत्रांच्या खरेदीसाठी 80 टक्क्यांपर्यंत अनुदानही देण्यात आले. आता पानिपतमधील हा जैव-इंधन प्रकल्प सुद्धा कडब्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास मदत करणार आहे. या आधुनिक प्रकल्पात तांदूळ आणि गव्हाच्या पेंढ्याबरोबरच मक्याचा उरलेला भाग, उसाचे धांडे, कुजलेली धान्ये, या सर्वांचा इथेनॉल तयार करण्यासाठी उपयोग केला जाईल. म्हणजेच शेतकऱ्यांची मोठी चिंता संपणार आहे. आपले अन्नदाते जे नाईलाजाने कडबा, पेंढा जाळत असत, ज्यांची यामुळे बदनामी होते, त्यांनाही आता अभिमान वाटेल की ते इथेनॉल किंवा जैव-इंधन निर्मितीतही मदत करत आहेत, राष्ट्र उभारणीत मदत करत आहेत. गाई-म्हशींपासून निर्माण होणाऱ्या शेणाची, शेतातून निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारने आणखी एक योजना गोबरधन योजना सुरू केली आहे. गोबरधन योजना हे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे आणखी एक माध्यम ठरत आहे.

मित्रांनो,

खते असो, रसायन असो, खाद्यतेल असो, कच्चे तेल असो, वायू असो, स्वातंत्र्याची अनेक दशके आपण परकीय देशांवर खूप अवलंबून आहोत. परिणामी जागतिक परिस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास भारतही संकटातून सुटू शकत नाही. गेली 8 वर्षे देश या आव्हानांवर कायमस्वरूपी उपाय शोधत आहे.  देशात नवीन खतनिर्मिती संयंत्रे उभारली जात आहेत, नॅनो खतांची निर्मिती होत आहे, खाद्यतेलासाठीही नवीन मोहिमा सुरू झाल्या आहेत. येणाऱ्या काळात हे सर्व या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने देशाला नेईल.

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देश आत्मनिर्भर भारताचा संकल्प साकारण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. आपली गावे आणि आपले शेतकरी हे स्वावलंबनाचे सर्वात मोठे उदाहरण आहेत. शेतकरी त्यांच्या गरजेच्या वस्तूंची सोय मोठ्या प्रमाणात त्यांच्या गावातच करतात. गावाची सामाजिक-आर्थिक व्यवस्था अशी आहे की सर्वजण एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात. यामुळेच गावातील लोकांमध्ये बचतीची प्रवृत्तीही प्रबळ आहे. त्यांच्या या प्रवृत्तीमुळे देशाचा पैसाही वाचतो आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यामुळे गेल्या 7-8 वर्षांत देशाचे सुमारे 50 हजार कोटी रुपये विदेशात जाण्यापासून वाचले आहेत. आणि इथेनॉल मिश्रणामुळे जवळपास तेच हजार कोटी रुपये परदेशात जाण्यापासून वाचले आहेत. म्हणजेच जो पैसा परदेशात जायचा तो एक प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना मिळाला आहे.

मित्रांनो,

एकविसाव्या शतकातील नव्या भारतात आणखी एक मोठा बदल झाला आहे. आज देश मोठमोठे संकल्प सोडत आहे आणि ते सिद्धही करून दाखवत आहे. काही वर्षांपूर्वी देशाने पेट्रोलमध्ये 10 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या शेतकरी बंधू-भगिनींच्या मदतीने देशाने हे लक्ष्य वेळेपूर्वीच गाठले आहे. आठ वर्षांपूर्वी आपल्या देशात इथेनॉलचे उत्पादन फक्त 40 कोटी  लिटर इतके होते. आज सुमारे 400 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात इथेनॉल बनवण्यासाठीचा कच्चा माल आपल्या शेतकऱ्यांच्या शेतातूनच तर येतो.  विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.

