पंतप्रधान कार्यालय
सुरत तिरंगा यात्रेला पंतप्रधानांनी केले संबोधित
"आपला तिरंगा हा आपल्या भूतकाळातील अभिमानाचे, वर्तमानातील वचनबद्धतेचे आणि भविष्यातील स्वप्नांचे प्रतिबिंब"
"आपला राष्ट्रध्वज हा देशाच्या वस्त्रोद्योगाचे, देशाच्या खादीचे आणि आपल्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक "
"आपला तिरंगा म्हणजे भारताच्या एकतेचे, भारताच्या अखंडतेचे आणि भारताच्या विविधतेचे प्रतीक"
"लोकसहभागाच्या या मोहिमा करतील नवीन भारताचा पाया मजबूत"
प्रविष्टि तिथि:
10 AUG 2022 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमधील तिरंगा यात्रेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. काही दिवसातच भारताच्या स्वातंत्र्याची 75 वी वर्षपूर्ती असल्याचे सांगत सर्वांना अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांनी भाषणाचा प्रारंभ केला. भारताच्या कानाकोपऱ्यात तिरंगा फडकवत आपण सर्वजण या ऐतिहासिक स्वातंत्र्यदिनाची तयारी करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
गुजरातचा प्रत्येक कोपरा उत्साहाने भरलेला आहे आणि सुरतने त्याच्या वैभवात भर टाकली आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. ते म्हणाले, “संपूर्ण देशाचे लक्ष आज सुरतकडे लागले आहे. सुरतच्या तिरंगा यात्रेत एक प्रकारे मिनी इंडिया पाहायला मिळत आहे. समाजातील सर्व स्तरातील लोक यात सामील आहेत.” पंतप्रधान पुढे म्हणाले की, सुरतने तिरंग्याची खरी एकत्रित शक्ती दाखवली आहे. सुरतने आपल्या व्यवसाय आणि उद्योगांमुळे जगावर ठसा उमटवला असला तरी आज तिरंगा यात्रा संपूर्ण जगाचे लक्ष वेधणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी तिरंगा यात्रेत स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास साकारणाऱ्या सुरतच्या जनतेचे कौतुक केले. ते म्हणाले, "कोणी कपडे विकणारा, कोणी दुकानदार आहे, कोणी यंत्रमाग कारागीर आहे, कोणी शिंपी आणि भरतकाम कारागीर तर कोणी वाहतुकीशी निगडित आहे, सर्वांची एक गुंफण आहे." भव्य सोहोळा साकारणाऱ्या सुरतच्या संपूर्ण वस्त्रोद्योगाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. तिरंगा मोहिमेतील या जनभागीदारीसाठी (लोकसहभाग) पंतप्रधानांनी सर्वांचे विशेषत: संवर प्रसाद बुधिया आणि हा उपक्रम सुरू करणाऱ्या 'साकेत - सेवा हेच ध्येय' गटाशी संबंधित स्वयंसेवकांचे अभिनंदन केले. तसेच या उपक्रमाला पाठबळ देणाऱ्या खासदार सी. आर. पाटील जी यांचे पंतप्रधानांनी आभार मानले.
पंतप्रधान म्हणाले, “आपला राष्ट्रध्वज हा देशातील वस्त्रोद्योग, देशाची खादी आणि आपल्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे.” ते म्हणाले की सुरत शहराने नेहमीच या क्षेत्रात भारताला स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक पाया तयार केला आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, गुजरात राज्याने बापूंच्या रुपात स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले आहे आणि स्वातंत्र्यानंतर एक भारत, श्रेष्ठ भारत संकल्पनेचा पाया रचणारे लोहपुरुष सरदार पटेलांसारखे अनेक नेते या राज्याने निर्माण केले आहेत. बार्डोली चळवळ आणि दांडी यात्रा यांनी दिलेल्या संदेशांमुळे संपूर्ण देश एकजूट झाला.
भारताचा तिरंगा म्हणजे केवळ तीन रंग आहेत असे नव्हे तर हा ध्वज म्हणजे आपल्या भूतकाळाचा अभिमान, वर्तमानकाळाशी असलेली कटिबद्धता तसेच भविष्यातील स्वप्नांचे प्रतिबिंब आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. आपला तिरंगा म्हणजे भारताची एकता, अखंडता आणि भारतातील विविधता यांचे प्रतीक आहे असे पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी या तिरंग्यामध्ये आपल्या देशाचे भवितव्य, देशासाठीची स्वप्ने पहिली आणि कोणत्याही परिस्थितीत हा ध्वज खाली झुकू नये यासाठी जिवाचे रान केले. स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे झाल्यावर आपण नव्या भारताचा प्रवास सुरु करत आहोत. अशावेळी, तिरंगा झेंडा पुन्हा एकदा भारताचे ऐक्य आणि जाणिवांचे प्रतिनिधित्व करत आहे अशी टिप्पणी त्यांनी केली.
सध्या देशभरात काढल्या जात असलेल्या तिरंगा यात्रा, हर घर तिरंगा अभियानाचे सामर्थ्य आणि एकनिष्ठता यांचे प्रतिबिंब ठरत आहेत याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “13 ते 15 ऑगस्ट या काळात भारतातील प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा फडकाविला जाईल.समाजाच्या प्रत्येक वर्गातील, प्रत्येक जात-पंथामधील लोक या कार्यक्रमात केवळ भारतीय या एकाच ओळखीसह सहभागी होत आहेत. हीच भारताच्या कर्तव्यदक्ष नागरिकांची खरी ओळख आहे.”
भारतमातेच्या अपत्याची हीच ओळख आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. हर घर तिरंगा अभियानाला पाठींबा देण्यात देशातील स्त्री-पुरुष, युवक, वृध्द असे सर्व प्रकारचे लोक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत याबद्दल त्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले. तसेच या हर घर तिरंगा अभियानामुळे,अनेक गरीब लोक, विणकर आणि हातमाग कामगार यांना अतिरिक्त उत्पन्न देखील मिळू लागले आहे त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात आपल्या निर्धारांना नवी उर्जा देणाऱ्या अश्या घटनांचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी त्यांचे भाषण संपविले. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, “लोकसहभागावर आधारित अशा अभियानांमुळे नव्या भारताचा पाया अधिक मजबूत होईल.”
S.Kulkarni/S.Chitnis/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1850677)
आगंतुक पटल : 230
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam