आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांची राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा; “हर घर दस्तक 2.0” अभियानाची सद्यस्थिती तसेच प्रगती यांचा घेतला आढावा
शालेय विद्यार्थ्यांचे अधिकाधिक प्रमाणात कोविड प्रतिबंधक लसीकरण केले जाईल तसेच ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा दिल्या जातील यावर लक्ष केंद्रित करण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे आवाहन
कोविड आजार अजून संपलेला नाही; काही राज्यांमध्ये कोविड बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, सावध राहणे तसेच कोविड बाबतीत योग्य वर्तणुकीचे न विसरता पालन करणे आवश्यक : डॉ. मनसुख मांडवीय
Posted On:
13 JUN 2022 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13जून 2022
“कोविड आजार अजून पूर्णपणे संपलेला नाही. काही राज्यांमध्ये कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे अहवाल मिळत आहेत.अशा वेळी सावध राहणे आवश्यक आहे तसेच संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे आणि शारीरिक अंतर राखणे यासारख्या कोविड बाबतच्या योग्य वर्तणुकीचे पालन करणे आवश्यक आहे,” या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी भर दिला आहे. हर घर दस्तक 2.0 या लसीकरण उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
देशातील काही जिल्हे तसेच राज्यांमध्ये वाढता कोविड संसर्ग आणि कोविड संसर्ग तपासणीच्या चाचण्यांच्या प्रमाणात झालेली घट हे मुद्दे अधोरेखित करत डॉ.मांडवीय म्हणाले की, वाढीव तसेच योग्य वेळी केलेल्या तपासणीमुळे कोविड बाधित रुग्ण लवकर ओळखता येतील आणि त्यामुळे समाजात होणारा या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. विषाणू मध्ये होणारे नवे उत्परिवर्तन अथवा प्रजाती शोधण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारांना केले. चाचणी,मागोवा,उपचार,लसीकरण आणि कोविडच्या बाबतीत योग्य ठरणाऱ्या वर्तणुकीचे पालन या पंचसूत्री धोरणाची अंमलबजावणी यापुढेही सुरूच ठेवावी आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारांनी त्यावर नियमितपणे लक्ष ठेवावे असे त्यांनी सांगितले.

या आजाराच्या दृष्टीने अधिक असुरक्षित वयोगटातील लोकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्याच्या महत्त्वावर जोर देत त्यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांना, हर घर दस्तक 2.0 या एक महिना कालावधीसाठी 1 जून पासून सुरू करण्यात आलेल्या विशेष अभियानाच्या स्थिती आणि प्रगतीचा वैयक्तिकरित्या आढावा घेण्यास सांगितले. ते म्हणाले, “आपण कोविड प्रतिबंधक लसीच्या पहिल्या तसेच दुसऱ्या मात्रेसाठी पात्र ठरणाऱ्या 12 ते 17 या वयोगटातील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी आपले प्रयत्न अधिक वेगवान केले पाहिजेत, जेणेकरून हे लाभार्थी लसीच्या संरक्षक कवचासह शाळेत उपस्थित राहू शकतील.” राज्य सरकारांनी शाळाआधारित (सरकारी/खासगी/ मदरसे, डे केयर सारख्या अनौपचारिक शाळा) मोहिमांच्या माध्यमातून 12 ते 17 या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी राज्यांना दिले. याबरोबरच त्यांनी, शाळेत न जाणाऱ्या मुलांच्या लक्षित लसीकरणासाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रयत्न करण्यास सांगितले.
60 वर्षांहून अधिक वय असलेल्या गटातील नागरिक असुरक्षित वर्गात मोडतात आणि वर्धक मात्रा देऊन त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. “आपल्या आरोग्य सुविधा क्षेत्रातील कर्मचारी घराघरांत जाऊन या असुरक्षित गटातील नागरिकांना खबरदारीची मात्रा दिली जाईल याची खात्री करून घेत आहेत.” ते म्हणाले. राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांना वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये दिल्या जात असलेल्या वर्धक मात्रेच्या कामाचा आढावा घेण्यास देखील सांगण्यात आले आहे. “देशभरात कोविड प्रतिबंधक लसीच्या पुरेशा मात्रा उपलब्ध आहेत. हर घर दस्तक अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिकाधिक लाभार्थ्यांचे लसीकरण होईल याची सुनिश्चिती आपण करून घेतली पाहिजे,” या मुद्यावर त्यांनी अधिक भर दिला.
कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा कोणत्याही परिस्थितीत वाया जाणार नाहीत याची सुनिश्चिती करून घेण्याचे कडक निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी देखील या बैठकीत बोलताना, राज्य सरकारांनी हर घर दस्तक 2.0 अभियानाच्या माध्यमातून नागरिकांचे अधिक वेगाने लसीकरण करावे या मुद्यावर भर दिला.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांच्यासह गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, हरियाणा, झारखंड,मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचे आरोग्यमंत्री आज झालेल्या बैठकीला उपस्थित होते.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1833596)
Visitor Counter : 214