पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या, 8 जुलै 2022 रोजी होणाऱ्या पहिल्या “अरुण जेटली स्मृती व्याख्याना” ला उपस्थित राहणार


पंतप्रधान यावेळी कौटिल्य आर्थिक परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींशी चर्चा देखील करणार आहेत

Posted On: 07 JUL 2022 3:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या 8 जुलै 2022 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजित केलेल्या पहिल्या अरुण जेटली स्मृती व्याख्यानाला उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.

पहिल्या अरुण जेटली स्मृती व्याख्यानामध्ये सिंगापूर सरकारचे वरिष्ठ मंत्री थर्मन षण्मुगरत्नम यांचे समावेशकतेच्या माध्यमातून विकास, विकासाच्या माध्यमातून समावेशकता या विषयावरील बीजभाषण होणार आहे. प्रस्तुत व्याख्यानानंतर ओईसीडी अर्थात आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेचे सरचिटणीस मथियास कॉर्मन आणि कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक अरविंद पनगरिया यांच्यात गटचर्चा होईल.

अरुण जेटली यांनी देशाप्रती दिलेल्या अमुल्य योगदानाच्या सन्मानार्थ केंद्रीय अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाने या पहिल्या अरुण जेटली स्मृती व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

यावेळी, पंतप्रधान केईसी अर्थात कौटिल्य आर्थिक परिषदेमध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींशी चर्चा देखील करणार आहेत. ही परिषद 8 ते 10 जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील अॅनी क्रुगर, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे निकोलस स्टर्न, हार्वर्ड केनेडी स्कूलचे रॉबर्ट लॉरेन्स, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक जॉन लिपस्काय, जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनेद अहमद आणि इतर सुप्रसिद्ध अर्थतज्ञांची भेट घेणार आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या पाठबळासह, आर्थिक विकास संस्थेने कौटिल्य आर्थिक परिषदेचे आयोजन केले आहे.

 

 

 

 

Jaydevi PS /S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1839842) Visitor Counter : 200