पंतप्रधान कार्यालय
जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो आबे यांच्या दुर्दैवी निधनाने धक्का बसल्याचे सांगत पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
शिन्झो आबे यांच्याविषयीचा अतीव आदर व्यक्त करण्यासाठी 9 जुलै 2022 रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Posted On:
08 JUL 2022 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2022
जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो आबे यांच्या दुर्दैवी निधनाने धक्का बसल्याचे सांगत पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले आहे. शिन्झो आबे यांच्याशी असलेला स्नेहबंध आणि मैत्री पंतप्रधानांनी अधोरेखित केली आणि त्यांनी भारत-जपान संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक सहकार्याच्या स्तरावर नेण्यासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानावर भाष्य केले. शिन्झो आबे यांच्याविषयी असलेला आदर व्यक्त करण्यासाठी मोदी यांनी 9 जुलै 2022 रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पंतप्रधानांनी टोक्योमध्ये त्यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीचे छायाचित्रही सामायिक केले.
ट्विटच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
“माझ्या सर्वात प्रिय मित्रांपैकी एक शिन्झो आबे यांच्या दुर्दैवी निधनाने मला धक्का बसला असून झालेले दुःख शब्दांपलीकडे आहे.ते एक जागतिक पातळीवरचे उत्तुंग राजकारणी व्यक्तिमत्व , एक उत्कृष्ट नेता आणि एक उल्लेखनीय प्रशासक होते. जपान आणि जगाला एका उत्तम स्तरावर पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले.''
माझा आबे यांच्यासोबतचा स्नेहबंध अनेक वर्षांचा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना माझी त्यांच्याशी ओळख झाली होती आणि मी पंतप्रधान झाल्यानंतरही आमची मैत्री कायम राहिली.अर्थव्यवस्थेबद्दल आणि जागतिक घडामोडींबद्दल त्यांना असलेल्या तीक्ष्ण अंतर्दृष्टीने माझ्यावर नेहमीच सखोल छाप पाडली.''
“माझ्या अलीकडच्या जपान दौऱ्यादरम्यान, मला आबे यांना पुन्हा भेटण्याची आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. त्यावेळी नेहमीप्रमाणेच ते हास्यविनोद करत मनमोकळेपणाने बोलत होते आणि बारकाईने ऐकत होते. ही आमची शेवटची भेट असेल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांचे कुटुंबीय आणि जपानी लोकांप्रती माझ्या मनापासून संवेदना.''
“भारत-जपान संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक सहकार्याच्या स्तरावर नेण्यासाठी आबे यांनी मोठे योगदान दिले.आज संपूर्ण भारत जपानसोबत शोकसागरात बुडाला आहे आणि या कठीण प्रसंगी आम्ही आमच्या जपानी बंधू-भगिनींसोबत एकजुटीने उभे आहोत.”
माजी पंतप्रधान शिन्झो आबे यांच्याबद्दल मनापासून आदर व्यक्त करण्यासाठी, 9 जुलै 2022 रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येईल."
“माझा प्रिय मित्र शिन्झो आबेसोबतच्या माझ्या सर्वात अलीकडील टोक्योमधील भेटीतील एक छायाचित्र सामायिक करत आहे. भारत-जपान संबंध बळकट करण्यासाठी नेहमीच उत्साही असलेल्या त्यांनी नुकतेच जपान-भारत संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले होते.''
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840151)
Visitor Counter : 185
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam