अर्थ मंत्रालय
163 वा आयकर दिवस: राष्ट्र उभारणीच्या दिशेने प्रवास
Posted On:
24 JUL 2022 6:29PM by PIB Mumbai
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आणि त्याच्या भारतातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी आज 163 वा आयकर दिवस साजरा केला. या समारंभाचा भाग म्हणून सीबीडीटीच्या क्षेत्रीय आस्थापनांनी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले होते. करदात्यांकडून राष्ट्रासाठी दिल्या जाणाऱ्या योगदानाचा सन्मान करण्याचे कार्यक्रम, करदात्यांचं अभिनंदन करण्यासाठी कार्यक्रम, सरकारी उच्च माध्यमिक शाळांमधील संगणकासारख्या साधन सामुग्रीची श्रेणी सुधारण्यासाठी योगदान देणे, कर्मचारी योगदान विभागाकडून अनाथाश्रम/वृद्धाश्रमांना ऐच्छिक देणगी, रक्तदान शिबिरांचे आयोजन, आरोग्य तपासणी आणि कोविड-लसीकरण शिबिरांचे आयोजन, वृक्ष लागवड आणि स्वच्छता मोहीम या आणि अन्य कार्यक्रमांचा यात समावेश होता. याशिवाय, हाफ मॅरेथॉन, सायक्लोथाॅन, मुले आणि तरुण प्रौढ व्यक्तींना कर साक्षरतेवरील बोर्ड गेमचे वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम, व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन यासारखे अन्य कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले.
आयकर विभागाला दिलेल्या संदेशात केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की गेल्या काही वर्षांत सरकारने केलेल्या सुधारणांमुळे विश्वासावर आधारित कर प्रणाली सुनिश्चित झाली आहे. अर्थमंत्र्यांनी नमूद केले की कर दात्यांनी देखील हा विश्वासावर आधारित दृष्टीकोन सिध्द केला असून कर संकलनामधील सुधारणा आणि कर परतावा भरण्याच्या संख्येतील वाढ यामधून हे सिध्द होत आहे. धोरणात्मक सुधारणांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल आणि एक कर-दाता केंद्रित संस्था म्हणून स्वतःला यशस्वीपणे पुनर्रचित केल्याबद्दल सीतारामन यांनी आयकर विभागाचे कौतुक केले. गेल्या आर्थिक वर्षात 14 लाख कोटी रुपयांहून जास्त, आतापर्यंतचा सर्वात जास्त महसूल गोळा केल्याबद्दल अर्थ मंत्र्यांनी आयकर विभागाचे कौतुक केले, तसेच चालू आर्थिक वर्षात देखील विभाग हीच गती कायम ठेवेल अशी आशा व्यक्त केली.
केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत किशनराव कराड यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे की देशाची वृद्धी आणि विकासामध्ये आयकर विभागाने महत्वाची भूमिका बजावली आहे. कर दाते आणि अन्य भागधारकांबरोबरचे आपले संबंध नव्याने परिभाषित करण्याची क्षमता असलेल्या अनेक दूरगामी सुधारणा लागू केल्याबद्दल त्यांनी विभागाचे कौतुक केले आहे.
आयकर दिवस साजरा करून विभागीय कर्मचार्यांना राष्ट्र सेवेसाठी आपण आतापर्यंत केलेल्या प्रवासाकडे मागे वळून पाहण्याची आणि देशाच्या विकासामध्ये योगदान देण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करण्याची संधी मिळाली.
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844432)
Visitor Counter : 442