युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

धरमशाला इथे बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिलेमध्ये अनुराग सिंह ठाकूर सहभागी झाले, हिमाचल प्रदेश आणि भारतात बुद्धिबळ लोकप्रिय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही

Posted On: 22 JUN 2022 4:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जून 2022

 

पहिली बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिले बुधवारी सकाळी  धरमशाला इथे पोहचली.  यावेळी आयोजित समारंभात  केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर हे प्रमुख पाहुणे होते. रविवारी 19 जून रोजी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐतिहासिक मशाल रिलेचा शुभारंभ करण्यात आला होता.

भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने  बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल भारतातील 75 शहरांमध्ये नेण्यात येणार आहे.

भारतात  बुद्धिबळ खेळाला मोठा वारसा आणि इतिहास आहे. आपण चतुरंगपासून बुद्धिबळापर्यंत  पोहचलो आहोत, असे अनुराग सिंह ठाकूर यांनी एचपीसीए येथे उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.  बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या इतिहासात प्रथमच, भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत  आहे आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यापेक्षा चांगला योगायोग कोणता असेल. बुद्धिबळ ऑलिम्पियाडदरम्यान एकूण 188 देश, 2000 हून अधिक खेळाडू आणि 1000 अधिकारी भारतात येणार आहेत. या आयोजनाबद्दल आणि युवा बुद्धिबळप्रेमींना अव्वल बुद्धिबळपटू  आणि ग्रँडमास्टर्सना भेटण्याची संधी दिल्याबद्दल मी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अभिनंदन करतो.

एचपीसीए धरमशाला इथे बुधवारी  मशाल रिले समारंभात  हिमाचल प्रदेशचे युवक सेवा आणि क्रीडा आणि  वन मंत्री राकेश पठानिया, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सरचिटणीस  भरतसिंह चौहान तसेच  क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि एआयसीएफचे अधिकारी उपस्थित होते.

एचपीसीए धरमशाला येथे आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थी,धरमशाला साई केंद्राचे  खेळाडू, नेहरू युवा केंद्र संघटनचे  स्वयंसेवक आणि हिमाचल बुद्धिबळ संघटनेच्या युवकांसह 500 जण सहभागी झाले  होते . बुद्धीबळ ग्रँडमास्टर दीप सेनगुप्ता याने ठाकूर यांना मशाल सुपूर्द केली आणि नंतर शिमला येथे नेण्यात आली.

मशाल रिले उद्‌घाटन समारंभाच्या कार्यक्रमाची आठवण सांगताना  ठाकूर  म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी  या ऐतिहासिक मशाल  रिलेचा प्रारंभ केला आणि हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्या दिवशी सुमारे 10000 लोक उपस्थित होते. आता आपल्याला ही मशाल देशाच्या कानाकोपऱ्यात न्यायची  आहे आणि हा खेळ भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री आणि क्रीडा प्रेमी या नात्याने मी हिमाचल प्रदेश आणि भारतात बुद्धिबळ खेळ लोकप्रिय करण्यासाठी कोणतीही कसर राहणार नाही याकडे लक्ष देईन .

28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत चेन्नई येथे 44 वे फिडे चेस ऑलिम्पियाड होणार आहे.

 

S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1836235) Visitor Counter : 205