पंतप्रधान कार्यालय
नवसारी येथे 'गुजरात गौरव अभियाना' दरम्यान अनेक विकास प्रकल्पांचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ
पंतप्रधानांच्या हस्ते 3050 कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
"दुहेरी इंजिनचे सरकार गुजरातमधील गतिमान आणि सर्वसमावेशक विकासाची गौरवशाली परंपरा प्रामाणिकपणे पुढे नेत आहे"
"सरकारने गरिबांच्या कल्याणावर आणि गरिबांना मूलभूत सुविधा पुरवण्यावर सर्वाधिक भर दिला आहे"
"शुद्ध पाणी मिळावे हा प्रत्येक गरीबाचा, कितीही दुर्गम भागात राहणाऱ्या प्रत्येक आदिवासीचा अधिकार आहे"
"सरकारमध्ये असणे ही आम्ही सेवा करण्याची संधी मानतो"
''जुन्या पिढीला भेडसावणाऱ्या समस्या आपल्या नव्या पिढीला भेडसावणार नाहीत यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत”
Posted On:
10 JUN 2022 12:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'गुजरात गौरव अभियान' या कार्यक्रमात सहभागी झाले.त्यांनी आज नवसारी येथील आदिवासी भाग असलेल्या खुडवेल येथे ‘गुजरात गौरव अभियान’ दरम्यान अनेक विकास उपक्रमांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली.यामध्ये 7 प्रकल्पांचे लोकार्पण, 12 प्रकल्पांची पायाभरणी आणि 14 प्रकल्पांचे भूमिपूजन यांचा समावेश आहे.हे प्रकल्प या भागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी मदत करतील, तसेच संपर्क सुविधा वाढवण्यासाठी आणि जीवनमान सुलभ करण्यासाठी सहाय्य करतील. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्र रजनीकांत पटेल, केंद्रीय आणि राज्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या जाहीर कार्यक्रमाला संबोधित करताना, कार्यक्रम स्थळी मोठ्या प्रमाणात जमलेल्या आदिवासी लोकांबाबत पंतप्रधानांनी नमूद केले. अशा कार्यक्रमांचे आयोजन आदिवासी बंधू-भगिनींमधील निरंतर स्नेह दर्शवते, हे त्यांनी अभिमानाने नमूद केले. आदिवासींच्या कर्तृत्वाचा आणि करारीपणाचा गौरव करत पंतप्रधान नवसारीच्या भूमीसमोर नतमस्तक झाले.
गेल्या दोन दशकांत झालेला वेगवान आणि सर्वसमावेशक विकास आणि या विकासातून जन्माला आलेली नवी आकांक्षा हा गुजरातचा अभिमान आहे. दुहेरी इंजिनचे सरकार ही गौरवशाली परंपरा प्रामाणिकपणे पुढे नेत आहे असे सांगत आजच्या प्रकल्पांमुळे दक्षिण गुजरातमधील सूरत, नवसारी, वलसाड आणि तापी जिल्ह्यांमधील नागरिकांच्या जीवनमानात सुलभता येईल असे ते म्हणाले.
8 वर्षांपूर्वी गुजरातच्या जनतेने त्यांना दिल्लीत कशाप्रकारे पाठवले होते, याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. गेल्या 8 वर्षात अनेक नव्या घटकांमधील लोकांना आणि प्रदेशांना विकास प्रक्रियेशी आणि आकांक्षांशी जोडण्यात सरकारला यश आले आहे, असे ते म्हणाले. एक काळ असा होता की, गरीब, वंचित, दलित, आदिवासी, महिला आणि अन्य असुरक्षित घटक केवळ मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करावे लागायचे, याची त्यांनी आठवण करून दिली. यापूर्वीच्या सरकारांनी विकासाला प्राधान्य दिले नाही.बहुसंख्य गरजू घटक आणि प्रदेश सुविधांपासून वंचित होते. गेल्या 8 वर्षात सबका साथ, सबका विकास या मंत्राला अनुसरून त्यांच्या सरकारने गरिबांच्या कल्याणावर, गरिबांना मूलभूत सुविधा पुरवण्यावर सर्वाधिक भर दिला आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारने कल्याणकारी योजनांच्या पूर्ततेद्वारे गरीबांचे 100 टक्के सक्षमीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
कार्यक्रमासाठी मुख्य मंचावर पोहोचण्यापूर्वी, पंतप्रधानांनी आदिवासी समाजातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. जनता आणि लाभार्थी यांच्याशी असलेल्या संपर्कामुळे विकासाच्या पाठबळाला नवीन गती मिळते, असे ते म्हणाले.
