शिक्षण मंत्रालय
शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करण्याची धर्मेंद्र प्रधान यांनी केली सूचना
बाल्यावसथेतील देखभाल आणि शिक्षण (ECCE) ते इयत्ता 12वी पर्यंतच्या शिक्षणात योगाला प्राधान्य देण्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी केले आवाहन
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्र्यांनी राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड - 2022 आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे केले उदघाटन
Posted On:
18 JUN 2022 7:40PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड - 2022 आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उदघाटन केले.ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.यावेळी शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार हेही उपस्थित होते.
18 ते 20 जून 2022 या कालावधीत शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले आहे . यावर्षी 26 राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि प्रादेशिक शिक्षण संस्थांच्या बहुउद्देशीय शाळांमधील सुमारे 600 विद्यार्थी राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड यात सहभागी होत आहेत.
योग मानवजातीचे दुःख हरण करण्यास आणि शारीरिक लवचिकता निर्माण करण्यास, विशेषत: कोविड नंतरच्या काळात साहाय्यकारी असल्याचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले. .राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020(NEP)यात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
क्रीडाप्रकारांना शैक्षणिक व्यवस्थेत स्थान दिल्याने खिलाडूवृत्ती अंगी बाणेल आणि विद्यार्थ्यांना शारिरीक कार्यक्षमतेला जीवनात असलेले महत्त्व समजेल, असेही ते म्हणाले.
योग हा आरोग्य, निरामयता आणि शारीरिक शिक्षण याचा अविभाज्य घटक आहे. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला योगाचे प्राचीन ज्ञान आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची सूचना केली. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असून, बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण (ECCE) ते इयत्ता 12वी स्तरापर्यंतच्या शिक्षणात योगास प्राधान्य दिले गेले पाहिजे,असे त्यांनी सांगितले. त्यांनी एनसीईआरटीला शाळा, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर योग ऑलिम्पियाड आयोजित करण्याचीही सूचना केली. प्रत्येक तालुक्यामधील शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्याने योगाचा वारसा पुढे जाईल आणि योग, जीवनशैली होण्यात साहाय्य मिळेल,असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडमध्ये राज्यांचे/केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व निवडक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. थेट तालुकास्तरावरून सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 चा एक भाग म्हणून योगाचा प्रसार करणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की,नागरिकांना देशाला एकात्मिक स्वरूपात पाहण्याची दृष्टी मिळेल,अशा शैक्षणिक पद्धतीचा प्रसार करणे हा यामागचा उद्देश आहे. योग ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांकडून आसन, प्राणायाम, क्रिया, ध्यान आदींचे प्रात्यक्षिक करून घेतले जाईल, जेणेकरून त्यांना योगाचे महत्त्व समजेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
***
S.Kakade/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1835135)
Visitor Counter : 329