महिला आणि बालविकास मंत्रालय
महिला आणि बालविकास मंत्रालयाने ‘मिशन वात्सल्य’ योजनेसाठी मार्गदर्शक तत्वे केली जारी
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2022 4:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2022
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे बाल कल्याण आणि पुनर्वसनाच्या उद्देशाने, बाल संरक्षण सेवा योजना (सीपीएस) या नावाने पूर्वी राबवली जाणारी योजना 2009-10 पासून ‘मिशन वात्सल्य’ या नावाने राबवली जात आहे. भारतातील प्रत्येक बालकाचे बालपण आरोग्यसंपन्न आणि सुखमय करण्याचे तसेच आपल्यातील पूर्ण क्षमता शोधण्यास ते सक्षम होतील, अशा संधी सुनिश्चित करणे हे मिशन वात्सल्य योजनेचे उद्दिष्ट आहे. तसेच त्यांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी सहाय्य करणे, मुलांच्या विकासासाठी संवेदनशील, सहाय्यक आणि पोषक परिसंस्था तयार करणे तसेच बालगुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी देखील या अभियाना अंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सहाय्य केले जाते. त्याशिवाय शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठीही मिशन वात्सल्य अंतर्गत उपक्रम राबवले जातात. मिशन वात्सल्य योजना संकटात किंवा अडचणीत असलेल्या बालकांना कौटुंबिक आधार देत अशा मुलांची काळजी घेण्याला चालना देत असून मुलांना संस्थाच्या माध्यमातून मदत करणे हा अखेरचा उपाय मानण्याच्या तत्वावर काम करते.
मिशन वात्सल्य योजनेत पुढील घटक समाविष्ट आहेत-वैधानिक संस्थांच्या कार्यशैलीत सुधारणा; सेवा देण्याच्या पद्धती अधिक प्रभावी करणे ; बालकांची संस्थात्मक काळजी/सेवा यांचा दर्जा सुधारणे; बालकांची समुदायांच्या आधाराने गैरसंस्थात्मक काळजी घेण्यास उत्तेजन देणे; गरजू बालकांपर्येत आपत्कालीन सेवा पोहचवणे; प्रशिक्षण आणि क्षमता उभारणी.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मंत्रालयाशी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मिशन वात्सल्य ही योजना केंद्र पुरस्कृत योजना म्हणून अमलात आणली जाणार असून, त्यात केंद्र सरकार आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्यातील खर्चाचा वाटा पूर्वनिर्धारित गुणोत्तरावर आधारित असेल.
मिशन वात्सल्य योजनेची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे मंत्रालयाने जारी केली असून या मार्गदर्शक तत्वांच्या आर्थिक निकषांच्या अनुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आपापले आर्थिक प्रस्ताव तयार करण्यास आणि वर्ष 2022-23 साठी मिशन वात्सल्य अंतर्गत योजना तयार करण्यास सांगण्यात आले आहे. 1 एप्रिल 2022 पासून मिशन वात्सल्य योजनेचे निकष लागू असतील.
मिशन वात्सल्य योजनेची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे https://wcd.nic.in/acts/guidelines-mission-vatsalya यावर उपलब्ध आहेत.
R.Aghor /U.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1839859)
आगंतुक पटल : 1028