देश कशा प्रकारे  मोठी उद्दिष्टं साध्य करत आहे याचे मी आपल्या शेतकरी बंधु-भगिनींना आणखी एक उदाहरण देतो. 2014 पर्यंत देशात केवळ 14 कोटींच्या आसपास एलपीजी कनेक्शन्स होती. देशाच्या निम्म्या लोकसंख्येला, माता भगिनींना चुलीच्या धुरामध्ये सोडून देण्यात आले होते. आपल्या मुली-बहिणींच्या आरोग्याचा कधी विचारच करण्यात आला नव्हता. आज मला अतिशय आनंद होत आहे.  कारण आज 9 कोटींपेक्षा जास्त गॅस कनेक्शन गरीब भगिनींना देण्यात आली आहेत. आता आम्ही देशात जवळ जवळ शंभर टक्के एलपीजी कव्हरेज पर्यंत पोहोचलो आहोत. 14 कोटींवरून वाढून आज देशात सुमारे 31 कोटी गॅस कनेक्शन्स झाली आहेत. यामुळे आपल्या गरीब कुटुंबातील, मध्यम वर्गातील लोकांची खूप मोठया प्रमाणात सोय झाली आहे.

मित्रांनो, देशात CNG नेटवर्क वाढविण्यासाठी आणि पाईपलाईनद्वारे  स्वस्त गॅस घरोघरी पोहोचवण्यासाठी वेगाने काम होत आहे. आपल्या देशात 90 च्या दशकात CNG स्टेशन्स उभारण्याचे काम सुरू झाले होते. 8 वर्षांपूर्वी देशात CNG च्या स्टेशन्सची संख्या 800 पेक्षाही कमी होती. घरात पाईपने येणाऱ्या गॅस कनेक्शन्सची संख्या केवळ काही लाखांच्या घरात होती. आज देशात साडेचार हजार पेक्षा जास्त CNG स्टेशन्स आहेत आणि पाईप गॅस कनेक्शनची संख्या 1 कोटीपर्यंत पोहोचू लागली आहे. आज आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत असताना देश  याच उद्दिष्टावर काम करत आहे जेणेकरून पुढील काही वर्षांत देशात 75 टक्क्यांपेक्षा जास्त घरात पाईप द्वारे गॅस पोहोचेल.

मित्रांनो, आज आम्ही ज्या शेकडो किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन बसवत आहोत, जे आधुनिक प्लांट, जे कारखाने उभारत आहोत, त्यांचा जास्तीतजास्त लाभ आपल्या युवा पिढीला होईल. देशात निरंतर हरित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, रोजगाराच्या संधी वाढतील. आजच्या समस्या आपल्या भावी पिढीला भेडसावणार नाहीत. हाच खरा विकास आहे, विकासाची खरी वचनबद्धता आहे.

मित्रांनो,जर राजकारणातच स्वार्थ असेल तर कोणीही पुढे येऊन पेट्रोल-डिझेल मोफत देण्याच्या घोषणा करू शकतात. अशी पावले  आपल्या मुलाबाळांचे अधिकार हिरावून घेतील, देशाला आत्मनिर्भर बनवण्यापासून रोखतील. अशा स्वार्थी धोरणांमुळे देशाच्या प्रामाणिक करदात्यांवरील बोजा देखील वाढत जाईल. आपल्या राजकीय स्वार्थासाठी अशा घोषणा करणारे कधीच नव्या  तंत्रज्ञानावर गुंतवणूक करणार नाहीत. ते शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देतील, पण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी इथेनॉल सारखे प्लांट बसवणार नाहीत. वाढत्या प्रदूषणावर ते मोठमोठ्या भूलथापा देत राहतील, मात्र त्याला आळा घालण्यासाठी जे काही करायचं असेल, त्यापासून दूर पळतील.

माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, ही नीती नव्हे, अनीती आहे. हे राष्ट्रहित नव्हे हे राष्ट्र अहित आहे. देशाला मागे नेण्याचा प्रकार आहे.  देशाच्या समोर जी आव्हाने आहेत , त्यांना तोंड देण्यासाठी हेतू स्वच्छ असला पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, नीती पाहिजे. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि सरकारला खूप मोठी गुंतवणूक करावी लागते. जर सरकारकडे पैसाच नसेल तर इथेनॉल  प्लांट, बायोगॅस  प्लांट, मोठमोठे सोलर प्लांट, हाइड्रोजन गॅसचे  जे प्लांट आज उभारले जात आहेत, ते देखील बंद पडतील. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण राहू वा न राहू, पण हे राष्ट्र तर नेहमीच राहणार आहे, अनेक शतकांपासून राहिले आहे, अनेक शतके राहणार आहे. यामध्ये राहणारी संतती नेहमी राहणार आहे. आपल्याला आपल्या भावी पिढ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करण्याचा कोणताही अधिकार नाही. मित्रांनो, स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांनी देखील याच शाश्वत भावनेने काम केले आहे. जर त्यांनी देखील त्यावेळी  स्वार्थाचा विचार केला असता त्यांच्या वाट्याला कधीच खडतर आयुष्य आले नसते. संकटांपासून, गोळ्यांपासून, फाशीच्या फासापासून, यातनांपासून त्यांचा बचाव झाला असता, पण त्यांची संतती म्हणजे आपण भारताचे लोक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू शकलो नसतो. ऑगस्टचा हा महिना क्रांतीचा महिना आहे. म्हणूनच एका देशाच्या रुपात आपल्याला हा संकल्प केला पाहिजे की अशा प्रत्येक प्रवृत्तीला वाढू देणार नाही. हे देशाचे सामूहिक दायित्व आहे. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात आज संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात रंगलेला आहे, त्यावेळी असेही काही झाले आहे ज्याकडे देशाचे लक्ष वेधण्याची माझी इच्छा आहे. आपल्या वीर स्वातंत्र्य सेनानींचा अवमान करण्याचा, या पवित्र प्रसंगाला अपवित्र करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशा लोकांची मानसिकता देशाने देखील लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्याला माहीत आहे कधी कधी एखादा रुग्ण आपल्या प्रदीर्घ आजारावरील उपचारांमुळे थकून जातो, निराश होतो, चांगल्या चांगल्या डॉक्टरांकडून सल्ला घेतल्यानंतरही त्याला गुण येत नाही, मग तो कितीही शिकलासवरलेला असला तरीही अंधविश्वासाच्या दिशेला वळू लागतो. अंगारे-धुपारे करू लागतो, जादू-टोण्यावर, काळ्या जादूवर विश्वास ठेवू लागतो. अशाच प्रकारे आपल्या देशातही काही लोक आहे जे नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत, निराशेच्या गर्तेत बुडालेले आहेत, सरकारच्या विरोधात वारंवार खोटे बोलूनही जनताजनार्दन अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. अशा प्रकारे हताश झालेले हे लोक देखील काळ्या जादूच्या दिशेने वळताना पाहायला मिळत आहे. आताच आम्ही 5 ऑगस्टला पाहिले आहे की कशा प्रकारे काळी जादू पसरवण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला. या लोकांना असे वाटते की काळे कपडे घालून, त्यांच्या निराशेचा, वैफल्याचा काळ समाप्त होईल. पण त्यांना हे माहीत नाही की त्यांनी कितीही जादू-टोणे केले, कितीही काळी जादू केली, अंधविश्वासाचा आधार घेतला तरीही जनता पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि मी तर हे सुद्धा सांगेन की त्यांनी काळ्या जादूच्या या फेऱ्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अपमान करू नये, तिरंग्याचा अपमान करू नये.

मित्रांनो, काही राजकीय पक्षांच्या स्वार्थी राजकारणापेक्षा वेगळे राहून, आमचे सरकार सबका साथ-सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र घेऊन काम करत राहील. मला पूर्ण विश्वास आहे की विकासासाठी सकारात्मक विश्वासाची उर्जा याच प्रकारे निर्माण होत राहील. पुन्हा एकदा हरयाणाच्या कोटी-कोटी सहकाऱ्यांना, शेतकरी आणि पशुपालक बंधू-भगिनींना शुभेच्छा. उद्या रक्षाबंधनाचा पवित्र सण देखील आहे. भाऊ- बहिणीच्या  प्रेमाचे प्रतीक असलेल्या या सणाच्या  निमित्ताने प्रत्येक भाऊ आपल्या कर्तव्याचे पालन करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो. उद्या एक नागरिक म्हणून देखील आपल्या देशाविषयीच्या आपल्या कर्तव्याचे पालन करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करायचा आहे. हीच कामना करून मी माझ्या भाषणाचा समारोप करतो. खूप खूप धन्यवाद.  

S.Tupe/S.Kulkarni/Vinayak/Shailesh/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1851086) Visitor Counter : 127