कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
भारतभरात 200 ठिकाणी आज 13 जून रोजी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आजच्या मेळाव्यात 36 हून अधिक क्षेत्रांतील 500 पेक्षा जास्त प्रकारच्या विविध व्यवसायांचे चालक आणि एक हजाराहून जास्त कंपन्या सहभागी होणार
Posted On:
13 JUN 2022 9:13AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 13 जून 2022
देशभरातील युवकांना कॉर्पोरेट विश्वातील प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यापुढे जाऊन त्यांना रोजगार मिळविण्याची संधी देणे या उद्देशाने केंद्रीय कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्रालय आता दर महिन्याला पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन करणार आहे. भारतातील 200 हून अधिक ठिकाणी आज 13 जून 2022 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात या महिन्यातील मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात 36 पेक्षा जास्त क्षेत्रांतील एक हजाराहून अधिक कंपन्या सहभागी होत असून त्यांच्यामार्फत, उमेदवारांना कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणुकीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. इयत्ता 5 वी ते 12 वी यापैकी कोणत्याही इयत्तेतून उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र, आयटीआय पदविका प्रमाणपत्र आणि पदवी प्रमाणपत्र यापैकी कोणतीही पात्रता असलेल्या व्यक्तींना या मेळाव्यात विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून मुलाखत किंवा रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी अर्ज करता येईल. इच्छुक उमेदवारांना वेल्डर, इलेक्ट्रिशियन, हाउसकीपर,ब्युटीशियन, मेकॅनिक या आणि इतर पदांसह 500 हून अधिक प्रकारच्या व्यवसायांतून पर्याय निवडण्याची संधी देण्यात येईल.
मेळावे आयोजित करण्यात आलेल्या शहरांच्या परिसरातील शिकाऊ उमेदवारांची भर्ती करण्यास प्रोत्साहन देणे तसेच कंपन्यांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कौशल्यसंचांच्या माध्यमातून या उमेदवारांमधील क्षमता ओळखणे तसेच विकसित करणे यात मदत करणे आणि त्यायोगे या कंपन्यांना अधिक मूल्य प्राप्त करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या मेळाव्यातून निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण संपल्यानंतर राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण तसेच प्रशिक्षण मंडळाकडून मान्यता मिळालेले शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात येईल. या प्रमाणपत्रामुळे शिकाऊ उमेदवारांना उद्योग जगतात अधिकृत ओळख प्राप्त होईल.
पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्यात सहभागी होणाऱ्या संघटनांना सामायिक मंचावर सक्षम शिकाऊ उमेदवारांना भेटण्याची आणि याच ठिकाणी योग्य उमेदवारांची निवड करण्याची संधी मिळणार आहे. त्याचसोबत, किमान चार कर्मचारी जिथे कार्यरत आहेत अशा लघु उद्योगांना देखील त्यांच्यासाठी शिकाऊ उमेदवार निवडणे शक्य होईल. या संदर्भात क्रेडीट बँक संकल्पना देखील लवकरच प्रत्यक्षात साकार करण्यात येणार आहे, या संकल्पनेनुसार शिकाऊ व्यक्तींनी मिळविलेल्या विविध प्रकारच्या ज्ञान आणि कौशल्यांचा साठा करण्यात येईल जो त्यांना त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक मार्गात उपयुक्त ठरेल.
पंतप्रधान राष्ट्रीय उमेदवारी मेळाव्याबाबत मत व्यक्त करताना केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव राजेश अगरवाल म्हणाले की, एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यांना मिळालेले यश बघून आम्ही प्रत्येक महिन्यात असे मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कौशल्य विकासासाठीच्या या उपक्रमातून उमेदवार आणि आस्थापना दोघांनाही लाभ होईल अशी आशा आम्हांला वाटते आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून उमेदवारांना केवळ प्रत्यक्ष कार्यस्थळावरील अनुभव मिळविता येईल असे नाही तर त्यांना स्थलांतराच्या आव्हानाला स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीने तोंड देखील देता येईल असे ते पुढे म्हणाले.
******
ST/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1833471)
Visitor Counter : 272