गुजराती भाषेत बोलताना पंतप्रधानांनी स्थानिक लोकांसोबतच्या त्यांच्या दीर्घ सहवासाच्या आठवणी सांगितल्या.या प्रदेशात काम करत असताना लोकांचे आदरातिथ्य आणि आपुलकी याचे त्यांनी स्मरण केले. "तुमची आपुलकी आणि आशीर्वाद हेच माझे सामर्थ्य आहे", असे पंतप्रधानांनी तो सगळा काळ डोळ्यासमोर आणत सांगितले. आदिवासी समाजातील मुलांना शक्य त्या सर्व संधी मिळाव्यात असे सांगत त्यांच्यातील स्वच्छता, ज्ञान , संघटन आणि शिस्त या गुणांची त्यांनी नोंद घेतली. त्यांनी आदिवासी लोकांमधील समाज जीवन आणि पर्यावरण संरक्षणाच्या मूल्यांबद्दलही सांगितले.आदिवासी भागात पाणी मिळणे सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामांचाही त्यांनी उल्लेख केला. पूर्वी जेव्हा पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनासारखी छोटीशी गोष्ट ठळकपणे प्रसिद्ध व्हायची त्या काळा पेक्षा आजचे 3 हजार कोटींहून अधिक खर्चाचे प्रकल्प अगदी विरुद्ध आहेत, असे ते म्हणाले. निरंतर कल्याण आणि विकासाचे प्रकल्प दीर्घकाळापासून त्यांच्या शासन शैलीचा भाग आहेत आणि हे प्रकल्प लोकांच्या कल्याणासाठी आणि गरीब कल्याणासाठी असून ते कोणत्याही निवडणूक विचाराच्या पलीकडे आहेत, असे ते म्हणाले. शुद्ध पाणी मिळावे हा कितीही दुर्गम भागात राहणाऱ्या प्रत्येक गरीबाचा , प्रत्येक आदिवासीचा हक्क आहे,म्हणूनच असे मोठे प्रकल्प हाती घेतले जातात, प्रकल्प वेळेवर सुरु करण्यासाठीच्या कार्यसंस्कृतीत मोठा बदल झाल्यामुळे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते झाले,ही पंतप्रधानांच्या उत्कृष्टतेची छाप असल्याचे त्यांनी सांगितले. " सरकारमध्ये राहणे ही आम्ही सेवा करण्याची संधी मानतो", यावर त्यांनी भर दिला. जुन्या पिढीला भेडसावणाऱ्या समस्या आमच्या नवीन पिढीला भेडसावू नयेत यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.त्यामुळेच या योजना सर्वांसाठी शुद्ध पाणी, दर्जेदार शिक्षण या मूलभूत सुविधा सुनिश्चित करत आहेत, असे ते म्हणाले.त्यांनी त्या काळची आठवण करून दिली जेव्हा या प्रदेशात एकही विज्ञान शाळा नव्हती तर आता इथे वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठे येत आहेत.दुर्गम भागात पायाभूत सुविधा, शिक्षण, व्यवसाय, कनेक्टिव्हिटी संबंधित योजनांद्वारे जीवनमानात परिवर्तन होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.नैसर्गिक शेतीचा अवलंब करणारा डांग जिल्हा आणि दक्षिण गुजरातचीही त्यांनी यावेळी प्रशंसा केली. मातृभाषेतून शिक्षण, अगदी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी सारख्या तांत्रिक अभ्यासक्रमांसाठीही इतर मागासवर्गीय, आदिवासी मुलांसाठी संधी खुल्या होतील, असे ते म्हणाले.वनबंधू योजनेचा नवीन टप्पा राबविल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारची प्रशंसा केली. आम्ही सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि न्याय्य विकासासाठी कार्यरत आहोत, असे पंतप्रधांनीं आपल्या भाषणाचा समारोप करता सांगितले.
तापी, नवसारी आणि सूरतजिल्ह्यातील रहिवाशांसाठी 961 कोटी रुपये खर्चाच्या 13 पाणीपुरवठा प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांनी केले.नवसारी जिल्ह्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन त्यांनी केले,हे महाविद्यालय सुमारे 542 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार असून या प्रदेशातील लोकांना स्वस्त आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात मदत करेल.
सुमारे 586 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या मधुबन धरणावर आधारित अस्टोल प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.पाणी पुरवठा अभियांत्रिकी कौशल्याचा हा एक चमत्कार आहे.तसेच, 163 कोटी रुपये खर्चाच्या ‘नल से जल’ प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
हे प्रकल्प सुरत, नवसारी, वलसाड आणि तापी जिल्ह्यातील रहिवाशांना सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देतील.
तापी जिल्ह्यातील रहिवाशांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी 85 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या वीरपूर व्यारा उपकेंद्राचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.सांडपाणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वलसाड जिल्ह्यातील वापी शहरासाठी 20 कोटी रुपये मुळ्याच्या 14 एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात आले.पंतप्रधानांनी नवसारी येथे 21 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधलेल्या सरकारी निवास्थानांचे उद्घाटन केले. त्यांनी पिपळदेवी - जुनेर - चिचविहीर - पिपळदहाड या रस्त्यांचे आणि डांगमध्ये प्रत्येकी 12 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या शाळांच्या इमारतींचे उद्घाटनही त्यांनी केले.
सुरत, नवसारी, वलसाड आणि तापी जिल्ह्यातील रहिवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 549 कोटी रुपये खर्चाच्या 8 पाणीपुरवठा प्रकल्पांची पंतप्रधानांनी पायाभरणी केली.नवसारी जिल्ह्यात 33 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या खेरगाम आणि पिपळखेड यांना जोडणाऱ्या रुंद रस्त्याची पायाभरणीही करण्यात आली. नवसारी ते बारडोली मार्गे सुपा दरम्यान सुमारे 27 कोटी रुपये खर्चून आणखी एक चौपदरी रस्ता बांधण्यात येणार आहे. डांग येथे 28 कोटी खर्चाच्या जिल्हा पंचायत भवनाची आणि 10 कोटी खर्चाच्या रोलर क्रॅश बॅरियर लावण्याच्या कामाचे भूमिपूजनाही पंतप्रधानांनी केले.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832889)
Visitor Counter : 264
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam