पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधल्या नवसारी इथे ‘गुजरात गौरव अभियान’ मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
10 JUN 2022 11:11PM by PIB Mumbai
भारत माता की - जय,
भारत माता की - जय,
भारत माता की - जय,
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, संसदेतले माझे वरिष्ठ सहकारी आणि नवसारीचे खासदार आणि मागच्या निवडणुकीत हिंदुस्तानमध्ये सर्वात जास्त मते देऊन ज्यांना आपण विजयी केले आणि देशात नवसारीचे नाव उज्वल केले ते आपणा सर्वांचे प्रतिनिधी सीआर पाटील, केंद्रीय मंत्रिमंडळातल्या माझ्या सहकारी भगिनी दर्शना जी,केंद्रातले मंत्रीगण,खासदार आणि आमदार, राज्य सरकारचे सर्व मंत्रीगण आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित माझ्या प्रिय बंधू-भगिनी !
आज गुजरात गौरव अभियानात मला एका विशेष बाबीचा अभिमान वाटत आहे. मी इतकी वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केले मात्र आदिवासी भागात इतक्या मोठ्या कार्यक्रमाचा माझा योग कधी आला नाही. आज मला या या गोष्टीचा अभिमान आहे की गुजरात सोडल्यानंतर ज्या-ज्या लोकांनी गुजरातची जबाबदारी सांभाळण्याचे दायित्व निभावले आणि आज भूपेंद्र भाई आणि सीआर ही जोडी ज्या उत्साहाने नवा विश्वास जागवत आहे त्याचाच परिणाम म्हणजे आज माझ्यासमोर आज असलेला पाच लाखांचा इतका मोठा जन समुदाय. मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या कारकिर्दीत मी ज्या गोष्टी करू शकलो नाही त्या आज माझे सहकारी करत आहेत, आपला स्नेह अधिकच वृद्धींगत होत आहे. म्हणूनच मला अधिकच अभिमान आहे. नवसारीच्या या पवित्र भूमीवरून मी उनाई माता मंदिरासमोर नतमस्तक होऊन नमन करतो ! आदिवासी सामर्थ्य आणि संकल्पांच्या या भूमीवर गुजरात गौरव अभियानाचा भाग होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. गुजरातचा गौरव म्हणजे गेल्या दोन दशकात गुजरातचा जो वेगवान विकास झाला आहे, सर्वांचा विकास आहे आणि या विकासातून निर्माण झालेल्या नव-नव्या आकांक्षा आहेत. हीच गौरवशाली परंपरा दुहेरी इंजिनचे सरकार प्रामाणिकपणे पुढे नेत आहे. आज 3 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्याची संधी प्राप्त झाली. या पवित्र कार्यात सहभागी होण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल भूपेंद्र भाई आणि राज्य सरकारचा मी आभारी आहे. हे सर्व प्रकल्प नवसारी, तापी, सूरत, वलसाड सह दक्षिण गुजरातमधल्या कोट्यवधी लोकांचे जीवन सुखकर करतील. वीज, पाणी,रस्ते,आरोग्य,शिक्षण,प्रत्येक प्रकारची कनेक्टिविटी, प्रदान करणारे हे प्रकल्प,आणि तेही विशेष करून आपल्या आदिवासी भागात असतील तेव्हा त्या सुविधा, रोजगाराच्या नव्या संधीशी जोडतील. या सर्व विकास योजनांसाठी या भागातल्या माझ्या सर्व बंधू-भगिनींना आणि संपूर्ण गुजरातला मी खूप-खूप शुभेच्छा देतो !
बंधू-भगिनीनो,
8 वर्षांपूर्वी आपण अनेक आशीर्वाद देऊन प्रचंड आशा-आकांक्षासह राष्ट्र सेवेची आपली भूमिका विस्तारण्यासाठी मला दिल्लीला पाठवले.गेल्या 8 वर्षात विकासाची स्वप्ने आणि आकांक्षाशी कोट्यवधी नवे लोक, नवी क्षेत्रे जोडण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. यापूर्वीच्या काळात आपल्या गरीब,दलित,वंचित, मागास,आदिवासी, महिला वर्गाचे अवघे जीवन मुलभूत गरजा पूर्ण करण्यामधेच खर्ची पडत होते. स्वातंत्र्यानंतर जे सर्वात दीर्घ काळ सत्तेवर राहिले त्यांनी विकासाला प्राधान्य दिले नाही. जे क्षेत्र, ज्या वर्गाला याची जास्त गरज होती तिथे त्यांनी विकास केला नाही कारण त्यासाठी जास्त मेहनत लागते. पक्क्या रस्त्यापासून सर्वात वंचित असलेली जी गावे होती ती आपल्या आदिवासी क्षेत्रातली होती. गेल्या 8 वर्षात ज्यांना पक्की घरे, वीज,शौचालय आणि गॅस जोडणी मिळाली त्यामध्ये बहुतांश माझ्या आदिवासी बंधू-भगिनी, मागास कुटुंबातले लोक होते. पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून सर्वात मोठ्या प्रमाणात वंचित आमची गावे होती, आमचा गरीब वर्ग होता, आमच्या आदिवासी बंधू-भगिनी होत्या. लसीकरण अभियान सुरु झाले की गाव,गरीब आणि आदिवासी क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्षे लागत असत. शहरात तर पोहोचत असे. दूरचित्रवाणी,वर्तमानपत्रांमध्ये जयघोषही होत असे. मात्र दुर्गम जंगले त्यापासून वंचित राहत असत.गुजरातच्या बांधवानी मला जरा सांगा, आपले लसीकरण झाले का? लसीकरण झाले त्यांनी हात उंच करा,सर्वांचे लसीकरण मोफत झाले की नाही ? पैसे द्यावे लागले का ? दूरवरच्या जंगलातल्या भागामधल्या लोकांची चिंता ही आमच्या संस्कारातच आहे.
मित्रहो,
गाव आणि आदिवासी भाग बँकिंग सेवांपासून सर्वात जास्त वंचित होते. गेल्या 8 वर्षात ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन वाटचाल करताना आमच्या सरकारने गरिबांना मुलभूत सुविधा पुरवण्यावर, गरीब कल्याणावर सर्वात जास्त भर दिला आहे.
मित्रहो,
गरिब सबलीकरणासाठी आता आमच्या सरकारने शंभर टक्के सशक्तीकरण अभियान सुरु केले आहे. कोणताही गरीब, कोणताही आदिवासी, त्यांच्या तयार करण्यात आलेल्या योजनेपासून वंचित राहू नये, त्याला त्या योजनांचा लाभ खात्रीने मिळावा या दिशेने आमचे सरकार वेगाने काम करत आहे.
मित्रहो,
इथे मंचावर येण्यासाठी मला थोडा उशीर झाला कारण काही वेळापूर्वी मी आपल्या या भागातल्या आदिवासी बंधू-भगिनींकडून त्यांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी ऐकत होतो.त्यांची विचारपूस करत होतो. सरकारच्या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांना त्याचा काय लाभ झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. जनता जनार्दनाशी अशा प्रकारचा जेव्हा संपर्क होतो तेव्हा विकासासाठी तितकेच पाठबळ मिळते. गुजरातचे दुहेरी इंजिन सरकार, शंभर टक्के सबलीकरण अभियानासाठी संपूर्ण ताकदीने कार्य करत आहे. भूपेंद्र भाई, सीआर पाटील आणि त्यांच्या चमूला मी खूप-खूप शुभेच्छा देतो.
आज बऱ्याच काळानंतर चिखली इथे आलो आहे तर मागच्या आठवणी येणे स्वाभाविकच आहे. आपल्या समवेत माझा अनेक वर्षांपासूनचा स्नेह आहे. पूर्वीच्या काळात आपल्याकडे वाहतुकीची साधने नव्हती,बसमधून उतरून खांद्यावर गाठोडे घेऊन येत.इथे अनेक कुटुंबे,अनेक गावे, किती वर्षे आपणा समवेत राहिलो मला स्मरतही नाही, कधीही उपाशी राहण्याची वेळ माझ्यावर आली नाही. हे प्रेम, हा आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. आदिवासी बांधवांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.त्यापेक्षा जास्त मला त्यांच्याकडून शिकता आले. स्वच्छता, शिस्त, आपण डांग जिल्ह्यात जाता, आदिवासी भागात जाता तेव्हा सकाळ असो,संध्याकाळ असो,सर्व एका रांगेत चालतात, एका मागोमाग एक. एका पाठोपाठ एक चालतात. अतिशय विचारपूर्वक त्यांची जीवनशैली आहे. आज आदिवासी समाज एक सामुदायिक जीवन,आदर्श आत्मसात करणारा, पर्यावरणाचे रक्षण करणारा असा आपला समाज आहे. आज इथे 3 कोटीच्या योजना, मला आठवतेय एक काळ होता, मागच्या काळात गुजरातचे एक असे मुख्यमंत्री होते, आदिवासी भागातले होते, त्यांच्या स्वतःच्या गावात पाण्याची टाकी नव्हती. हात पंप लावले तेही कोरडे पडत, त्यांच्या वायसरला भेगा पडत,हे सर्वाना माहित आहे. गुजरातने दायित्व घेतले आणि त्या गावात टाकी बसवली. एक जमाना असा होता, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी गुजरातमध्ये, जामनगर मध्ये पाण्याची एक टाकी बसवली.त्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केले, वर्तमानपत्रात पहिल्या पानावर मोठी –मोठी छायाचित्रे आली की मुख्यमंत्र्यांनी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केले. असे दिवस पूर्वी गुजरातने पाहिले आहेत. आज मला अभिमान आहे की आदिवासी भागात मी 3 हजार कोटी रुपयांच्या कामाचे उद्घाटन करत आहे. आपल्याकडे कोणतेही काम घेतले की लोक म्हणू लागतात की निवडणूक आली म्हणून काम होत आहे. आमच्या कार्यकाळात असा एखादा आठवडा तरी शोधून दाखवा हे माझे आव्हान आहे. सरकारमध्ये माझी सुमारे 22-23 वर्षे झाली. एखादा तरी आठवडा शोधून दाखवा ज्यामध्ये विकासाचे काम झाले नाही. असा एकही आठवडा सापडणार नाही. मात्र केवळ चुकाच शोधणाऱ्याना असे वाटते की निवडणुका आल्या आहेत म्हणून हे होत आहे. त्यामुळे मला सांगावे लागत आहे की, 2018 मध्ये जेव्हा या वाड्यावस्त्यांच्या भागाला पाणी देण्याची इतकी मोठी योजना घेऊन मी होतो, तेव्हा इथे कितीतरी लोक म्हणाले होते, "आता लवकरच 2019 च्या निवडणुका येत आहेत. म्हणून मोदीसाहेब इकडे येऊन गाजर दाखवत आहेत"; ते सगळे लोक खोटे ठरले, याचा आज मला अभिमान वाटतो. आणि आज पाणी पोहोचवलंच. वरून खाली पडणाऱ्या पाण्याला वर चढवायची कल्पना कोणाच्याच पचनी पडत नव्हती. सी.आर.नीही सांगितले, भूपेंद्रभाईंनीही सांगितले. तीन-चार फुटांची चढणही अवघड जाते, येथे तर दोनशे मजले उंच डोंगरावर पाणी चढवायचे आहे. आणि तळातून पाणी उपसून डोंगरमाथ्यावर न्यायचे आहे. तेही निवडणूक जिंकण्यासाठी करायचे झाले, तर 200-300 मतांसाठी कोणी इतके कष्ट घेणार नाही. त्यासाठी उमेदवार इतर कोणत्यातरी ठिकाणी कष्ट करेल. आम्ही काही निवडणूक जिंकायला नाही, तर आपल्या देशवासियांचे भले करायला निघालो आहोत. निवडणुका तर लोकच आम्हाला जिंकून देतात. लोकांच्या आशीर्वादाने आम्ही इथे बसतो. ऐर-ऐस्टोल प्रकल्प अभियांत्रिकीच्या जगात सुरेंद्रनगर जिल्ह्यात ढांकीमधले काम.. आणि मी तर अभियांत्रिकी विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयांच्या तांत्रिक विद्यार्थ्यांना सांगेन. ढांकीमध्ये आम्ही नर्मदेचे पाणी जसे चढवले आहे, तसेच येथेही ज्याप्रकारे पाणी चढवले आहे, त्याचा अभ्यास अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. प्राध्यापकांनी येथे आले पाहिजे, डोंगरांमध्ये कसे चढ-उतार, चढ-उतार आणि ते सगळे हिशोब करून इतक्या वर जायचे, मग पाण्याचा दाब इतका असेल. मग येथे पंप लावला तर पाणी इतके वर चढेल, सगळे हिशोब. असे हे एक मोठे काम झाले आहे. आणि आपल्या या भागात, मी येथे धरमपूरच्या अनेक वाड्यावस्त्यांमध्ये राहिलो आहे. सापुताऱ्यात राहिलो आहे. नेहमीचा अनुभव हाच, पाऊस भरपूर पडेल, पण पाणी मात्र आपल्या नशिबात नसायचे, सारे पाणी वाहून जायचे. आम्ही पहिल्यांदा हाच निर्णय घेतला की, आपल्या जंगलांमध्ये उंचच उंच डोंगरांवर राहणारे, लांबलांब राहणारे आपले आदिवासी बंधुभगिनी असोत की, जंगलातील वाड्यावस्त्यांमध्ये राहणारे इतर समाजांचे बांधव असोत, त्यांना पाणी मिळण्याचा हक्क आहे. पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्याचा हक्क आहे. आणि त्यांच्यासाठीच आम्ही हे इतके मोठे अभियान चालवले. ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उघडलेली मोहीम नाही. आणि हो, आम्ही म्हणत असू की, ज्याचे भूमिपूजन आम्ही करतो, त्याचे लोकार्पणही आम्हीच करतो. आणि आज हे कामही मला करता आले, हे माझे सद्भाग्यच आहे. ही एक कमिटमेंट- एक वचनबद्धता आहे, लोकांसाठी जगण्याची, लोकांसाठी जळण्याची, आम्ही राजकीय चढ-उतारांमध्ये वेळ दवडणाऱ्यांपैकी नाही. सत्तेत बसने म्हणजे केवळ आणि केवळ सेवेची संधी आहे, असे आम्ही मानतो. जनताजनार्दनाचे हित करण्याचा विचार करतो. कोविडचे संकट साऱ्या जगावर कोसळले. परंतु इतक्या लसी देणारा कोणता एक देश असेल, तर तो हिंदुस्थान आहे. दोनशे कोटी मात्रा. आज सांडलपोर, खेरगाम, रुमला, मांडवी.. पाणी येते तेव्हा त्याच्याबरोबर केवढी मोठी शक्तीही येते.
बंधुभगिनींनो,
आज आणखी किती शिलान्यासाची कामे झाली. 11 लाखांहून अधिक लोकांची अनेक संकटांपासून सुटका होईल असे काम आज केले आहे. आपले जेसिंगपुरा असो की, आपले नारणपुरा असो की सोनगढ, पाणीपुरवठ्याच्या या ज्या योजना आहेत, त्यांचा उपयोग .. त्यांचे भूमिपूजन झाले आहे, कारण, या वाड्यावस्त्यांमधील 14 लाखांहून अधिक लोकांचं जीवन पाणीदार करायचे आहे.
मित्रांनो,
जल जीवन मिशनअन्तर्गत आपल्या येथे गुजरातमध्ये तर तुमच्या लक्षात असेलच, जे लोक 20 वर्षांचे असतील, त्यांना फारसे आठवत नसेल, पंचविशीत असणाऱ्यांनाही फार काही ठाऊक नसेल. त्यांच्यापेक्षा मोठे असणाऱ्यांना माहित असेल, त्या सगळ्यांनी कसेकसे दिवस काढले आहेत.. आपल्या वाडवडिलांनी कसे दिवस काढले आहेत.. पण, आपल्या वाडवडिलांना जी संकटे झेलावी लागली, त्या संकटांमध्ये मला नव्या पिढीला जगायला लावायचे नाही. त्यांना सुखाचे आयुष्य मिळो, प्रगतीने परिपूर्ण असे आयुष्य मिळो. पूर्वी पाण्याची मागणी येत असे, तेव्हा जास्तीत जास्त काय केले जाई? आमदार येऊन हातपंप लावणार, नि त्याचे उद्घाटन करणार. आणि मग सहाच महिन्यात त्या हातपंपापामधून हवाच येणार, पाणी नाहीच येणार.. असेच होत आले आहे ना? तो हातपंप चालवून चालवून दमून जाऊ पण पाणी येणार नाही. आज आम्ही नळाने पाणी देत आहोत. मला आठवते आहे, उंबरगावपासून अंबाजीपर्यंत इतका मोठा आपला आदिवासी पट्टा. यामध्ये उच्चभ्रू समाजही आहे, ओबीसी समाजही आहेत, आदिवासी समाजही आहेत. येथेही तेजस्वी मुले जन्माला येतील, येथेही ओजस्वी मुले-मुली तयार होतील, पण येथे एकही विज्ञानशाळा नव्हती बंधुभगिनींनो. आणि बाराव्या इयत्तेची विज्ञानशाळाही नव्हती. आणि वैद्यकीय नि अभियांत्रिकी महाविद्यालयांची काय कथा सांगावी? त्यांपेक्षा आणखी चांगले काय असणार? मला आठवते आहे, 2001 मध्ये आल्यावर मी पहिले काम हेच केले. येथे विज्ञानशाळा उभारल्या. आता माझी आदिवासी मुले डॉक्टर होऊ देत, इंजिनीअर होऊ देत. आणि आज मी अभिमानाने सांगतो, की विज्ञानशाळांपासून सुरु केलेले काम आज वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांपर्यंत पोहोचले आहे. आज आदिवासी भागांमध्ये विद्यापीठे निर्माण होत आहेत. गोविंदगुरुंच्या नावाचे विद्यापीठ, बिरसा मुंडा यांच्या नावाचे विद्यापीठ, आदिवासी वाड्यावस्त्यांमध्ये विद्यापीठ. बंधूंनो, प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल तर, दूरदूरच्या जंगलांमध्येही जावे लागते. आणि आम्ही हे काम हाती घेतले आहे. लक्षावधी लोकांचे आयुष्य बदलून टाकण्याचे आम्ही ठरवले आहे. रस्ते असोत की घरापर्यंयत ऑप्टिकल फायबर पोहोचवण्याचा विषय असो. आज नवसारी आणि डांग जिल्ह्यांत त्याचा सर्वाधिक लाभ मिळतो आहे. मला डांग जिल्ह्याचे विशेष अभिनंदन करायचे आहे आणि दक्षिण गुजरातचेही. आज नवसारीमध्ये 500 कोटींपेक्षाही अधिक मूल्याचे रुग्णालय होत आहे आणि दहा लाखांहून अधिक लोकांना याचा फायदा होणार आहे. आदिवासी बंधुभगिनींचे भवितव्य उज्ज्वल झाले पाहिजे. आदिवासी मुलांना आता डॉक्टर व्हायचे असो, ओबीसी समाजातील आईवडिलांच्या मुलाला, मागासवर्गीय माता-पित्याच्या अपत्याला डॉक्टर व्हायचे असो, हडपति समाजाच्या मुलाला डॉक्टर व्हायचे असो, तर त्याला इंग्रजी शिकायची गरज नाही. त्याच्या मातृभाषेतच शिकवून आपण त्याला डॉक्टर करू.
बंधुभगिनींनो,
मी गुजरातमध्ये असताना आम्ही वनबंधू योजना सुरु केली होती. आज वनबंधू कल्याण योजनेचा चौथा टप्पा आपल्या भूपेंद्रभाईंच्या नेतृत्वात सुरु आहे. आणि 14 हजार कोटी रुपये आपल्या बांधवांच्या विकासासाठी कसकसे पुढे पोहोचतात, याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे काम भूपेंद्रभाईंच्या सरकारच्या नेतृत्वात सुरु आहे.
बंधुभगिनींनो,
अशी अनेक क्षेत्रे आहेत. माझ्या छोट्याछोट्या आदिवासी बंधुभगिनींनो, मला आठवते आहे, मी येथे वाडी प्रकल्प सुरु केला होता. वलसाडच्या जवळच. हा वाडी प्रकल्प पाहण्यासाठी, आपले माननीय अब्दुल कलामजी- ते तेव्हा भारताचे राष्ट्रपती होते- त्यांनी आपला वाढदिवस साजरा नाही केला, त्याऐवजी येथे आले आणि वाडीवस्तीमध्ये तो प्रकल्प पाहत पूर्ण दिवस येथे दिला. आणि हा वाडी प्रकल्प काय होता, त्याचा अभ्यास करून मला भेटून म्हणाले, "मोदीजी, तुम्ही खरोखरच गावातील लोकांचे आयुष्य बदलण्याचे मूलगामी काम करत आहात;" असा वाडी प्रकल्प. माझ्या आदिवासी लोकांची अर्धा एकर जमीन, खडबडीत, खड्डेखुड्डे असलेली, अगदी लहान तुकडा असो, काहीही उगवत नसो, आपल्या सगळ्या आदिवासी भगिनी कष्ट करत असोत. आणि आपले आदिवासी बांधव संध्याकाळी जरा मौजमजेचा असोत, आणि तरीही वाडीमध्ये माझा आदिवासी आज काजूची शेती करत आहे. हे काम येथे झाले आहे.
बंधुभगिनींनो,
विकास सर्वांगीण झाला पाहिजे, विकास सर्वस्पर्शी असला पाहिजे, विकास सर्वदूर झाला पाहिजे, विकास सर्वच क्षेत्रांमध्ये झाला पाहिजे. त्या दिशेने आमचे काम सुरु आहे. आणि अशी अनेक कामे आज गुजरातच्या भूमीवर सुरु आहेत. तेव्हा, पुन्हा एकदा, आपण सारे इतक्या मोठ्या संख्येने येथे आलात, अन आशीर्वाद दिलेत, हेच दृश्य, बंधूंनो, तुम्हा सर्वांसाठी काम करण्याची शक्ती मला देते. माता-भगिनींचा हा आशीर्वादच तुमच्यासाठी धावण्याचे बळ देतो. याच बळावर आपल्याला गुजरातलाही पुढे घेऊन जायचे आहे, आणि हिंदुस्थानालाही पुढे घेऊन जायचे आहे. पुन्हा एकदा, आपण सर्वांच्या आशीर्वादांसाठी खूप खूप धन्यवाद. मोठ्या संख्येने येऊन आशीर्वाद दिलात, त्यासाठी धन्यवाद. अशी प्रगतीची कामे, कालबद्ध रीतीने आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणारी कामे करत असल्याबद्दल, मी राज्य सरकारचेही अभिनंदन करतो. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय !
***
S.Patil/N.Chitale/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1833147)
Visitor Counter : 210
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam